पुरीमध्ये ‘जय जगन्नाथ, जय श्रीराम’चा गजर

जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ : तब्बल 53 वर्षांनंतर यात्रा दोन दिवस चालणार : हजारो भाविकांची गर्दी वृत्तसंस्था/ पुरी (ओडिशा) जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्ताने यंदा ओडिशातील पुरी परिसर भाविकांच्या गर्दीने फुललेला दिसून येत आहे. तब्बल 53 वर्षांनंतर येथील रथयात्रा दोन दिवस होत असल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. रविवारी रथयात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच नृत्य संकीर्तन आणि लाखो […]

पुरीमध्ये ‘जय जगन्नाथ, जय श्रीराम’चा गजर

जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ : तब्बल 53 वर्षांनंतर यात्रा दोन दिवस चालणार : हजारो भाविकांची गर्दी
वृत्तसंस्था/ पुरी (ओडिशा)
जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्ताने यंदा ओडिशातील पुरी परिसर भाविकांच्या गर्दीने फुललेला दिसून येत आहे. तब्बल 53 वर्षांनंतर येथील रथयात्रा दोन दिवस होत असल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. रविवारी रथयात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच नृत्य संकीर्तन आणि लाखो भाविकांच्या गर्दीत जय जगन्नाथच्या जयघोषाने पुरी जगन्नाथ धाम दुमदुमत होते. केवळ ओडिशा किंवा भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक पुरीत पोहोचले आहेत. संपूर्ण जगन्नाथ धाममध्ये ‘जय जगन्नाथ आणि जय श्रीराम’चा गजर सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही रथयात्रेत सहभागी झाल्यामुळे यंदा कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रथयात्रेसाठी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
यंदा 53 वर्षांनंतर पुरीची रथयात्रा दोन दिवस चालणार आहे. यापूर्वी 1971 मध्येही रथयात्रा दोन दिवस चालली होती. स्नान पौर्णिमेला आजारी पडलेले भगवान जगन्नाथ रविवारी सकाळी बरे झाल्यामुळे रथयात्रेपूर्वीचे उत्सव साजरे करण्यात आले. मंगला आरती पहाटे 4 ऐवजी मध्यरात्री 2 वाजता झाली. त्यानंतर पुढील कार्यक्रमही वेळोवेळी पूर्ण करण्यात आले. मंगला आरतीनंतर दशावतार पूजन झाले. रात्री 3 वाजता नैत्रोत्सव तर 4 वाजता पुरीच्या राजाची पूजा करण्यात आली. तसेच सूर्यपूजेनंतर देवाला खिचडी दिल्यानंतर रथाचे पूजन करून भगवानांना विशेष वस्त्रात गुंडाळून मंदिराबाहेर आणण्यात आले. रथयात्रेत मोठी गर्दी होण्याची शक्मयता गृहीत धरून प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
सायंकाळी 5 वाजता रथ ओढण्यास प्रारंभ
मंदिर परंपरेतील उपासना पद्धतींनुसार रथयात्रा रविवारी सायंकाळी 5 वाजता सुरू करण्यात आली. रथयात्रेच्या पहिल्या दिवशी सूर्यास्तापर्यंतच रथ ओढण्यात आल्यानंतर जाग्यावरच थांबवण्यात आले. आता सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून  पुन्हा रथ ओढले जाणार असून सायंकाळपर्यंत गुंडीचा मंदिरात पोहोचेल. रथ ओढण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
तीन किमी रथयात्रा
दरवषी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भगवान जगन्नाथ आपला भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह रथावर स्वार होऊन मुख्य मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरात जातात. या मंदिरात पुढील 7 दिवस भगवान मुक्काम करतात. आठव्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला तीनही रथ मुख्य मंदिरात परततात. भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेचे सर्व विधी सुरळीत आणि वेळेवर पार पाडण्यासाठी मंदिर प्रशासनाने या वषी भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या बंधू-भगिनींचे नवजौबन दर्शन होणार नाही असा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नवीन पटनायक उपस्थित
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक रथयात्रेत सहभागी झाले होते. जगप्रसिद्ध रथयात्रा पाहण्यासाठी राष्ट्रपती दौपदी मुर्मू पुरी येथे पोहोचल्या आहेत. भुवनेश्वर विमानतळावरून हेलिकॉप्टरने पुरीच्या तालबानिया येथील हेलिपॅडवर उतरल्यानंतर कडेकोट बंदोबस्तात राजभवनात पोहोचल्या. त्यानंतर दुपारी चार वाजता बडदंड येथे दाखल झाल्या. त्यांच्या दौल्यामुळे यात्रास्थळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राष्ट्रपतींसोबत राज्यपाल रघुवर दास आणि मुख्यमंत्री मोहन चरण माझीही उपस्थित होते. राष्ट्रपती 6 ते 9 जुलै या चार दिवसांच्या ओडिशाच्या दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान त्या रथयात्रा पाहण्यासाठी पुरी येथे पोहोचल्या.