पाणी संरक्षणासाठी जलशक्ती अभियान आवश्यक

पाणी संरक्षणासाठी जलशक्ती अभियान आवश्यक

केंद्रीय नोडल अधिकारी डी. व्ही. स्वामी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : पाण्याच्या संरक्षणासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी संबंधित सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे केंद्र जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी डी. व्ही. स्वामी यांनी सांगितले. येथील जि. पं. कार्यालयात मंगळवारी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जलशक्ती अभियानाचा विकास आढावा घेऊन ते बोलत होते. पाण्याच्या संरक्षणाबरोबरच पावसाचे पाणी जिरविणे, पारंपरिक आणि इतर जलस्रोत तलाव आणि जलाशय नूतनीकरण, कूपनलिकांचे पुनरुज्जीवन, जलाशयांचा विकास, अरण्यातील तलावांची कामे हाती घेण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेच्या मदतीतून जलशक्ती अभियानांतर्गत 228 अमृत सरोवरांचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे स्थानिकांना होणारा लाभ, अंतर्जल पातळी याबाबतचा वैज्ञानिक अभ्यास करून अहवाल देण्याची सूचना जिल्ह्यातील वरिष्ठ भूविज्ञान अधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड विज्ञान सुचेता बिस्वास, योजना संचालक रवि बंगारप्पेनवर यांच्यासह कृषी, बागायत, वन, भूगर्भ, पाटबंधारे, नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जलस्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा…
जलशक्ती अभियानामुळे स्थानिकांना होणारा लाभ, अंतर्जल पातळी पाण्याचा योग्य वापर होत आहे की नाही याची पाहणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. स्वसाहाय्य संघ, स्थानिक संघ-संस्था यांच्या माध्यमातून जलस्रोतांचा विकास करावा, एनआरएलएम योजनेतील स्वसाहाय्य संघ, पाणी व स्वच्छता खात्याच्या संघ-संस्थांच्या माध्यमातून जलसंरक्षण उपक्रमामध्ये सहकार्य करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. पाण्याचे संरक्षण व्हावे यासाठी पाणी वाचवा, पाणी जिरवा याबाबत शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात यावी, कृषी, बागायत, वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी जलस्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.