कुनलावत, यामागुची, लि शी फेंग पराभूत

इंडिया खुली बॅडमिंटन, सात्विक-चिरागची विजयी सलामी वृत्तसंस्था /नवी दिल्ली विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2024 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरू झालेल्या इंडिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीत विश्व विजेता कुनलावत वितिडसर्न तसेच अॅकेनी यामागुची, अखिल इंग्लंड स्पर्धेतील विद्यमान विजेत्या ली शी फेंग यांचे आव्हान संपुष्टात आले. दरम्यान पुरूष दुहेरीत भारताच्या […]

कुनलावत, यामागुची, लि शी फेंग पराभूत

इंडिया खुली बॅडमिंटन, सात्विक-चिरागची विजयी सलामी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2024 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरू झालेल्या इंडिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीत विश्व विजेता कुनलावत वितिडसर्न तसेच अॅकेनी यामागुची, अखिल इंग्लंड स्पर्धेतील विद्यमान विजेत्या ली शी फेंग यांचे आव्हान संपुष्टात आले. दरम्यान पुरूष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी विजयी सलामी दिली.
पुरूष एकेरीच्या गुरूवारी झालेल्या सामन्यात हाँगकाँगच्या ली चेयुक ईयु याने 22 वर्षीय आणि विद्यमान विश्वविजेत्या कुनलावत वितिडसर्नचा 16-21, 22-20, 23-21 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा सामना 85 मिनिटे चालला होता. त्याचप्रमाणे जपानच्या चौथ्या मानांकित आणि आतापर्यंत दोन वेळेला विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या अकाने यामागुचीला थायलंडच्या ओ. बुसाननकडून पराभव पत्करावा लागला. थायलंडच्या 18 व्या मानांकित बुसाननने यामागुचीचा 21-11, 21-19 असा फडशा पाडला. अन्य एका सामन्यात जपानचा बिगर मानांकित कोकी वाटांबेने चीनच्या तृतीय मानांकित फेंगचे आव्हान 32-24, 13-21, 21-9 असे संपुष्टात आणले. हा सामना 71 मिनिटे चालला होता. दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात मलेशियाच्या ली जीयाने पाचव्या मानांकित जोनातन ख्रिस्टीवर 21-15, 21-13 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
सात्विक-चिराग विजयी
पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताची द्वितीय मानांकित जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी विजयी सलामी देताना चीन तैपेईच्या लु चिंग याओ आणि यांग पो हेन यांचा 21-15, 19-21, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव केला. गेल्या आठवड्यात झालेल्या मलेशियन खुल्या सुपर 1000 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीने उपविजेतेपद मिळविले होते. महिलांच्या एकेरीमध्ये दक्षिण कोरियाच्या विद्यमान विजेत्या अॅन से यंगने थायलंडच्या आर. इंटेनॉनचा 14-21, 21-11, 21-11, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या अँथोनी जिनटिंगने जपानच्या सुनेयामाचा 16-21, 23-21, 21-17 असा पराभव केला.