जवान शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कंग्राळी खुर्द येथे साश्रुनयनांनी निरोप : शोक मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी, हवेत बंदुकीने फैऱ्या सैन्याकडून झाडून अखेरची सलामी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
अमर रहे, अमर रहे हुतात्मा वीर जवान जगदीश शिंदे अमर रहे, बोलो भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणांमध्ये कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र हुतात्मा जवान हवालदार जगदीश मनोहर शिंदे यांच्या पार्थिवावर बुधवारी शासकीय इतमामात कंग्राळी खुर्द येथील स्मशानभूमीमध्ये दुपारी 1.30 वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जगदीश यांचे वडील मनोहर शिंदे यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. तर बेळगाव येथील महार रेजिमेंटल बटालियनच्या जवानांनी हवेमध्ये बंदुकीने फैरी झाडून अखेरची सलामी दिली.
हुतात्मा जवान जगदीश शिंदे 131 एडी रेजिमेंटल भटिंडा (पंजाब) येथे सध्या देशसेवा बजावत होते. मिलिटरीची मोठी क्रॅट टाटा गाडी सेवेसाठी घेऊन जाण्यासाठीच्या तयारीत असताना अचानक गाडीचा टायर फुटून टायरवरील लोखंडी व्हील त्यांच्या छातीवर आदळले. देशसेवा बजावताना त्यांना वीरमरण आले. जगदीश यांचे पार्थिव भटिंडा (पंजाब) येथून विमानाने दिल्लीला आणले. दिल्ली येथून विमानाने बेळगाव सांबरा विमानतळावर बुधवारी सकाळी 9 वा. आणण्यात आले. यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान व महार रेजिमेंटल बटालियनच्या जवानांनी जवान जगदीश यांच्या पार्थिवाला सांबरा विमानतळावर पहिली सलामी दिली. त्यानंतर सैन्यदलाच्या वाहनातून पार्थिव कंग्राळी खुर्दकडे 10 वाजता नेण्यात आले.
आई अन् पत्नीचा हंबरडा
ज्योतीनगर कंग्राळी खुर्द येथील नागनाथ गल्लीतील जगदीश यांच्या घरामध्ये पार्थिव मिरवणुकीने आणताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. तसेच आपला मुलगा देशसेवा बजावताना देशासाठी हुतात्मा झाला हा अभिमानही दु:खाश्रू ढाळताना दिसून येत होता.
पार्थिव अंत्यदर्शनासाठी मराठी शाळेच्या प्रांगणात
जगदीशच्या कुटुंबीयांनी जगदीशचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिवाची परत सैन्यदलाच्या वाहनांतून शोक मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये हजारो नागरिक, महिला, शाळकरी मुलांचा सहभाग दिसून येत होता. मिरवणूक महादेव रोडवरून मराठी प्राथमिक शाळेजवळ आल्यानंतर पार्थिव मराठी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, श्रीराम सेनेचे रमाकांत कोंडुस्कर, कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील, सदस्य यल्लाप्पा पाटील, पीडीओ गोपाल नाईक, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी आमदार संजय पाटील, तहसीलदार, कंग्राळी खुर्द तलाठी, माजी उपमहापौर रेश्मा पाटील, कंग्राळी बुद्रुक गावातील विविध संघटना, कंग्राळी खुर्द आजी, माजी सैनिक संघटना, ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजू बेन्नाळकर, विनायक कम्मार, माजी सैनिक संघटना बोडकेनहट्टी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कंग्राळी खुर्द, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बाळेकुंद्री खुर्द, माजी सैनिक संघटना-कडोली, मार्यंडेय साखर कारखाना माजी अध्यक्ष आर. आय. पाटील, मराठी शाळा सुधारणा कमिटी, विविध सोसायट्यासह ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतले. पार्थिव स्मशानभूमीमध्ये आणल्यानंतर बेळगाव येथील महार रेजिमेंटल बटालियन व मराठा लाईट इन्फंट्रीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शासकीय सलामी देण्यात आली.
तिरंगा पत्नीकडे सुपूर्द
वीर जवान जगदीश शिंदेचे पार्थिव तिरंगा ध्वजातून शासकीय इतमामात आणण्यात आले होते. यावेळी सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते तिरंगा ध्वज व नारळ पत्नी रेखा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कंग्राळी खुर्द ग्रामस्थांसह इतर उपस्थितांच्यावतीने दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. स्मशानभूमीमध्ये महार रेजिमेंटल बटालियनच्या जवानांकडून शोक व्यक्त करणारी धून व हवेमध्ये बंदुकीने तीन फैऱ्या झाडून सैन्य दलाकडून अखेरची सलामी देण्यात आली. यावेळी वडील मनोहर यांनी जगदीशच्या पार्थिवाला भडाग्नी दिली. शोक मिरवणुकीत आजी माजी ग्रा. पं. सदस्य, विद्यार्थी, शिक्षकवर्ग, विविध युवक मंडळे, माहिला मंडळे, कंग्राळी खुर्द परिसरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.निवृत्त मुख्याध्यापक टी. डी. पाटीलसह इतर सहकाऱ्यांनी शोक मिरवणुकीचे समालोचन केले.

Home महत्वाची बातमी जवान शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जवान शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कंग्राळी खुर्द येथे साश्रुनयनांनी निरोप : शोक मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी, हवेत बंदुकीने फैऱ्या सैन्याकडून झाडून अखेरची सलामी वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक अमर रहे, अमर रहे हुतात्मा वीर जवान जगदीश शिंदे अमर रहे, बोलो भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणांमध्ये कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र हुतात्मा जवान हवालदार जगदीश मनोहर शिंदे यांच्या पार्थिवावर बुधवारी शासकीय […]


