केजरीवालचे गोवा ‘कनेक्शन’ उघड

पालेकर, रामराव, दत्तप्रसाद, अशोक नाईक यांना समन्स : चौकशीसाठी आज उपस्थित राहण्याचा ईडीचा आदेश पणजी : अरविंद केजरीवाल यांच्या मद्य घोटाळ्याचे गोवा कनेक्शन असल्याचा संशय बळावल्यानंतर राज्यातील अनेकांचे धाबे दणाणले होते. दिल्लीतील मद्य घोटाळ्यातून मिळालेल्या रक्कमेचा काही भाग गेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तब्बल 45 कोटी ऊपयांचा गोव्यात […]

केजरीवालचे गोवा ‘कनेक्शन’ उघड

पालेकर, रामराव, दत्तप्रसाद, अशोक नाईक यांना समन्स : चौकशीसाठी आज उपस्थित राहण्याचा ईडीचा आदेश
पणजी : अरविंद केजरीवाल यांच्या मद्य घोटाळ्याचे गोवा कनेक्शन असल्याचा संशय बळावल्यानंतर राज्यातील अनेकांचे धाबे दणाणले होते. दिल्लीतील मद्य घोटाळ्यातून मिळालेल्या रक्कमेचा काही भाग गेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तब्बल 45 कोटी ऊपयांचा गोव्यात वापर झाल्यामुळे ईडीने केजरीवाल यांच्या ‘आप’चे गोव्यातील नेते अमित पालेकर, भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, भाजपचे कार्यकर्ते तथा मद्य व्यवसायिक दत्तप्रसाद नाईक, रामराव वाघ यांना समन्स पाठवले आहे. मनस्वीनी नामक एका कार्यकर्तीचेही नाव या मद्य घोटाळाप्रकरणी घेण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यातील पत्रकारिता क्षेत्रातही खळबळ माजली आहे.
आज हजर राहण्याचा आदेश
पालेकर, अशोक नाईक, दत्तप्रसाद नाईक, वाघ या चौघांना समन्स पाठवून   आज 28 रोजी ईडीच्या पणजी पाटो येथील कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचा आदेश ईडीने दिला आहे. याप्रकरणी मनस्वीनी हे नाव चर्चेत  आघाडीवर आल्याने एक दोन दिवसांत त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
तब्बल 45 कोटी गोव्यात?
आम आदमी पक्षाने दिल्ली येथे मद्याद्वारे करोडो ऊपयांचा घोटाळा केल्याचे दिल्लीतील न्यायालयात सुनावणी दरम्यान उघड झाले आहे. त्यानंतर देशातील अनेक राज्यांत चौकशी करण्यात येत आहे. या मद्य घोटाळ्यातील 45 कोटी ऊपये गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने वापरल्याचा ठपका ठेवून चौघांना समन्स पाठवले आहेत. दिल्ली सरकारने मद्यासाठी उत्पादन शुल्क धोरण आखून ते राबविले. त्यातून सुमारे 100 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. त्यातील 45 कोटी ऊपये गोव्यात विधानसभा निवडणुकीवेळी वापरल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. त्या अनुषंगाने गोव्यात आता संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. गोव्यातील 2022 मधील आपचे उमेदवार आणि विजयी उमेदवार यांची चौकशीही ईडीतर्फे होण्याची शक्यता आहे.
दीपक संधाला यांच्या घरावर ईडीचे छापे
आम आदमी पक्षाचे दिल्लीचे नेते दीपक संधाला यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे मारून त्यांची चौकशी सुरू केली आहे. दिल्लीच्या मद्य घोटाळ्यातील मोठी कोट्यावधीची रक्कम गोव्यात पाठवण्यात आली आणि ती आपने 2022 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी वापरली. त्यावेळी संधाला हे गोवा ‘आप’चे प्रमुख निरीक्षक प्रभारी होते. ती रक्कम त्यांच्याकडून गोव्यात पाठवली काय ? याची चौकशी करण्यासाठी हे छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ते प्रभारी म्हणून त्यावेळी अनेकदा गोव्यात आले होते. मद्य घोटाळा आणि गोव्यात पाठवलेली रक्कम या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.