चोरी प्रकरणातील दागिने फायनान्स कंपन्यात गहाण!

गुन्हेगारांची नवीन शक्कल, पोलिसांच्या हाती संपूर्ण ऐवज : संबंधित कंपन्या अडचणीत बेळगाव : चेनस्नॅचिंग व चोरी प्रकरणातील दागिने फायनान्स कंपन्यांमध्ये गहाण ठेवून त्यावर सोने तारण कर्ज काढणाऱ्या गुन्हेगारांची शक्कल फायनान्स कंपन्यांना तापदायक ठरू लागली आहे. टिळकवाडी व शहापूर पोलिसांनी चेनस्नॅचिंग व चोरीप्रकरणी अटक केलेल्या दोन गुन्हेगारांनी थेट वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांमध्ये ठेवलेले दागिने पोलिसांनी जप्त केले असून त्यामुळे संबंधित कंपन्या अडचणीत आल्या आहेत. एखादा […]

चोरी प्रकरणातील दागिने फायनान्स कंपन्यात गहाण!

गुन्हेगारांची नवीन शक्कल, पोलिसांच्या हाती संपूर्ण ऐवज : संबंधित कंपन्या अडचणीत
बेळगाव : चेनस्नॅचिंग व चोरी प्रकरणातील दागिने फायनान्स कंपन्यांमध्ये गहाण ठेवून त्यावर सोने तारण कर्ज काढणाऱ्या गुन्हेगारांची शक्कल फायनान्स कंपन्यांना तापदायक ठरू लागली आहे. टिळकवाडी व शहापूर पोलिसांनी चेनस्नॅचिंग व चोरीप्रकरणी अटक केलेल्या दोन गुन्हेगारांनी थेट वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांमध्ये ठेवलेले दागिने पोलिसांनी जप्त केले असून त्यामुळे संबंधित कंपन्या अडचणीत आल्या आहेत. एखादा सर्वसामान्य माणूस अडचणीच्यावेळी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून कर्ज काढण्यासाठी गेल्यावर सहजपणे त्याला कर्ज मिळत नाही. गुन्हेगार मात्र मोठ्या प्रमाणात दागिने ठेवून त्यावर कर्ज कसे काढतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. फायनान्स कंपन्यांचा हलगर्जीपणा आता त्यांनाच नडू लागला आहे. गुन्हेगाराला सोने तारण कर्जापोटी दिलेली रक्कम तर गेलीच, त्याने ठेवलेले दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत.
टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशराम पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपगाव येथील विठ्ठल फकिराप्पा कुरबर याला अटक करून त्याने मुथ्थुट फायनान्समध्ये 4 लाख 80 हजार रुपयांच्या बदल्यात ठेवलेले 80 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी जप्त केलेले दागिने चोरी प्रकरणातील होते. आरोपीला अटक झाल्यानंतर दागिनेही जप्त झाले. पोलिसांचा तपास येथे संपला तरी चोरी प्रकरणातील दागिने ठेवून कर्ज देणाऱ्या संस्थेला आपल्या वसुलीसाठी चोराच्या मागे लकडा लावावा लागणार आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बस्तवाड रोड, धामणे येथील प्रज्ज्वल जयपाल खानजी या युवकाला चेनस्नॅचिंग प्रकरणी अटक करून त्याच्याजवळून सुमारे पावणे आठ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. शहापूर, उद्यमबाग, टिळकवाडी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात चेनस्नॅचिंग करणाऱ्या प्रज्ज्वलनेही मण्णपुरम फायनान्समध्ये साडेसात लाख रुपयांच्या बदल्यात 103.430 ग्रॅम दागिने तारण ठेवले होते. हे दागिनेही फायनान्समधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त करण्यात आले आहेत.
एकाचवेळी तीन मंगळसूत्रे तारण !
अलीकडे चोरी, चेनस्नॅचिंग प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले बहुतेक गुन्हेगार चोरी प्रकरणातील दागिन्यांची विक्री न करता वेगवेगळ्या फायनान्समध्ये ते तारण ठेवून कर्ज उचलण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. एकावेळी तीन मंगळसूत्रे तारण ठेवण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराबद्दल फायनान्स कंपनीला थोडाही संशय येऊ नये? याचेच आश्चर्य वाटू लागले आहे. यापूर्वी चोरी प्रकरणातील दागिन्यांची सराफांना विक्री केली जात होती. सराफांनी याविषयी काटेकोर धोरण अवलंबल्याने गुन्हेगार आता दागिन्यांची विक्री करण्याऐवजी ते तारण ठेवून त्यावर कर्ज काढू लागले आहेत.