शाहू महाराजांच्या विजयाने महायुतीचे वाढले ‘टेन्शन’; अगामी विधानसभा निवडणुकीत करावा लागणार संघर्ष
मातब्बर नेत्यांची फौज तरीही पदरी पराभव; सहाही विधानसभा मतदार संघात शोधावी लागणार कारणे
धीरज बरगे कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून आव्हानात्मक परिस्थितीतूनही तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मिळविलेला विजय महायुतीसाठी टेन्शन वाढविणारा आहे. लोकसभा मतदार संघातंर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघातील मातब्बर नेत्यांची फौज महायुतीच उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी असतानाही महायुतीला पराभव स्विकारावा लागला. हा पराभव अवघ्या चार महिन्यांवर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला संघर्ष करायला लावणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वर्चस्व मिळविण्यासाठी महायुतीला आत्तापासूनच पराभवाची कारणे शोधून त्यांचा निपटारा करावा लागणार आहे.
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर जिल्ह्यात महायुती बळकट झाली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के.पी.पाटील, चंद्रदीप नरके, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे असे दिग्गज नेते महायुतीच्या छत्राखाली एकवटले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तसे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे पारडे जड मानले जात होते. तरीही त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे हा पराभव जिल्ह्यातील महायुतीला आत्मचिंतन करायला लावणार आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणेच उमदेवारी देतानाच महायुतीची होणारी दमछाक पाहता विधानसभा निवडणुक महायुतीसाठी संघर्षमय आणि आव्हानात्मक असणार आहे.
तीन नेते एकत्र तरीही कागलमध्ये अपेक्षाभंग
हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, समरजित घाटगे हे कागल तालुक्यातील तीनही प्रमुख नेते महायुतीमध्ये आहेत. गतनिवडणुकीत मंडलिक यांना मुश्रीफ सोबत नसतानाही कागलमधून सुमारे सत्तर हजारांचे मताधिक्य मिळाले होत. या निवडणुकीतही कागल विजयी मताधिक्य देणार अशी अपेक्षा होती. मात्र कागलमध्येच अपेक्षाभंग झाला असून घटलेले मताधिक्यच मंडलिक यांच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. अगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. तसेच मतदारांचा कौल समरजित घाटगे यांनाही विचार करालया लावणार आहे.
चंदगडमध्येही आव्हानात्मक परिस्थिती
कागल पाठोपाठ चंदगडही मोठे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा महायुतीला होती. विद्यमान आमदार राजेश पाटील, शिवाजी पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, अशोक चराटी, सुधीर देसाई, संग्रामसिंह कुपेकर असे नेत मंडलिकांच्या प्रचारात होते. गतनिवडणुकीत येथून मंडलिकांना 52 हजारांचे मताधिक्य होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत चंदगडने महाराजांना साथ दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी चंदगडमध्ये आव्हानात्मक परिस्थिती असणार आहे.
राधानगरीत दिग्गज नेत्यांची मांदियाळी तरीही पिछेहाट
राधानगरी-भुदरगड मतदासंघातून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के.पी.पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल देसाई अशा दिग्गज नेत्यांची मांदियाळी मंडलिकांसोबत होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून महायुतीमध्येच अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. तसेच येथील नागरिकांनीच हि निवडणुक हातामध्ये घेतल्याने राधानगरीतून मंडलिक यांची मोठी पिछेहाट झाली. त्यामुळे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांना विधानसभेसाठी मोठयाप्रमाणात परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
शिवसेनेतील बंडखोरीचा करवीरमध्ये फटका
शाहू छत्रपती यांना करवीरमधून सर्वाधिक 72 हजारांचे मताधिक्य मिळाले. यामध्ये स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचसोबत शिवसेनेतील बंडखोरीचाही महायुतीला फटका बसला आहे. येथे ठाकरे गटाचे सुमारे चाळीस हजारांहून अधिक मतदान आहे. हे मतदान महाराजांच्या पारड्यात पडले. तसेच गोकुळचे संचालक चेतन नरके हे देखिल महाविकास आघाडीमध्ये गेल्याने येथील नरके गटातही दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासाठी विधानसभा निवडणुक आणखी आव्हानात्मक बनली आहे.
बालेकिल्ल्यातही करावा लागणार संघर्ष
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकासच्या उमेदवार काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्या प्रचारात शिवसेना, राष्ट्रवादी होती. या निवडणुकीत जाधव यांचा सुमारे पंधरा हजारहुन अधिक मताधिक्याने विजय झाला. मात्र बंडखोरीनंतर लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक महायुतीसोबत गेले. तरीही मंडलिक यांची उत्तरमधून पिछेहाट झाली. विधानसभा निवडणुकीत हि जागा शिवसेनेकडे जाणारा का भाजपकडे हे आत्ता सांगणे कठीण असले तरी उत्तरच्या बालेकिल्ल्यात महायुतीला विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
दक्षिणमध्ये महायुतीच्या आशा पल्लवीत
दक्षिणमधील राजकारण हे पाटील व महाडिक गट असेच राहिले आहेत. गत निवडणुकीत आमचं ठरलयं म्हणत आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांना पाठींबा देत दक्षिणमधून सुमारे 46 हजारांचे मातधिक्य दिले. तर यानंतर झालेल्या 2019च्या विधानसभा निवडणुकीतही पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांचा सुमारे 42 हजार मतांनी पराभव केला. यंदाच्या निवडणुकीतही आमदार सतेज पाटील यांचे वर्चस्व असलेल्या दक्षिणमधून शाहू छत्रपती यांना मेठे मताधिक्य मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी खासदार मंडलिक यांच्यासाठी दक्षिणमध्ये प्रचंड कष्ट घेतल्याने महाराजांना येथून केवळ सहा हजारचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवणुकीत दक्षिणमध्ये महायुतीच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Home महत्वाची बातमी शाहू महाराजांच्या विजयाने महायुतीचे वाढले ‘टेन्शन’; अगामी विधानसभा निवडणुकीत करावा लागणार संघर्ष
शाहू महाराजांच्या विजयाने महायुतीचे वाढले ‘टेन्शन’; अगामी विधानसभा निवडणुकीत करावा लागणार संघर्ष
मातब्बर नेत्यांची फौज तरीही पदरी पराभव; सहाही विधानसभा मतदार संघात शोधावी लागणार कारणे धीरज बरगे कोल्हापूर कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून आव्हानात्मक परिस्थितीतूनही तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मिळविलेला विजय महायुतीसाठी टेन्शन वाढविणारा आहे. लोकसभा मतदार संघातंर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघातील मातब्बर नेत्यांची फौज महायुतीच उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी असतानाही महायुतीला […]