टाईमलाईननुसार विकासकामे करणार; नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती

कोल्हापूर प्रतिनिधी जिल्ह्यातील पायाभूत विकासकामांचा संबंधित विभागाकडून आढावा घेऊन टाईमलाईननुसार काम करण्यास प्राधान्य राहिल असे नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. गुरुवारी अमोल येडगे यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याकडून पदभार स्वीकारला. राज्य शासनाकडून बुधवारी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश झाले. यामध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल […]

टाईमलाईननुसार विकासकामे करणार; नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती

कोल्हापूर प्रतिनिधी

जिल्ह्यातील पायाभूत विकासकामांचा संबंधित विभागाकडून आढावा घेऊन टाईमलाईननुसार काम करण्यास प्राधान्य राहिल असे नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. गुरुवारी अमोल येडगे यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याकडून पदभार स्वीकारला.
राज्य शासनाकडून बुधवारी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश झाले. यामध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. तर कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अमोल येडगे यांची नियुक्ती झाली. गुरुवारी नूतन जिल्हाधिकारी येडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संबधित विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोल्हापूरातील विकासकामे आणि पायाभूत सुविधाबद्दल येडगे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, कोल्हापूरात जिल्ह्यातील प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेऊन ते पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न राहिल. कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पादक आहे. शेती उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगात वाढ करणार. तसेच जिल्ह्याला नैसर्गिक संपदा लाभली आहे.येथे श्री अंबाबाई मंदिर आहे. यामुळे पर्यटनाला संधी असून पर्यटनावाढीला चालना देणार. जिल्ह्याचा सांख्यिकी आराखडा तयार करुन दरडोई उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न राहिल.
कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न महत्वाचा आहे. जिल्हयात कायम शांतता राहण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनात समन्वय ठेवला जाईल. तर कायदा व सुव्यस्थेचा बिघडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच प्रशासनातील सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे अशी अपेक्षा असून यासाठी वेळोवेळी आढावा घेतला जाईल असे जिल्हाधिकारी येडगे म्हणाले. कोल्हापूरच्या जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीला प्राधान्य
पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना विचारले असता ते म्हणाले, आतापर्यंत कोणत्या उपाय योजना केल्या आहेत यासंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करुन माहिती घेऊ.त्यानंतर शासनाकडून येणाऱ्या निर्देशांचे पालन करुन नदी प्रदूषणमुक्त करु.