यवलूज पोर्ले बंधाऱ्याची गळती शेतकऱ्यांच्या मुळावर! पिके कोमजली, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

कासारी नदीचे पात्र वारंवार कोरडे, चौदा गावातील शेतीसह पिण्याचा प्रश्न गंभीर उत्रे/ प्रतिनिधी यवलूज पोर्ले ( ता.पन्हाळा) या दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. यामुळे कासारी नदीचे पात्र कसबा ठाणे बंधाऱ्या पर्यंत वारंवार कोरडे पडते.सद्यस्थितीत नदीचे पात्र पुन्हा कोरडे पडले असून या बंधारा क्षेत्रात येणाऱ्या चौदा गावांतील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न […]

यवलूज पोर्ले बंधाऱ्याची गळती शेतकऱ्यांच्या मुळावर! पिके कोमजली, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

कासारी नदीचे पात्र वारंवार कोरडे, चौदा गावातील शेतीसह पिण्याचा प्रश्न गंभीर

उत्रे/ प्रतिनिधी

यवलूज पोर्ले ( ता.पन्हाळा) या दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. यामुळे कासारी नदीचे पात्र कसबा ठाणे बंधाऱ्या पर्यंत वारंवार कोरडे पडते.सद्यस्थितीत नदीचे पात्र पुन्हा कोरडे पडले असून या बंधारा क्षेत्रात येणाऱ्या चौदा गावांतील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे गेळवडे या प्रमुख धरणासह इतर पाच लघु प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असताना मात्र यवलूज पोर्ले बंधाऱ्याची गळती शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.
कासारी नदीला गेळवडे या मध्यम प्रकल्पासह,पडसाळी, नांदारी, पोंबरे, कुंभवडे, केसरकर या लघु पाटबंधारे प्रकल्पात पाणी पुरवठा केला जातो. या नदीवर उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत.या नदीवरील यवलूज पोर्ले हा शेवटचा बंधारा आहे. या बंधारा लाभ क्षेत्रात यवलूज, पडळ, सातार्डे, माजगाव, पोर्ले, खोतवाडी, देवठाणे, शिंदेवाडी, माळवाडी, उत्रे, पिंपळे, आळवे, वाघवें, गोलिवडे आदी चौदा गावांचा समावेश आहे. तीन वर्षांपूर्वी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाले होते . मात्र साठ वर्षापूर्वीचा हा दगडी बंधारा कमुकवत झाला असून बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. मुख्य धरणातून सोडलेलं पाणी पंचगंगेत वाहून जाते .यामुळे यवलूज ते कसबा ठाणे दरम्यान कसारीचे पात्र वारंवार कोरडे पडते. वारंवार नदीची पाणीपातळी खूपच खालावते. सद्यस्थितीत नदीचे पात्र पुन्हा जागोजागी कोरडे पडले आहे. कृषी पंपाचे ‘ फुटबॉल ‘ व सार्वजनिक नळ व हिलस्टेशन उत्रे ते पन्हाळा पाणी पुरवठा योजनेचे इंटेक चेंबर उघडे पडले आहेत. परिणामी चौदा गावातील पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. सर्वच पिकांना जादा पाण्याची गरज भासत असताना मात्र नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.ऐन मार्च महिन्यात अशी वाईट अवस्था आहे.ऊस, मका, सुर्यफुलाचे , भुईमूग आदी पिकांचे नुकसान होत आहे.
नदीची पाणी पातळी फारच खालावल्यामुळे कृषी पंपाचे फुटबॉल उघडे पडले आहेत. यामुळे पाण्याअभावी पिके वाळून जात आहेत. बंधारा दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा. व त्वरित पाणी न सोडल्यास आंदोलन चा इशारा देण्यात आला आहे.
दगडु गुरवळ खोतवाडी , बळीराम पाटील उत्रे