करवीरमध्ये निकालाचा जल्लोष व गुलालाची उधळण नाहीच; कार्यकर्ते अद्यापही स्व. पी. एन. पाटील यांच्या विरहात

शब्द पाळणाऱ्या नेत्याने जाता जाता ही दिलेला शब्द पाळल्याची भावना सांगरूळ /वार्ताहर लोकसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष आणि गुलालाची उधळण करवीरमध्ये झालीच नाही . करवीरचे आमदार स्वर्गीय पी एन पाटील – सडोलीकर यांच्या अचानक झालेल्या एक्झिटचा धक्का आणि त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली पोरकेपणाची भावना अद्यापही कायम असल्याचे जाणवत आहे .याचाच परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत […]

करवीरमध्ये निकालाचा जल्लोष व गुलालाची उधळण नाहीच; कार्यकर्ते अद्यापही स्व. पी. एन. पाटील यांच्या विरहात

शब्द पाळणाऱ्या नेत्याने जाता जाता ही दिलेला शब्द पाळल्याची भावना
सांगरूळ /वार्ताहर
लोकसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष आणि गुलालाची उधळण करवीरमध्ये झालीच नाही . करवीरचे आमदार स्वर्गीय पी एन पाटील – सडोलीकर यांच्या अचानक झालेल्या एक्झिटचा धक्का आणि त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली पोरकेपणाची भावना अद्यापही कायम असल्याचे जाणवत आहे .याचाच परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहू महाराज यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाचा कार्यकर्त्यांना आनंद झाला पण केवळ आणि केवळ पी एन साहेबांच्या विरहातून कार्यकर्ते अध्यापही सावरले नसल्याने कुठेही गुलालाची उधळण व जल्लोष दिसला नाही .
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज दीड लाखावर मताधिक्य घेऊन विजयी झालेत . मतमोजणी वेळी छत्रपती शाहू महाराजांची आघाडी वाढत जाईल तसा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाबाची उधळण करत जल्लोष सुरू केला जल्लोष सुरू केला .संपूर्ण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गुलालाची उधळण फटाक्याची आताषबाजी करत मोटरसायकलच्या रॅली काढत विजयोत्सव साजरा करत असताना करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते मात्र आपल्या नेत्याच्या आठवणीने गहिवरून गेला असल्याचे दिसत होते.
सुरुवातीच्या काळात महायुतीच्या विरोधात कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही अशी चर्चा सुरू असताना छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर करत महाविकास आघाडीने मोठी खेळी केली होती शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित करण्यात स्व. आमदार पाटील यांची महत्त्वची भूमिका राहिली. शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून स्व. आमदार पाटील प्रचारात आघाडी घेतली होती. पी एन पाटील म्हणजे निवडणूक कोणतीही असो एकदा शब्द दिला की त्यामध्ये काही बदल नाही हा ट्रेडमार्क जिल्हाभर प्रसिद्ध होता .प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्माचे पालन करत पी एन पाटील यांनी प्रामाणिकपणे आघाडीचा उमेदवाराचा प्रचार केला आहे .यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु होताच त्यांनी पायाला अक्षरशा भिंगरी बांधून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला . संपूर्ण करवीर विधानसभा मतदारसंघातील गावांचा त्यांनी वैयक्तिक संपर्क दौरा पूर्ण तर केलाच शिवाय शाहू महाराज यांच्यासोबतचा दौराही केला होता.विधानसभा मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवताना आमदार सतेज पाटील शिवसेना (उबाठा गट) राष्ट्रवादी शरद पवार गट आरपीआय व इतर मित्र पक्ष्यांचे कार्यकर्त्यांचे एकत्र मोट बांधून प्रचार यंत्रणा गतिमान केली होती . भोगावती करखाना कार्यक्षेत्रातील राधानगरीसह अन्य तालुक्यातील जाहीर सभाही त्यांनी केल्या होत्या. राधानगरीतही त्यांनी लावलेल्या जोडण्या कामी आल्या.
छत्रपतींच्या विजयाची जबाबदारी समजून त्यांनी प्रचारात कोणतीही कसूर राहणार नाही याकडे विशेष लक्ष दिले आणि प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. प्रचारादरम्यान त्यांनी करवीर विधानसभा मतदार संघाचे लीड हे सर्वांधिक असेल आणि विरोधकांना तोडता येणार नाही करवीरच्या मताधिक्यावर शाहू महाराज विजय होतील असे जाहीरपणे सांगितले होते. प्रचाराच्या दगदगीत त्यांनी आपल्या प्रकृतीकडे सुद्धा दुर्लक्ष केले आणि मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्यमय वातावरण ठेवले .
पण दुर्दैवाने निवडणूक निकालाच्या आधीच त्यांचे निधन झाले .रविवारी दोन जूनला त्यांचे उत्तरकार्य झाले त्या दिवसापासूनच त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडिया वरून व मोबाईल स्टेटस वरून ” गड येणार पण सिंह नसणार ” “विजय आपलाच होणार पण साहेब तुमची उणीव भासणार . असा मेसेज व्हायरल करत होते .
लोकसभेचा निकाल लागला आणि करवीर मधून छत्रपती शाहू महाराजांना मिळालेले ७१ हजार ९६० चे प्रथम क्रमांकाचे मताधिक्य मिळताच स्व .आमदार पाटील यांच्या वक्तव्याची जाणीव कार्यकर्त्यांना झाली आणि त्यांना आनंद झाला आणि तितकेच गहिवरून आले . आयुष्यभर राजकारणात नेहमी दिलेला शब्द पाळणारा आणि आपला शब्द खरा ठरवण्यासाठी वाटेल ती किंमत मोजणारा अशी प्रतिमा असणारा आपला नेता आयुष्याच्या शेवटी जाता जाता ही आपला शब्द खरा ठरवून गेला असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली .पी एन पाटील यांचा सहभाग असलेली कोणतीही निवडणूक असली तरी पहिला जल्लोष त्यांच्या गॅरेजवर होत होता .विजयाची चाहूल लागताच कार्यकर्ते गॅरेजवर जमा होत होत .पण यावेळी गॅरेजवर निरव शांतता दिसत होती . करवीरमध्ये कोठेही गुलालाची उधळण अथवा फटाक्यांची आतषबाजी दिसली नाही. विजय रॅली निघाली नाही .कार्यकर्त्यांनी आपला आनंद अबोल रूपातच व्यक्त केला .प्रचारामध्ये असणारी टोकाची ईर्षा निवडणुकीतील विजयानंतर कोठेच दिसली नाही .जनतेचे आपल्या नेत्याप्रती असणाऱ्या भावना व प्रेम किती होते हे यातून दिसून येतअसल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे .