कुलविंदर कौरः कंगनाच्या थोबाडीत मारणारी ही कॉन्स्टेबल कोण आहे?

बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघाची नवनिर्वाचित भाजप खासदार कंगना राणावतला विमानतळावर सीएआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने कानाखाली मारली.गुरुवारी एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी कंगना नवी दिल्लीत येत होती.

कुलविंदर कौरः कंगनाच्या थोबाडीत मारणारी ही कॉन्स्टेबल कोण आहे?

बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघाची नवनिर्वाचित भाजप खासदार कंगना राणावतला विमानतळावर सीएआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने कानाखाली मारली.गुरुवारी एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी कंगना नवी दिल्लीत येत होती.

 

कुलविंदर कौर नावाच्या महिलेचं म्हणणं आहे की, कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे ती संतापली होती.

 

या घटनेनंतर सीआयएसएफने कुलविंदर कौरला निलंबित केलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले की, “या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, तपासानंतर काय झालं ते कळेल. त्यानंतर दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल.”

 

ते म्हणाले, “सुरक्षा कर्मचारीच अशा गोष्टी करू लागले तर ते दुर्दैवी आहे, ते योग्य नाही.”

 

मात्र, अनेकजण कुलविंदर कौरचा बचाव करण्यासाठी सोशल मीडियावर पुढे आले आहेत.

सुप्रसिद्ध नेमबाज हीना सिद्धूने ट्वीट करत म्हटलंय की, “एखाद्याच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे तिने थोबाडीत मारली, याचा अर्थ राज्य पूर्णपणे दहशतवाद आणि हिंसाचाराच्या विळख्यात आलं आहे असं नाही. 100-100 रुपयांचे ट्विट करण्याप्रमाणे, थोबाडीत मारणं देखील अतिउत्साह किंवा आवेगपूर्ण कृती आहे. दुर्दैवाने, त्या ट्विटमुळे माझ्यासह अनेकांना राग आला होता, पण ते हटवण्यात आलं. मात्र त्या महिला कॉन्स्टेबलचं कृत्य सर्वांसमोर आहे. तिने हात न उचलता त्याला तोंड दिलं असतं तर बरं झालं असतं.”

 

हिना सिद्धूला प्रतिष्ठित क्रीडा सन्मान अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे.

 

ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया यानेही ट्वीट करत म्हटलंय की, “जेव्हा महिला शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढले जात होते, तेव्हा नैतिकता शिकवणारे लोक कुठे होते? आता त्या शेतकरी आईच्या मुलीने गाल लाल केल्यावर शांतीचा धडा शिकवायला आले. सरकारी अत्याचारामुळे शेतकऱ्यांचा बळी गेला, त्यावेळी सरकारला शांततेचा धडा शिकवायचा होता.”

 

नेमकं काय घडलं? कंगनाने सांगितलं..

कंगनाने सांगितलं की, गुरुवारी दुपारी 3 वाजता विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरने तिला थोबाडीत मारली आणि तिच्यासोबत गैरवर्तन केलं.

 

कंगनाने गुरुवारी संध्याकाळी एक व्हीडिओ प्रसिद्ध करून या घटनेबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “मी सुरक्षित आहे. चंदिगढ विमानतळावर घडलेली ही घटना सुरक्षा तपासणीदरम्यान घडली. सुरक्षा तपासणीनंतर मी बाहेर येताच दुसऱ्या केबिनमधील महिला सीआयएसएफ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी काही मिनिटं थांबले. तितक्यात त्या महिलेने बाजूला येऊन माझ्या तोंडावर चापट मारली आणि शिवीगाळ करू लागली.”

 

“त्या कॉन्स्टेबलनं असं का केलं असं विचारल्यावर कंगना म्हणाली, त्या महिला कॉन्स्टेबलचं उत्तर होतं की तिचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे.”

कंगना म्हणाली, “मी सुरक्षित आहे मात्र मला चिंता वाटते की, आपण पंजाबात वाढत असणाऱ्या दहशतवादाला कसं हाताळणार आहोत.”

 

विमानतळावर उपस्थित असलेल्या सीआयएसएफ अधिकाऱ्याने सांगितलं की, “त्या महिला कॉन्स्टेबलला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं आहे. पंजाब पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.”

 

पंजाब पोलिसांचे डीएसपी के. एस. संधू म्हणाले, “सध्या फुटेज तपासले जात आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल.”

 

घटनास्थळी उपस्थित असलेल्या सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला असून कुलविंदर कौरविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

 

ते म्हणाले, “आम्ही महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, तिला तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे आणि घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.”

 

दिल्लीला पोहोचल्यावर कंगनाने विमानतळावर सीआयएसएफ अधिकाऱ्यासमक्ष कुलविंदर कौरविरोधात तक्रार दाखल केली.

 

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सीआयएसएफने कुलविंदर कौरला निलंबित केलं असून चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे.

 

महिला कॉन्स्टेबलचा व्हीडिओ आला समोर

दरम्यान, सोशल मीडियावर महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय.

 

या व्हीडिओमध्ये ती म्हणते, “फक्त शंभर रुपयांसाठी ते लोक तिथं बसत होते असं ही (कंगना) म्हणाली ना? त्या आंदोलनात माझी आईसुद्धा होती.”

नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2021 या कालावधीत शेतकऱ्यांनी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध केला होता. यावेळी राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन केलं होतं.

 

कोण आहे कुलविंदर कौर?

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कुलविंदर कौर 2009 मध्ये सीआयएसएफमध्ये भरती झाली. ती 2021 पासून चंदिगड विमानतळावर सुरक्षा कर्मचारी म्हणून तैनात आहे. तिचे पतीही याच विमानतळावर काम करतात.

 

हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, कुलविंदर पंजाबमधील कपूरथळा जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी आहे.

 

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुलविंदरचा भाऊ शेर सिंग म्हणाला, ‘मागील दोन वर्षांपासून कुलविंदरची नियुक्ती चंदीगढ विमानतळावर झालेली आहे आणि ती सीआयएसएफमध्ये 15-16 वर्षांपासून कार्यरत आहे.’

 

शेर सिंगच्या म्हणण्यानुसार, कुलविंदरचे पतीही सीआयएसएफमध्ये आहे.

कंगनाच्या शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधानांबद्दल

2020 मध्ये तीन कृषी कायद्यांविरोधात वर्षभर देशभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या काळात कंगना तिच्या वक्तव्यांमुळे वादात सापडली होती.

 

डिसेंबर 2020 मध्ये, बीबीसीने 88 वर्षीय महिला शेतकरी महिंदर कौर यांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. कंबरेतून वाकलेल्या महिंदर कौर पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत झेंडा घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

 

महिंदर कौर यांच्या या फोटोनंतर सोशल मीडियावर त्यांची तुलना शाहीन बाग आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या बिल्किस दादीशीही करण्यात आली.

 

त्यावेळी, कंगनाने बिल्किस आणि महिंदर कौर या दोघींचे फोटो एकत्र ट्विट करून म्हटलं होतं की, “हा हा. ये वही दादी हैं, जिन्हें टाइम मॅगझीन की 100 सबसे प्रभावशाली व्यक्तियों की लिस्ट में शामिल किया गया था….और ये 100 रुपये में उपलब्ध हैं.”

 

कंगनाने नंतर हे ट्विट डिलीट केलं पण अभिनेता दिलजीत दोसांझसोबत तिचा यावरून वाद झाला.

 

दिलजीत दोसांझने कंगनाच्या वक्तव्यावर, महिंदर कौरच्या प्रतिक्रियेचा बीबीसीचा व्हीडिओ शेअर केला आणि कंगनाला टॅग करत म्हटलं की, “टीम कंगना पुराव्यासह ऐका. एखाद्या व्यक्तीने इतकंही आंधळं असू नये. काहीपण बोलत सुटले आहेत.”

 

सप्टेंबर 2020 मध्ये कंगनाने आंदोलक शेतकऱ्यांबद्दल ट्विटमध्ये लिहिलं होतं की, “जे सीएएबद्दल चुकीची माहिती आणि अफवा पसरवत होते, ते आता शेतकरी विधेयकाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत.”

 

तिने लिहिलं होतं, “ते देशात दहशत निर्माण करत आहेत, ते ‘दहशतवादी’ आहेत.”

 

त्यानंतर कंगनाने स्पष्टीकरण देत सांगितलं की, ती शेतकऱ्यांना ‘दहशतवादी’ म्हटलेली नाही. पण जर कोणी ती असं म्हटली आहे हे सिद्ध केलं तर ती ट्विटर डिलीट करेल.

 

कंगनाबाबतच्या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे

या घटनेवर प्रतिक्रिया देताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी म्हणाले की सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडून असं वर्तन घडणं ही दुर्दैवी बाब आहे.

 

नायब सैनी म्हणाले, कंगनाशी याप्रकारचं वर्तन अजिबात घडायला नको होतं

मंडी मतदारसंघातून कंगनाविरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह म्हणाले, “ही खूप दुर्दैवी घटना आहे. असं कोणाच्याही बाबतीत घडता कामा नये. खासकरून संसदेच्या एका महिला खासदाराबाबत तर अजिबात नाही. सीआयएसएफच्या काही कॉन्स्टेबल्सनी शेतकरी आंदोलनाला प्रतिसाद दिला होता. याबाबत काही तक्रारी होत्या, मात्र अशा पद्धतीनं थोबाडीत लगावणं खूपच दुर्दैवी आहे.

 

“आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि सरकारनं याबाबतीत कारवाई केली पाहिजे.”

 

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाल मतदारसंघातील लोकसभेचे खासदार मनोहरलाल खट्टर यांनी या घटनेचं वर्णन दुर्दैवी असं केलं.

 

ते म्हणाले, “सुरक्षा दलांचं काम सुरक्षा पुरवणं हे आहे. त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे. जनभावनेशी त्यांचा काहीही संबंध नसतो. आम्हाला आशा आहे की सीआयएसएफ या संदर्भात विभागीय कारवाई करेल.”

 

भाजप नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले, “जे काही घडले ते दुर्दैवी आहे. चंदिगड विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी असं वागणं दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. मला मिळालेल्या माहितीनुसार, महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.”

 

ते म्हणाले, “याप्रकरणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. निवडून आलेल्या नेत्यांसोबत अशी वागणूक देण्याचा कोणालाही अधिकार नाही.”

 

Published By- Priya Dixit

 

 

 

 

 

 

 

 

Go to Source