दणदणीत विजयासह कोलकाता अग्रस्थानावर
लखनौवर 98 धावांनी मात, सुनील नरेनचे अर्धशतक, हर्षित राणा, चक्रवर्तीचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ लखनौ
सुनील नरेनचे अर्धशतक तसेच सॉल्ट, रघुवंशी आणि रमनदीप सिंगच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सचा 98 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात 16 गुणासह आघाडीच्या स्थानावर झेप घेतली आहे. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 235 धावा जमवित लखनौला 236 धावांचे कठिण आव्हान दिले आहे. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा डाव 16.1 षटकात 137 धावांत आटोपला.
2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील हा 54 वा सामना आहे. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून कोलकाता संघाला प्रथम फलंदाजी दिली. सॉल्ट आणि नरेन या सलामीच्या जोडीने पहिल्या चेंडूपासूनच दमदार फटकेबाजी केली. या जोडीने 26 चेंडूत 61 धावांची भागिदारी केली. नवीन उल हकने सॉल्टला राहुलकरवी झेलबाद केले. त्याने 14 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 32 धावा झोडपल्या. सॉल्ट बाद झाल्यनंतर सुनील नरेन आणि रघुवंशी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 79 धावांची भागिदारी केली. सुनील नरेनने 39 चेंडूत 7 षटकार आणि 6 चौकारांसह 81 धावा झोडपल्या. बिस्नॉइने नरेनला झेलबाद केले. 12 षटकाअखेर कोलकाता संघाची स्थिती 2 बाद 140 अशी होती.
नवीन उल हकने रसेलला लवकर बाद केले. त्याने 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. युद्धवीर सिंगने रघुवंशीला झेलबाद केले. त्याने 26 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावा जमविल्या. नवीन उल हकच्या गोलंदाजीवर रिंकू सिंग स्टोईनिसकरवी झेलबाद झाला. त्याने 11 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 15 चेंडूत 3 चौकारांसह 23 धावा केल्या आणि तो यश ठाकूरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रमनदीप सिंगने केवळ 6 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 25 धावा जमविल्याने कोलकाता संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. वेंकटेश अय्यर एका धावेवर नाबाद राहिला. कोलकाता संघाला अवांतर 13 धावा मिळाल्या. लखनौतर्फे नवीन उल हकने 49 धावांत 3 तर यश ठाकूर, बिस्नॉइ व युद्धवीर सिंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. कोलकाता संघाच्या डावामध्ये 13 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले.
कोलकाता संघाने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 70 धावा जमविताना 1 गडी गमाविला. सॉल्ट आणि नरेन यांनी अर्धशतकी भागिदारी 22 चेंडूत नोंदविली. कोलकाता संघाचे अर्धशतक 22 चेंडूत तर शतक 54 चेंडूत फलकावर लागले. नरेनने 27 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक झळकवले. नरेन आणि रघुवंशी यांनी अर्धशतकी भागिदारी 35 चेंडूत पूर्ण केली. कोलकाता संघाचे दीडशतक 76 चेंडूत तर द्विशतक 107 चेंडूत नोंदविले गेले. या सामन्यात कोलकाता संघाच्या डावामध्ये मोहसिन खानच्या जागी युद्धवीर सिंगला बदली खेळाडू म्हणून 15 व्या षटकात मैदानात उतरविले. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या विंडीजच्या सुनील नरेनला लखनौकडून दोन सोपी जीवदाने मिळाली. या जीवदानाचा लाभ घेत त्याने त्यानंतर 5 चेंडूत 5 सलग चौकार मारुन लखनौवर दडपण आणले. नवीन उल हकच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूवर तर त्यानंतर मोहसिन खानच्या षटकातील पहिल्या 3 चेंडूवर नरेनने चौकार ठोकले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कोलकाता संघाच्या अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणासमोर लखनौ सुपर जायंट्सचा डाव 16.1 षटकात 137 धावांत आटोपला. कर्णधार राहुल आणि कुलकर्णी या सलामीच्या जोडीने 2 षटकात 20 धावांची भागिदारी केली. स्टार्कने कुलकर्णीला 9 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर राहुल आणि स्टोईनिस यांनी 33 चेंडूत 50 धावांची भागिदारी दुसऱ्या गड्यासाठी केली. राहुलने 21 चेंडूत 3 चौकारांसह 25 धावा तर स्टोईनिसने 21 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 36 धावा जमविल्या. राहुल बाद झाल्यानंतर लखनौच्या डावाला गळती सुरु झाली. पूरनने 1 षटकारासह 10, बदोनीने 1 षटकारासह 15, टर्नरने 2 षटकारांसह 16 आणि युद्धवीर सिंगने 1 षटकारासह 7 धावा जमविल्या. लखनौच्या डावात 7 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. लखनौने पॉवरप्लेच्या 6 षटकात 55 धावा जमविताना 1 गडी गमाविला. लखनौ संघातर्फे यश ठाकूरच्या जागी अर्शिन कुलकर्णीला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून तर कोलकाता संघातर्फे रघुवंशीच्या जागी वैभव अरोराला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात आणले. लखनौचे अर्धशतक 33 चेंडूत, शतक 66 चेंडूत फलकावर लागले. कोलकाता संघातर्फे हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 3, रसेलने 2 तर स्टार्क आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
या स्पर्धेतील गुणतक्त्यात कोलकाता संघ 11 सामन्यातून 8 विजयासह 16 गुण घेत पहिल्या स्थानावर आहे. राजस्थानने 16 गुण मिळविले असले तरी ते दुसऱ्या स्थानावर आहेत. या पराभवामुळे लखनौ संघाला मात्र पाचव्या स्थनावर समाधान मानावे लागत आहे. लखनौने 11 सामन्यातून 12 गुण मिळविले आहेत.
संक्षिप्त धावफलक – कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकात 6 बाद 235 (सॉल्ट 32, सुनील नरेन 81, रघुवंशी 32, रसेल 12, रिंकू सिंग 16, श्रेयस अय्यर 23, रमनदीप सिंग नाबाद 25, वेंकटेश अय्यर नाबाद 1, अवांतर 13, नवीन उल हक 3-49, ठाकूर 1-46, बिस्नॉइ 1-33, युद्धवीर सिंग 1-24), लखनौ सुपर जायंट्स 16.1 षटकात सर्वबाद 137 (स्टोईनिस 36, राहुल 25, पूरन 10, बदोनी 15, टर्नर 16, अवांतर 7, हर्षित राणा 3-24, चक्रवर्ती 3-30, रसेल 2-17, स्टार्क 1-22, सुनील नरेन 1-22).
Home महत्वाची बातमी दणदणीत विजयासह कोलकाता अग्रस्थानावर
दणदणीत विजयासह कोलकाता अग्रस्थानावर
लखनौवर 98 धावांनी मात, सुनील नरेनचे अर्धशतक, हर्षित राणा, चक्रवर्तीचे प्रत्येकी 3 बळी वृत्तसंस्था/ लखनौ सुनील नरेनचे अर्धशतक तसेच सॉल्ट, रघुवंशी आणि रमनदीप सिंगच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सचा 98 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात 16 गुणासह आघाडीच्या स्थानावर झेप घेतली आहे. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद […]