केपी शर्मा ओली होणार नेपाळचे पंतप्रधान

सोमवारी सकाळी 11 वाजता घेणार शपथ : नेपाळी काँग्रेसकडून पाठिंबा वृत्तसंस्था/ काठमांडू नेपाळच्या राष्ट्रपती कार्यालयाने सीपीएन-युएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. केपी शर्मा ओली हे सोमवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांची जागा ओली घेणार आहेत. बहुमत सिद्ध करता न आल्याने दहल यांचे सरकार शुक्रवारी […]

केपी शर्मा ओली होणार नेपाळचे पंतप्रधान

सोमवारी सकाळी 11 वाजता घेणार शपथ : नेपाळी काँग्रेसकडून पाठिंबा
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळच्या राष्ट्रपती कार्यालयाने सीपीएन-युएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. केपी शर्मा ओली हे सोमवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांची जागा ओली घेणार आहेत. बहुमत सिद्ध करता न आल्याने दहल यांचे सरकार शुक्रवारी कोसळले होते. ओली यांनी शुक्रवारी राष्ट्रपतींना सादर केलेल्या दाव्यात 166 खासदारांचा पाठिंबा प्राप्त असल्याचे नमूद केले होते. यात युएमएलचे 78 आणि नेपाळी काँग्रेसचे 88 खासदार सामील आहेत.
2008 मध्ये राजेशाहीची साथ सोडून नवी राज्यघटना स्वीकारल्यावर नेपाळमध्ये   13 वेळा सत्तांतर झाले आहे. ओली यांना चीनधार्जिणा नेता म्हणून ओळखले जाते. ओली यांनी गुरुवारी ‘प्रचंड’ यांना दिलेला पाठिंबा काढून घेत नेपाळी काँग्रेससोबत आघाडी सरकार स्थापन करण्याच्या स्वत:च्या पक्षाच्या निर्णयाचा बचाव करताना देशाचे राजकीय स्थैर्य आणि विकास टिकण्यासाठी हे आवश्यक होते असा दावा केला.
तर दुसरीकडे नेपाळी काँग्रेस हा पक्ष भारताचा समर्थक असल्याचे मानले जाते. यामुळे परस्परविरोधी भूमिका घेणारे हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे सरकार कशाप्रकारे चालविणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहणार आहे. उर्वरित कार्यकाळाचा निम्मा काळ ओली हे पंतप्रधान असतील. तर शिल्लक कार्यकाळासाठी नेपाळी काँग्रेसचे नेते शेरबहादुर देउबा हे पंतप्रधान असणार आहेत.
ओली यापूर्वी 11 ऑक्टोबर 2015 ते 3 ऑगस्ट 2016 पर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. यादरम्यान नेपाळ आणि भारताचे संबंध तणावपूर्ण होते. यानंतर त्यांनी 5 फेब्रुवारी 2018 पासून 13 मे 2021 पर्यंत देशाचे पंतप्रधान पद भूषविले होते. स्वत:च्या पहिल्या कार्यकाळात ओली यांनी नेपाळच्या अंतर्गत विषयांमध्ये कथित हस्तक्षेपासाठी जाहीरपणे भारतावर टीका केली होती. तसेच स्वत:चे सरकार भारताने पाडविले असल्याचा आरोप केला होता.
नेपाळमध्ये राज्यघटना लागू झाल्यावर हिंसक निदर्शने झाली होती. या निदर्शनांमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप ओली यांनी केला होता. त्यांच्या कार्यकाळात नेपाळच्या नकाशात भारतीय भूभागांना दर्शविण्यात आले हेते, ज्यानंतर दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण झाले होते.