पडझडीनंतर जुरेल, कुलदीपने सावरला डाव

दिवसअखेरीस भारताच्या 7 बाद 219 धावा : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, शोएब बशीरचे 4 बळी वृत्तसंस्था/ रांची भारत व इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस साहेबांनी गाजवला. पहिल्या डावात 353 धावा केल्यानंतर इंग्लिश संघाने शानदार गोलंदाजी जोरावर टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 73 षटकांत 7 बाद 219 धावा केल्या […]

पडझडीनंतर जुरेल, कुलदीपने सावरला डाव

दिवसअखेरीस भारताच्या 7 बाद 219 धावा : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, शोएब बशीरचे 4 बळी
वृत्तसंस्था/ रांची
भारत व इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस साहेबांनी गाजवला. पहिल्या डावात 353 धावा केल्यानंतर इंग्लिश संघाने शानदार गोलंदाजी जोरावर टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 73 षटकांत 7 बाद 219 धावा केल्या होत्या. भारतीय संघ अद्याप 134 धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेरीस ध्रुव जुरेल 30 तर कुलदीप यादव 17 धावांवर खेळत होते. रांची कसोटीत आजचा तिसरा दिवस भारतासाठी महत्वाचा असणार आहे. भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 73 धावा तर इंग्लंडकडून शोएब बशीरने 4 गडी बाद केले.
प्रारंभी, इंग्लंडने 7 बाद 302 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी 15 षटकांचा खेळ पूर्ण होण्याआधी इंग्लंड संघ सर्वबाद झाला. इंग्लंडने पहिल्या डावात 104.5 षटकात 353 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. रवींद्र जडेजाने रूट-रॉबिन्सनची शतकी भागीदारी मोडली. रॉबिन्सन वैयक्तिक 58 धावांवर बाद झाला. यानंतर जडेजाने शोएब बशीर आणि जेम्स अँडरसनची शिकार केली. रुट शेवटपर्यंत 122 धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियाकडून जडेजाने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय, आकाशदीपने 3, सिराजने 2 तर अश्विनने एक गडी बाद केला.
जैस्वालचे शानदार अर्धशतक
इंग्लंडच्या 353 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या षटकातच धक्का बसला. कर्णधार रोहित शर्माला जेम्स अँडरसनने तिसऱ्या षटकातच बाद केले. रोहितला दोन धावाच करता आल्या. रोहित बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी साकारली. ही जोडी मैदानात जमलेली असताना गिलला शोएब बशीरने बाद केले. त्याने 6 चौकारासह 38 धावा केल्या. यानंतर बशीरने रजत पाटीदार (17 धावा) व रवींद्र जडेजाला (12 धावा) तंबूचा रस्ता दाखवला. या दरम्यान, जैस्वालने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 117 चेंडूत 8 चौकार व 1 षटकारासह 73 धावा केल्या.
यशस्वी बाद झाल्यावर काही वेळाने टॉम हार्टलीने सरफराजला 14 धावांवर बाद केले आणि भारताला अजून एक धक्का दिला. त्यानंतर हार्टलीने आर. अश्विनलाही एका धावेवर बाद केले. यानंतर ध्रुव जुरेल व कुलदीप यादव यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने 73 षटकांत गडी गमावत 219 धावा केल्या होत्या. जुरेल 30 तर कुलदीप 17 धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून शोएब बशीरने 4, टॉम हर्टलीने 2 तर जेम्स अँडरसनने 1 विकेट पटकावली.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड पहिला डाव सर्वबाद 353 (झॅक क्रॉली 42, जो रुट नाबाद 122, बेअरस्टो 38, रॉबिन्सन 58, बेन फोक्स 47, जडेजा 4 बळी, आकाशदीप 3 तर सिराज 2 बळी)
भारत पहिला डाव 73 षटकांत 7 बाद 219 (यशस्वी जैस्वाल 73, शुभमन गिल 38, ध्रुव जुरेल खेळत आहे 30, कुलदीप खेळत आहे 17, बशीर 4 बळी, हार्टले 2 बळी).
विक्रमवीर यशस्वी जैस्वाल

रांची कसोटीत रोहित शर्मा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर यशस्वीने शुभमन गिलसह भारतीय डावाची धुरा सांभाळली. यशस्वीने शानदार फलंदाजी करताना आणखी एक दमदार अर्धशतक पूर्ण केले. यशस्वीने 117 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारासह 73 धावा केल्या. या एका षटकाराच्या जोरावर यशस्वी जैस्वाल एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी जैस्वाल आणि माजी दिग्गज विरेंद्र सेहवाग हे या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. आता एकटा जयस्वाल पहिल्या स्थानी आहे.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी षटकार मारणारे भारतीय खेळाडू
यशस्वी जैस्वाल – 23 (2024)
विरेंद्र सेहवाग – 22 (2008)
रिषभ पंत – 21 (2022)
रोहित शर्मा – 20 (2019)
मयांक अगरवाल – 18 (2019)

कसोटी मालिकेत जैस्वालच्या 600 धावा

इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत जैस्वालने केलेल्या अर्धशतकानंतर तो भारतासाठी एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा डावखुरा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या नावावर होता. गांगुलीने 2007 साली पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत 534 धावा केल्या होत्या. आता जैस्वालने इंग्लंडविरुद्ध या कसोटी मालिकेत शनिवारी आपल्या धावांचा आकडा 618 पर्यंत नेला.
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे डावखुरे भारतीय खेळाडू
618 – यशस्वी जैस्वाल वि इंग्लंड, 2024
534 – सौरव गांगुली वि पाकिस्तान, 2007
463 – गौतम गंभीर वि. ऑस्ट्रेलिया, 2008.

जैस्वालचे एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार

रांची कसोटीत आपल्या अर्धशतकी खेळीत जैस्वालने 8 चौकार व एक षटकार लगावला. इंग्लंडविरुद्ध या कसोटी मालिकेतील हा त्याचा 23 वा षटकार ठरला. या षटकारासह तो कसोटीत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. याआधी या क्रमांकावर कर्णधार रोहित शर्मा होता. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत 22 षटकार मारले होते. भारताकडून एकाच संघाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 25 षटकार ठोकले होते.
एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज –

सचिन तेंडुलकर – 25 षटकार वि. ऑस्ट्रेलिया
यशस्वी जैस्वाल – 23 षटकार वि इंग्लंड
रोहित शर्मा – 22 षटकार वि दक्षिण आफ्रिका.