बहिरेश्वरचे कुस्तीमैदान माऊलीने मारले! हरियाणाच्या सोनू कुमावर लवंदर घिस्सा डावावर विजय

मैदानात शंभरावर प्रेक्षणीय कुस्त्या सांगरुळ / वार्ताहर करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे झालेल्या बेमुदत निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत महान भारत केसरी पै. माऊली जमदाडे (ता.गंगावेश ) यांनी व हरियाणा केसरी पै सोनू कुमार ( हरियाना )यांच्यावर पाचव्या मिनिटाला लवंदर घिस्सा डावावर प्रेक्षणीय विजय मिळविला .माऊलीला एक लाख रुपये इनाम व चषक देऊन गौरवण्यात […]

बहिरेश्वरचे कुस्तीमैदान माऊलीने मारले! हरियाणाच्या सोनू कुमावर लवंदर घिस्सा डावावर विजय

मैदानात शंभरावर प्रेक्षणीय कुस्त्या

सांगरुळ / वार्ताहर

करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे झालेल्या बेमुदत निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत महान भारत केसरी पै. माऊली जमदाडे (ता.गंगावेश ) यांनी व हरियाणा केसरी पै सोनू कुमार ( हरियाना )यांच्यावर पाचव्या मिनिटाला लवंदर घिस्सा डावावर प्रेक्षणीय विजय मिळविला .माऊलीला एक लाख रुपये इनाम व चषक देऊन गौरवण्यात आले .बहिरेश्वर येथे प्रथमच झालेल्या या कुस्ती मैदानात शंभरावर चटकदार प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या.

पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान सोनू कुमार यांच्यातील प्रथम क्रमांकाच्या लढतीस सायंकाळी आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी पै . बाजीराव कळंत्रे वस्ताद केतन बुवा राम साठे बाबू गोसावी व योगेश गोसावी या मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला . सलामी झडताच सुरुवातीलाच माऊलीने हप्ते भरण्याचा प्रयत्न केला .सावध सोनुने तो धूडकान लावत माऊलीला टांग लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला . कुस्तीच्या दुसऱ्याच मिनिटाला माऊलीने छडी टांग मारण्याचा प्रयत्न केला . आक्रमक होत माऊली जमदाडेनी सोनू कुमारचा एकेरी पट काढून ताबा घेतला मानेचा कस काढत इराणी एकलंगी डावाची पकड धरत मानेचा कस काढत हाताची सांड काढण्याचा प्रयत्न केला . कुस्तीच्या पाचव्या मिनिटाला माऊलीने लवंदर घिस्सा डावावर सोनू कुमारला चितपर केले .
द्वितीय क्रमांकाच्या लढतील गंगावेस तालमीच्या इंद्रजीत मोळे यांनी सांगलीच्या सुनील यादव वर पोकळ घिस्सा डावावर चटकदार विजय मिळविला द्वितीय क्रमांकाची अतुल डावरे (मोतीबाग ) विरुद्ध अभिजीत शेंडे (गंगावेश ) ही दुसरी कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली .तृतीय क्रमांकाच्या लढतीत युवराज पाटील कुस्ती संकुलच्या प्रवीण पाटील यांनी मोतीबाग तालमीच्या सुभाष पाटील यांच्यावर कलाजंग डावावर विजय मिळवला द्वितीय क्रमांकाची दुसरी लढत ओंकार पाटील (मोतीबाग ) व संकेत पाटील (गंगावेश ) बरोबरीत सोडवण्यात .आली चार नंबरच्या लढतीत युवराज पाटील कुस्ती संकुलच्या धीरज माने यांनी गंगावेश तालमीच्या तानाजी मेढेवर गुणावर विजय मिळविला
या कुस्ती मैदानात आर्यन सावंत ,संस्कार गोसावी ,साहिल गोसावी ,प्रणव खाडे अविष्कार सावंत, सोहम चौगले या स्थानिक पैलवानांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यावर चटकदार विजय मिळवले. ओंकार कुंभार ( म्हारुळ ) अनुज घुंगुरकर पृथ्वीराज चव्हाण (सांगरूळ ) यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यावर प्रेक्षणीय विजय मिळविले.
पंच म्हणून राजाराम पाटील विकास पाटील दत्ता पाटील बाजीराव कळंत्रे साळवी वस्ताद यांनी काम पाहिले.
बहिरेश्वर येथील श्री सदगुरु मठ तालीम व वेताळ तालीम मंडळाच्या वतीने कै पै दामू बुवा कै पै आनंदा सावंत कै पै आदित्य दिंडे कै पै महादेव गोसावी कै पै बापू गोसावी यांचे स्मरणार्थ हे मैदान आयोजित केले होते. यावेळी कृष्णात गोसावी महादेवगिरी गिरीगोसावी दगडू गोसावी सरपंच वंदना दिंडे सूर्यकांत दिंडे तानाजी गोधडे पी आर पाटील यांचेेेसह मैदानाचे देणगीदार गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व कुस्ती शौकीन उपस्थित होते .निवेदन दीपक वर्पे यांनी केले.
माऊलीची दमदार एन्ट्री
महान भारत केसरी माऊली जमदाडे यांची आखाड्यात होणारी एंट्री ही कुस्ती शौकिनांच्या मनाला भूरळ घालणारी असते . माऊलीचा मैदानात होणारा प्रवेश हा कुस्ती शौकिनांच्यात चर्चेत असतो . माऊलीची आखाड्यामध्ये झालेली एन्ट्री व मारलेला जोरदार शड्डू याला कुस्ती शौकिनानी टाळ्यांच्या गजरात जल्लोष करत प्रतिसाद दिला .