लेझर वापरल्यास सहा महिने शिक्षा ! मंडळांवर कारवाईचा प्रशासनाचा इशारा

लेझर जागेवर होणार जप्त कोल्हापूर प्रतिनिधी गणेशोत्सवात लेसर लाईटमुळे झालेल्या दुष्परिणामांमुळे त्यावर बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सहा महिने शिक्षा आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा होवू शकते. यामुळे लेझरचा वापर टाळावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गणेश […]

लेझर वापरल्यास सहा महिने शिक्षा ! मंडळांवर कारवाईचा प्रशासनाचा इशारा

लेझर जागेवर होणार जप्त

कोल्हापूर प्रतिनिधी

गणेशोत्सवात लेसर लाईटमुळे झालेल्या दुष्परिणामांमुळे त्यावर बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सहा महिने शिक्षा आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा होवू शकते. यामुळे लेझरचा वापर टाळावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेश आगमन मिरवणुकीतील लेसर लाईटमुळे काही ठिकाणी नागरिकांच्या डोळ्याला इजा झाली आहे. त्यानंतर नागरिकांमधून त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रशासनावर सोशल मीडियावरून टीकेचा भडीमार झाला. यानंतर डोळ्यांना घातक ठरणाऱ्या लेसरवर विसर्जन मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली. या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या बंदी आदेशाचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांची लेसर यंत्रणा जप्त करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे लेसरचा वापर कोणीही करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लेझर बंदी कायमस्वरुपी हवी
जिल्हाधिकाऱ्यांनी लेझरवापरावर बंदी घातली आहे. ही बंदी गणेशउत्सवापूर्ती घातली आहे. सोशल मीडियावर याबाबत नेटकऱ्यांकडून बोलक्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बंदी गणेशोत्सवापुरतीच मर्यादित नसावी, तर इतरवेळीही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी असे मत काही नागरीकांनी व्यक्त केले आहे. लग्न समारंभ, वरात, मिरवणूका तसेच राजकीय नेत्यांच्या सभांमध्येही लेझरवापरावर बंदी करावी अशी प्रतिक्रिया नागरीकांनी व्यक्त केली आहे.
अशी आहे शिक्षेची तरतूद
नवीन भारतीय दंड संहितेप्रमाणे लेझर वापरणाऱ्या मंडळांवर भारतीय न्यायसंहिता 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. या कलमांन्वये सहा महिन्यांची शिक्षा किंवा 5 हजार रुपये दंडाची तरतुद करण्यात येते. काही वेळा न्यायालय या दोनही शिक्षा सुनावते. तसेच हा दखलपात्र गुन्हा असल्यामुळे गुन्हा दाखल झाल्यास पासपोर्ट नोकरी, किंवा चारित्र्य पडताळणीमध्ये अडथळा येवू शकतो.