रिल्स स्टारमुळे कोल्हापूरकर वैतागले…रिल्सचा रोज रतीबच सुरु!
सुधाकर काशीद कोल्हापूर
बघून घेण्याची भाषा तर नित्याचीच. ऐकायलाही नको वाटतील, अशा घाणेरड्या शिव्या, गांजा, दारूच्या नशेचा अभिनय, महिलांबद्दल अनुद्गार, कारण नसताना देह प्रदर्शन आणि पांढऱ्या-तांबड्या रश्श्याशिवाय कोल्हापुरात दुसरं काही नाहीच, असे पेड कौतुक करणाऱ्या रील्स स्टारमुळे लोक अक्षरश: वैतागले आहेत. असे रिल्स करणारे देशभर जरूर आहेत. पण कोल्हापूर परिसरातील ठराविक रिल्स स्टारनी आपल्या मर्यादा अक्षरश: सोडल्या आहेत. हे असले रील्स पहायचे नाही, असे ठरवले तरी कुठून ना कुठून.., कोणत्या ना कोणत्या ग्रुपवरून हे .रिल्स धडाधड पडतच आहेत. यामागे त्यांच्या कमाईचाही एक भाग आहे. पण उठ-सूठ कोल्हापुरी भाषा वापरून कोल्हापूरची प्रतिमा हे काही ठराविक रिल्स स्टार खराब करत आहेत.
काही दिवसांपूर्वी अशा एकमेकाला खुन्नस देणाऱ्या रिल्समधून कोल्हापुरात पाठलाग करून एक खून झाला आहे. एक उमदा तरुण आपला जीव गमावून बसला आणि सात जणांच्या वाट्याला जेलची हवा आली आहे. घरातली कोवळी पोरं जेलमध्ये.., त्यामुळे त्यांच्या आई-बाबांची अवस्था वेड्यासारखी झाली आहे. रिल्समधले जग आणि वास्तवातले जग यातला भीषण फरक या तरुणांचे कुटुंबीय अनुभवत आहेत. तरीही अजून गोड भाषेत एकमेकाला दम देणे सुरूच आहे. व्राऱ्याने उडून जातील, अशा तब्ब्येतीची पोरं जग अंगावर घेण्याची भाषा करू लागली आहेत. पाच-सात झुरके मारले की अशी भाषा टपाटप त्यांच्या तोंडातून बाहेर येत आहे.
गांजा आणि दारू घेतली की जशी नशा येते, तसा अभिनय करत भावा.., काय इशेष.., काय इशेष.., असली भाषा यामध्ये वापरली जात आहे. कसलाही सामाजिक आशय नाही, कलात्मकता नाही, कोणताही ठोस विषय नाही. पण अशा रिल्स स्टारना आपण खूप लोकप्रिय झाल्यासारखे वाटत आहे आणि त्यांनी रिल्स अक्षरश: टाकणे सुरू केले आहे. हे रिल्स स्टार., स्टार्टर फक्त घाणेरड्या शिव्यावरच दिवसाला एक-दोन रिल्स टाकत आहेत. ज्या शिव्या कानाला ऐकूही शकणार नाही, अशा शिव्या ते सहज देतात. एकमेकांच्या आईचा तर क्षणाक्षणाला उद्धार करतात. आपण शिव्या देतो, याचे तर त्यांना काही वाटतंच नाही. पण आपल्या शिव्या लोकांना ऐकाव्या लागतात, याबद्दल काही खंतही वाटत नाही. विशेष हे की त्यांची ‘लोकप्रियता’ पाहून त्यांना जाहिरातीची संधी मिळू लागली आहे.
महिलांचा अवमान किंवा महिलांवर विनोद हा काही रिल्सवाल्यांचा आवडता विषय आहे. रिल्समध्ये नवरा-बायकोंना थेट, तुम्ही एकमेकाला शोभत नाही, मग कसा काय इतके वर्ष संसार केला? असले प्रश्न विचारून अवमानित केले जात आहे. या रिल स्टारला तर राजकारणाची स्वप्ने पडली आहेत. आपले रील लोक पाहतात म्हणजे आपण फार लोकप्रिय आहोत, कोणाचीही टर आपण उडवू शकतो, अशी त्यांची समजूत आहे.
कोल्हापूर मांसाहारासाठी जरूर प्रसिद्ध आहे आणि इथल्या मांसाहारी जेवणाची मूळ चव फक्त कोल्हापुरातील गृहिणींच्याच हातात आहे. पण काही ठराविकांनी पेड रिल्स स्टार आपल्या प्रचारासाठी ठेवले आहेत. जे कोल्हापुरी जेवण चवदार आहे, अस्सल आहे.., त्याला रील्स स्टारची गरजच भासत नाही. त्या हॉटेलसमोर रोज खवैयांची र्लईन असते. जेवण संपले, असा बोर्ड रात्री दहालाच लावावा लागतो. पण काही रिअल स्टारनी नको तशी कोल्हापुरी भाषा वापरत पांढऱ्या-तांबड्याची मूळ रंगतच घालवली आहे. कोल्हापुरात अशा पांढऱ्या-तांबड्यांचा रतीब सुरू आहे.
अतिशय वाईट रिल्समुळे काल, परवा दोन कुटुंबांची अक्षरश: वाताहत झाली आहे. त्यांना जगासमोर तोंड वर करणे अशक्य झाले आहे. आता गुन्हा नोंद झाला आहे. तो गुन्हा सिद्ध होईल, नाही होईल.., हा पुढचा भाग आहे. पण आता दोन्ही कुटुंबातील लोक क्षणाक्षणाला बदनामीची नको तेवढी शिक्षा भोगत आहेत.
महापालिका, विधानसभा निवडणुकाजवळ आल्यामुळेही काही रिल्समध्ये इच्छुक उमेदवार स्टार म्हणून आले आहेत. रोज त्यांचे उपदेश ऐकावे लागत आहेत. ‘मलाच सारे कळते..’ अशी त्यांची भाषा आहे. असे रील्स करण्यात काही चूक नाही. ती एक त्यांना प्रचाराची संधी आहे. पण रोज मोबाईल उघडला, की असे उपदेश म्हणजे ‘मत देतो पण उपदेश आवर..’ असे म्हणायची वेळ शहरवासियांवर आली आहे.
रिल्स पाहणे किंवा न पाहणे हे आपल्याच हातात आहे. पण कोल्हापुरात कुठून ना कुठून असले रिल्स प्रत्येकाच्या मोबाईलवर येतातच. पाहायचे नाही ठरवले तरी ते धडाधड येतच राहतात. एखादा तरी रिल्स त्यामुळे नजरेतून नजरेखालून जातोच.