जळगाव शहर मतदार संघाचे आमदार राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी आपला नामांकन अर्ज तहसीलदार कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत विनय गोसावी यांच्याकडे दाखल केला. यानंतर जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा निर्धार व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव शहर मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राजूमामा भोळे यांना पक्षातर्फे तिकीट मिळाले आहे. गेल्या दहा वर्षात जळगाव शहरात केलेल्या विकास कामांच्या बळावर या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केलेली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना खा. स्मिता वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे उपस्थित होते.
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आ. राजूमामा भोळे म्हणाले की, आम्ही केवळ विकास कामांच्या बळावर जनतेसमोर जाणार आहोत. प्रचारामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्वाखाली सरकारने केलेली विकासाची कामे घेऊन आम्ही जनतेपुढे लेखाजोखा मांडणार आहे. गेल्या दहा वर्षात जळगाव शहरामध्ये केवळ विकास कामांसाठी काम केले. जे विकास कामे आम्ही केले ते जनतेला माहित आहे. ते पाहून जनता आम्हाला नक्कीच मत देईल यात शंका नाही अशीही अपेक्षा आ. राजूमामा भोळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.