हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांचा कामकाजावर बहिष्कार

बेळगाव बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : संकेश्वर बार असोसिएशनचे सदस्य अॅड. सागर पांडुरंग माने यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशन वकील संघटनेतर्फे कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. माने यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, वकिलांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना […]

हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांचा कामकाजावर बहिष्कार

बेळगाव बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : संकेश्वर बार असोसिएशनचे सदस्य अॅड. सागर पांडुरंग माने यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशन वकील संघटनेतर्फे कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. माने यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, वकिलांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन देण्यात आले. अॅड. सागर माने यांच्यावर दि. 11 फेब्रुवारी रोजी सोलापूर (ता. हुक्केरी) येथे हल्ला करण्यात आला आहे. याबाबत संकेश्वर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांकडून प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पोलिसांनी संबंधित गुन्ह्यांतर्गत आरोपींवर कारवाई करण्यात हलगर्जीपणा केला आहे, असा आरोप वकील संघटनेकडून करण्यात आला आहे.
पोलिसांकडून आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संकेश्वर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य न ओळखता संशयित आरोपीच्या म्हणण्यानुसार कामकाज केले आहे. कायद्यानुसार कारवाई केली नाही. पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था पाळण्यात हलगर्जीपणा करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव बार असोसिएशनतर्फे घटनेचा तीव्र निषेध करून कामकाजावर बहिष्कार टाकून संशयिताविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात असफल ठरल्याचा आरोप वकील संघटनेकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी त्वरित कारवाई करण्यात यावी, तसेच हलगर्जीपणा दाखविलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. बार असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. इराप्पा पुजारी, अॅड. सुमितकुमार अगसगी, अॅड. विनायक निंगनुरे, अॅड. अश्विनी हवालदार, अॅड. वाय. के. दिवटे आदी उपस्थित होते.