राडा…ठिणगी…राजकारण…पण विकासाचं काय..? पाटील- महाडिक विसंवाद ठरतोय निव्वळ मनोरंजन

राजकारणाची पातळी घसरली जिरवाजिरवी भाषा हाच विकास संतोष पाटील कोल्हापूर मागील पंधरा वर्षात कोल्हापूरचे राजकारण सतेज पाटील आणि महाडिक गटाच्या कुरघोडीच्या राजकारणाभोवतीच फिरत आहे. राजाराम कारखाना एमडींना माराहाणाची राडा यानंतर पडलेली ठिणगीतून आरोप-प्रत्यारोप आणि वाक्युध्दाचे राजकारण सुरू आहे. दरवेळी प्रमाणे यंदाचे निवडणूक वर्ष असल्याने राजकारणाची पातळी अजून घसरुन जिरवाजिरवीची भाषा कोल्हापूरकरांच्या कानावर पडेल. विकासकामं आणि […]

राडा…ठिणगी…राजकारण…पण विकासाचं काय..? पाटील- महाडिक विसंवाद ठरतोय निव्वळ मनोरंजन

राजकारणाची पातळी घसरली जिरवाजिरवी भाषा हाच विकास

संतोष पाटील कोल्हापूर

मागील पंधरा वर्षात कोल्हापूरचे राजकारण सतेज पाटील आणि महाडिक गटाच्या कुरघोडीच्या राजकारणाभोवतीच फिरत आहे. राजाराम कारखाना एमडींना माराहाणाची राडा यानंतर पडलेली ठिणगीतून आरोप-प्रत्यारोप आणि वाक्युध्दाचे राजकारण सुरू आहे. दरवेळी प्रमाणे यंदाचे निवडणूक वर्ष असल्याने राजकारणाची पातळी अजून घसरुन जिरवाजिरवीची भाषा कोल्हापूरकरांच्या कानावर पडेल. विकासकामं आणि कोल्हापूरला अधिकाधिक निधी आणून एकमेकाला कमी दाखवण्याचा प्रयत्न झाला तरच कोल्हापूरच भल आहे. अन्यथा दरवेळीप्रमाणे हेही पाटील-महाडिक विसंवाद म्हणजे मागील पानावरुन पुढे गेलेला नवा अध्याय ठरेल.
राजाराम कारखाना उसतोडीच्या निमित्ताने कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना कसबा बावड्यात झालेल्या माराहाणीनंतर वातावरण तापले आहे. आतापर्यंत पंधरा वर्षात प्रत्येक निवडणुकांपूर्वी सतेज पाटील आणि महाडिक गटात त्याच-त्याच मुद्यांवर छेडणारे वाकयुद्ध कोल्हापूरच्या राजकारणाची घसरलेली पातळी दर्शविणारे होते, याचीच आता पुनर्रावृत्ती सुरू आहे. एकमेकाला बिटकुळ्या दाखवत जिरवाजिरवी भाषेतून शेतकऱ्यांच कोणत हित साधलं जातय ? एकमेकाला चिथावणी देण्यापेक्षा मी आता माझ्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्यात उसाला इतका दर देईन, हिंमत असेल तर तुम्ही जादा दर देऊन दाखवा. असे आव्हान शेतकऱ्यांना ऐकायला आवडेल. मी इतका निधी आणला तुम्हीही आणून दाखवा, मी कोल्हापूरचे हे प्रश्न यंदाच्या वर्षी तडीस लावणार आहे, हा रस्ता मी केलाय, तुम्ही पण दाखवा, हे कृतीतून बोलणे कोल्हापूरच्या हिताचे आहे. पाटील-महाडिक गटातील तोच तो वाद ऐकूण कोल्हापूरकरही आता शिनले आहेत.
ऊसतोडीच्या कारणाने कसबा बावड्यात जो काही राडा झाला त्याची यंत्रणेमार्फत चौकशी करुन कायद्याच्या कसोटीवर निर्णय झालाच पाहिजे, यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, निवडणूक वर्ष असल्याने राजारामच्या राड्याच्या निमित्ताने कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांत खुमखुमी निर्माण झाली आहे. ही पेटलेली धग, हे ध्रृवीकरण निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न राहिल. स्फोटक वातावरण जिह्याच्या हिताचे कसे ठरेल ? कोल्हापूचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, उसदर, आर्थिक स्थिती, आस्मानी संकट ही मालिका आहे तिथेच आहे. शहर एक मोठं खेड होत आहे. विकासकामांची इर्षा करता येत नसेल तर किमान राजकारण करताना समाजस्वास्थ बिघडणार नाही याची किमान दक्षता दोन्ही बाजूंच्या नेत्यांची घेण्याची गरज आहे.
एकमेकांत पडले अडकून
खासदार महाडिक यांना दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. अत्यंत अभ्यासपूर्ण वक्ता म्हणून त्यांची दिल्ली वर्तुळात ओळख आहे. आमदार सतेज पाटील यांचेकडे काँग्रेसपक्ष भविष्यातील राज्याचे नेतृत्व म्हणून पाहतोय. एखाद्या प्रकल्पासाठी पाठपुरावा कसा करायाचा, निधी कसा उपलब्ध करायचा, पक्षीय परिघाबाहेर जाऊन त्यासाठी मदत कशी मिळावायची यात दोघेही वाक्बार आहेत. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे दोघेही एका साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. साखर उद्योगाचा चांगला अभ्यास आहे. सतेज पाटील हे वसंतदादा पाटील शुगर इस्टिंट्युटमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून साखर उद्योगाबाबत चर्चा आणि विचारविनिमय करतात. तर साखर उद्योगाच्या अडचणीसाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात धनंजय महाडिक अग्रभागी असतात. असे असूनही राजाराम कारखानाच्या निमित्ताने राजकीय हवा तापवत ठेवत संघर्षाची किनार असणारे कुरघोडीचे राजकारण सोडून द्यायला हवे अशी अपेक्षा सुज्ञ कोल्हापुरकरांतून व्यक्त होत आहे.
चाणाक्ष राजकारणी
खासदार महाडिक व आमदार पाटील हे दोघेही अत्यंत चाणाक्ष राजकारणी आहेत. कोल्हापुरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आपणच कसे राहू याचाच ते विचार करीत असतात. एकमेकांवर टीका केल्यानंतर सोशल मिडीयासह प्रसारमाध्यमात त्याची मोठी चर्चा होते. आपोआपच हे दोघेच जिह्यात चर्चेचा विषय बनून जातात. कोण-कोणाला काय म्हटले? याची राज्यभर चर्चा होते. यानिमित्ताने सतत चर्चेत राहण्याची संधी दोघांना मिळते. मात्र, मोठी क्षमता असूनही हे दोघे एकमेकांतील राजकीय संघर्षात अडकून पडत आहेत. याऐवजी कोल्हापूरच्या विकासासाठी हा संघर्ष झाला तर बरे होईल हे सर्वसामान्यांना जे कळते ते या दोन चाणाक्ष नेत्यांना कळत नसले तर नवलच.