बेंगळूरच्या विकासात केंपेगौडांचे योगदान

बेंगळूरच्या विकासात केंपेगौडांचे योगदान

बेंगळूरचा विकास करण्याचे स्वप्न उतरविले सत्यात : कुमार गंधर्व रंगमंदिरात जयंती कार्यक्रम
बेळगाव : केंपेगौडा हे विजयनगर साम्राज्याच्या व्याप्तीत येणाऱ्या यलहंकाचे रखवालदार होते. हंपीचे वैभव पाहून यलहंका शहराचा विकास करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यानुसार त्यांनी बेंगळूर महानगर निर्माण केले. जगामध्येच सर्वाधिक तलाव असणारे शहर म्हणून बेंगळूरकडे पाहिले जाते. बेंगळूरच्या सर्वांगीण विकासामध्ये केंपेगौडा यांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले.जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि सांस्कृतिक खाते, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार गंधर्व रंगमंदिरमध्ये गुरुवारी केंपेगौडा जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, तरुणांनी केंपेगौडा यांची दूरदृष्टी, कर्तृत्व आत्मसात करणे आवश्यक आहे. देशातील महान नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. अशा महान नेत्यांचे जीवनचरित्र समजावून घेऊन ते आत्मसात करावे.
आपल्या कर्तृत्वाने देशाला अभिमान वाटावा असे कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष देऊन आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शिक्षण हेच आपले शस्त्र असून उच्चशिक्षण घेऊन देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले. यावेळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी केंपेगौडा यांच्या योगदानाची माहिती देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग, पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या हस्ते केंपेगौडा यांच्या जीवनचरित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी केंपेगौडा यांच्या भावचित्राची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, कन्नड आणि सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.