ललन सिंह यांचा संजद अध्यक्षपदाचा राजीनामा

नितीश कुमार होणार पक्षाध्यक्ष : 29 रोजी पक्ष कार्यकारिणीची बैठक वृत्तसंस्था/ पाटणा बिहारच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान राखून असलेल्या संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी स्वत:चे पद सोडले आहे. ललन सिंह यांनी स्वत:चा राजीनामा नितीश कुमार यांच्याकडे पाठविला आहे. परंतु यावर निर्णय 29 डिसेंबरला होणाऱ्या संजद कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. नितीश कुमार हे […]

ललन सिंह यांचा संजद अध्यक्षपदाचा राजीनामा

नितीश कुमार होणार पक्षाध्यक्ष : 29 रोजी पक्ष कार्यकारिणीची बैठक
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान राखून असलेल्या संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी स्वत:चे पद सोडले आहे. ललन सिंह यांनी स्वत:चा राजीनामा नितीश कुमार यांच्याकडे पाठविला आहे. परंतु यावर निर्णय 29 डिसेंबरला होणाऱ्या संजद कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. नितीश कुमार हे पुन्हा संजद अध्यक्ष होऊ शकतात. ललन सिंह यांना राजदशी वाढलेली जवळीक महागात पडणार असल्याचे मी यापूर्वीच म्हटले होते अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुशीलकुमार मोदींकडून व्यक्त करण्यात आली आहे.
ललन सिंह हे नितीश कुमार यांच्यावर नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याचमुळे ते स्वत:चे पद सोडण्याचा प्रस्ताव सातत्याने मांडत होते, तर दुसरीकडे नितीश कुमार हे त्यांची मनधरणी करू पाहत होते. ललन सिंह यांच्या राजीनाम्याची अद्याप संजदकडून पुष्टी मिळालेली नाही.
काही दिवसांपूर्वीच बिहारमधील भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी संजदमध्ये  फूट पडणार असल्याचे म्हणत ललन सिंह यांना पक्षाध्यक्ष पदावरून हटविण्यात येणार असल्याचा दावा केला होता. याबद्दल पत्रकारांनी नितीश कुमार यांना प्रश्न विचारला होता, उत्तर देताना नितीश कुमार यांनी ललन सिंह यांच्याबद्दल टिप्पणी करणे प्रकर्षाने टाळले होते.
29 डिसेंबर रोजी दिल्लीत संजदच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. ललन सिंह यांची लालूप्रसाद यादव यांच्याशी वाढलेल्या जवळीकीमुळे नितीश कुमार हे सावध झाले होते. यातूनच ललन सिंह यांना स्वत:च्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असल्याचे बोलले जात आहे. ललन सिंह यांचे राष्ट्रीय राजकारणातील वाढते महत्त्व पाहता नितीश कुमार यांनी वेगळा विचार सुरू केला होता अशीही चर्चा आहे.
ललन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच स्वत: पक्षाचे पुढील अध्यक्ष होऊ शकतात. अन्यथा ते स्वत:च्या एखाद्या निकटवर्तीयाला पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवू शकतात. या शर्यतीत सध्या अशोक चौधरी यांचे नाव सर्वात पुढे आहे. बिहारच्या सत्तारुढ पक्षात सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींप्रकरणी 29 डिसेंबरच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होऊ शकते.
नितीश कुमारांच्या भूमिकेवरून गोंधळ
नितीश कुमार यांनी मंगळवारी स्वत:च्या तीन मंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा केली आहे. नितीश कुमार हे बुधवारीच नवी दिल्लीत पोहोचणार आहेत. प्रत्यक्षात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही शुक्रवारी होणार आहे. अशा स्थितीत नितीश कुमार यांच्या या दिल्ली दौऱ्यासंबंधी अनेक प्रकारचे कयास वर्तविले जात आहेत. नितीश कुमार हे पुन्हा एकदा रालोआच्या वाटेवर असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.