पंजाबमध्ये ‘इंडिया’ला केजरीवालांचा झटका

राज्यातील सर्व जागा ‘आप’ लढवणार : 10-15 दिवसात उमेदवारांची घोषणा वृत्तसंस्था/ चंदीगड आम आदमी पार्टी पंजाबमधील सर्व 13 लोकसभा आणि चंदीगडमधील एका जागेवर उमेदवार देणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सांगितले. केजरीवाल यांच्या या पवित्र्यामुळे राज्यात विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा झटका बसला आहे. आम आदमी पार्टी येत्या 10-15 दिवसात पंजाबमधील सर्व जागांवर उमेदवारांची […]

पंजाबमध्ये ‘इंडिया’ला केजरीवालांचा झटका

राज्यातील सर्व जागा ‘आप’ लढवणार : 10-15 दिवसात उमेदवारांची घोषणा
वृत्तसंस्था/ चंदीगड
आम आदमी पार्टी पंजाबमधील सर्व 13 लोकसभा आणि चंदीगडमधील एका जागेवर उमेदवार देणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सांगितले. केजरीवाल यांच्या या पवित्र्यामुळे राज्यात विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा झटका बसला आहे.
आम आदमी पार्टी येत्या 10-15 दिवसात पंजाबमधील सर्व जागांवर उमेदवारांची घोषणा करेल. पंजाबच्या मतदारांनी दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत 117 पैकी 92 जागा ‘आप’च्या पारड्यात टाकत इतिहास घडवला होता. त्याचीच पुनरावृत्ती करत राज्यातील लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘आता आणखी एक आशीर्वाद घेण्यासाठी हात जोडून तुमच्याकडे आलो आहे’ असे आवाहन केजरीवाल यांनी पंजाबवासियांना केले आहे.
जनतेला संबोधित करताना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यात होतील. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 14 जागा आहेत. येत्या 10-15 दिवसांत आप या सर्व 14 जागांवर आपले उमेदवार जाहीर करेल. या सर्व जागांवर आम आदमी पक्षाला विजय मिळवून द्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागावाटप चर्चेत प्रगती नसल्याने…
केजरीवाल यांच्या या टिप्पणीवरून पंजाबमधील जागावाटपाबाबत आप आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत प्रगती झालेली दिसत नाही. गेल्या महिन्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही आप पक्ष पंजाबमधील सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. पंजाब आणि दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी गेल्या महिन्यात चंदीगडच्या महापौरपदाची निवडणूक एकत्र लढवली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही युती करण्याचे संकेत दिले होते. मात्र, आता केजरीवाल यांच्या वक्तव्यावरून पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.