कानडी संघटनांची कोल्हेकुई सुरूच
कन्नड संघटनांकडून मराठी-इंग्रजी फलक लक्ष्य : व्यापाऱ्यांची एकजूट असणे आवश्यक
बेळगाव : बेंगळूर पाठोपाठ बेळगावमध्येही कानडी संघटनांनी मराठी व इंग्रजी फलक लक्ष्य करणे सुरू केले आहे. मागील चार दिवसात मराठी भागामध्ये धुडगूस घालण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे. मराठी भाषिक व्यापारी, उद्योजक, संस्था यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असून या विरोधात आता मराठी भाषिकांची एकजूट महत्त्वाची आहे. सरकारी नियमाचा बाऊ करून इंग्रजी व मराठीतील फलक लावलेल्या व्यावसायिकांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न कानडी संघटना करीत आहेत. चार दिवसांपूर्वी बेळगाव शहरातील बापट गल्ली, शनिवार खूट, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली या भागातील दुकानांमध्ये शिरून सर्व नामफलक कन्नडमधून करण्यासाठी अरेरावी करण्यात आली. चार दिवसांचा वेळ देतो, त्यानंतर आमच्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ, असा धमकीवजा इशारा मराठी व्यापाऱ्यांना दिला जात आहे. बेळगाव शहर महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर असल्याने खरेदीसाठी अनेक जण बेळगावमध्ये येतात. त्यामुळे तेथील ग्राहकांसाठी दुकानांच्या फलकांवर कन्नडसह मराठी व इंग्रजी या भाषांमध्येही फलक लावणे गरजेचे असते. परंतु, कन्नड संघटनांमुळे व्यापारावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे व्यापारासाठी इतर गावांना निघून गेलेले बरे, असे म्हणण्याची वेळ व्यापारीवर्गावर आली आहे. मागील शेकडो वर्षांपासून बेळगावमध्ये व्यापारीपेठ आहे. परंतु, काही कन्नड संघटनांच्या म्होरक्यांनी बाजारपेठेतील मराठी व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे. तसेच मराठी भाषिकांच्या सहकारी बँका, सोसायट्या यांचे मराठी फलक काढण्यात आले. तसेच शुभेच्छा फलकांवरील मराठीही कन्नड संघटनांना खुपू लागली आहे. त्यामुळे आता मराठी व्यापारी तसेच नागरिकांनी आपली एकजूट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.
युवा समितीचे आज निवेदन
कन्नड संघटनांच्या अरेरावीमुळे बेळगावमध्ये भाषिक वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारांना खतपाणी घालू नये, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने सोमवार दि. 1 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा तसेच महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन दिले जाणार आहे. यावेळी युवा समितीचे सर्व पदाधिकारी, मराठी भाषिक तसेच व्यापाऱ्यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.
Home महत्वाची बातमी कानडी संघटनांची कोल्हेकुई सुरूच
कानडी संघटनांची कोल्हेकुई सुरूच
कन्नड संघटनांकडून मराठी-इंग्रजी फलक लक्ष्य : व्यापाऱ्यांची एकजूट असणे आवश्यक बेळगाव : बेंगळूर पाठोपाठ बेळगावमध्येही कानडी संघटनांनी मराठी व इंग्रजी फलक लक्ष्य करणे सुरू केले आहे. मागील चार दिवसात मराठी भागामध्ये धुडगूस घालण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे. मराठी भाषिक व्यापारी, उद्योजक, संस्था यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असून या विरोधात आता मराठी […]