‘अपहरणाचा बनाव’ : सायबर गुन्हेगारांचा नवा डाव
पाल्याचे अपहरण केल्याचा बनावट फोन कॉल : पालकांनी धीर सोडता कामा नये, प्रसंगावधान राखत फसवणूक टाळावी, खबरदारी घेण्याचे आवाहन
रमेश हिरेमठ /बेळगाव
डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढले आहेत. सायबर गुन्हेगारांनी यापूर्वी तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये अमलीपदार्थ व जिवंत काडतुसे आहेत, तुम्हाला अटक करण्यासाठी पोलीस आणि नार्कोटिक्स विभागाचे पथक तुमच्या घरी येत आहे, असे सांगत सावजाकडून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार घडले आहेत. आता गुन्हेगारांनी गुन्ह्याची पद्धत बदलली आहे. पोलीस दलासमोर सायबर गुन्हेगारांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शनिवारी 6 जुलै रोजी बेंगळूर येथे राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीतही सायबर गुन्हेगारीचे आव्हान कसे पेलायचे? या विषयी विचार झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट स्कॅम नावाची पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली आहे.
सायबर गुन्हेगारांनी अत्यंत भावनिक विषयाला हात घालून सावजाला लुटण्याचे प्रकार सुरू केले आहेत. तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे अपहरण झाले आहे. त्यांची सुखरुप सुटका हवी असेल तर आम्ही सांगतो त्या खात्यावर सांगेन तितकी रक्कम जमा करा. नहून तुमच्या पाल्याचा बळी घेतला जाईल, असे धमकावण्यात येत आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यातील अनेक पालकांना सायबर गुन्हेगारीच्या या नव्या प्रकारामुळे जबर धक्का बसला आहे. शनिवार दि. 22 जून रोजी अन्नपूर्णावाडी येथील इमामहसन हलकर्णी यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअॅप कॉल आला. नंबर अनोळखी होता. त्यामुळे इमामहसन यांनी तो फोन कॉल उचलला. तुमच्या मुलाचे अपहरण झाले आहे. बलात्कार प्रकरणात तो अडकला आहे. त्यामुळेच आम्ही त्याचे अपहरण केले आहे. आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही. तो तुम्हाला जिवंत हवा असेल तर आम्ही सांगतो त्या खात्यावर एक लाख रुपये जमा करा, असे सांगण्यात आले.
एकुलत्या एक मुलाचे अपहरण झाले आहे. आपण पैसे भरले नाहीत तर मुलाचा खून होणार. आता आपले जीवनच उद्ध्वस्त होणार, या विचाराने इमामहुसेन यांना अक्षरश: घाम फुटला. आपल्याजवळ सध्या एक लाख रुपये नाहीत. दहा हजार रुपये आहेत. ही रक्कम तुमच्या खात्यात जमा करतो. उर्वरित रक्कम जमविण्यासाठी थोडासा वेळ द्या, अशी विनवणी करीत मुलाला काही करू नका, असे रडकुंडीला येऊन सांगितले. गुन्हेगारांशी बोलणी सुरू असताना इमामहसन यांच्या पत्नीने बाहेर गेलेल्या आपल्या मुलाला फोन लावला. त्याने तो उचलला. इतके काय घाबरलात? थोड्या वेळात मी घरी येतो, असे मुलाने सांगितल्यामुळे कोणी तरी पैशासाठी हे कृत्य केल्याचे त्यांच्या लक्षात आले. या धक्क्यातून सावरण्यासाठी या कुटुंबीयांना एक-दोन दिवस लागले.
आमच्या खात्यावर रक्कम जमा करा
शुक्रवार दि. 28 जून रोजी आणखी एक घटना घडली. शिवबसवनगर परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या वडिलांना फोन कॉल गेला. तुमच्या मुलीचे आम्ही अपहरण केले आहे. तिची सुखरुप सुटका करायची असेल तर आमच्या खात्यावर रक्कम जमा करा, अशी तंबी देण्यात आली. परीक्षा देण्यासाठी कॉलेजला गेलेल्या मुलीच्या अपहरणाची घटना ऐकून वडिलांना धक्का बसला. त्यांनी तातडीने मुलीच्या कॉलेजकडे धाव घेतली. कॉलेजला पोहोचण्याआधी कुटुंबीयांनी प्राचार्यांशी संपर्क साधून आमच्या मुलीचे अपहरण झाल्याचा फोन कॉल आला आहे. मुलगी कॉलेजमध्ये आहे का? अशी विचारणा केली. कॉलेजमधील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनाही अपहरणाची माहिती ऐकून धक्का बसला. ते धावत क्लासरुमकडे गेले. ती विद्यार्थिनी परीक्षा लिहीत होती. त्यामुळे अपहरणाचा तो कॉल फ्रॉड असल्याचे स्पष्ट झाले.
प्रसंगावधानामुळे फसवणूक टळली
मंगळवार दि. 2 जुलै रोजी अशाच प्रकारच्या एका फोन कॉलने केएलई इस्पितळामध्ये कँटीन चालविणाऱ्या भारती पावड्यान्नावर यांना सायबर गुन्हेगारांनी घाम फोडला. सायंकाळी त्या घरकामात असताना सायबर गुन्हेगारांचा त्यांना फोन आला. तुमच्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. तिच्या सुटकेसाठी आम्ही सांगतो त्या खात्यावर रक्कम जमा करा, असे सांगण्यात आले. भारती यांनी मोठ्या धाडसाने या गुन्हेगारांशी संभाषण करून त्यांना परतावले. भारती यांच्या बहिणीने प्रसंगावधान राखून कॉलेजला गेलेल्या मुलीला फोन करून ती कॉलेजमध्येच असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्यांनाही फसवणुकीचा हा प्रकार असल्याचे लक्षात आले.
एफआयआर कशाला?
बेळगाव शहर व परिसरात असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. अशा घटनांनंतर सायबर क्राईम विभागात केवळ माहिती दिली जात आहे. आमची फसवणूक झाली नाही, एफआयआर कशाला दाखल करायचे? म्हणत कोणी एफआयआर दाखल केला नाही. सायबर क्राईम विभागातील अधिकाऱ्यांनाही डिजिटल अरेस्टच्या या नव्या प्रकाराबद्दल माहिती आहे. त्यामुळेच तुमची फसवणूक व्हायची नसेल तर खबरदारी घ्या, असे आवाहन हे अधिकारी करू लागले आहेत.
फ्रॉड कॉल आल्यास हे करा…
तुमच्या मुलाचे अपहरण झाले आहे, असा फोन कॉल आला तर त्यांच्याशी धाडसाने बोला
गुन्हेगारांशी बोलणे सुरू असतानाच मुलगा-मुलगी कोठे आहे? याची खात्री करून घ्या
खंडणी मागत असतील तर लगेच सायबर क्राईम विभागाच्या 1930 या हेल्पलाईनशी संपर्क साधा
तुमच्या मुलाला जिवंत सोडणार नाही, असे सांगताना भलतीच मुले रडतानाचे आवाज गुन्हेगार ऐकवतात. तेव्हा धीर सोडू नका.