तांदूळ 10 वर्षं जुना असेल तर आरोग्यासाठी चांगला असतो का?
बऱ्याचदा लोक असं सांगतात की, नव्या तांदळाच्या तुलनेत जुना तांदूळ अधिक सुगंधी आणि चवदार असतो.
पण 10 वर्षं जुना तांदूळ खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं का?अलीकडेच थायलंडचे वाणिज्य मंत्री फमथाम वेचायचाई यांनी 10 वर्ष जुन्या तांदळाचा भात खाल्ला आणि मग माध्यमांवर याची चर्चा सुरू झाली.
थायलंड सरकारने अलीकडेच लिलाव केलेला 15 हजार टन तांदूळ खाण्यायोग्य असल्याचं सिद्ध करणं हा त्यांचा उद्देश होता.थायलंडच्या प्रशासनाला हे करणं आवश्यक होतं. कारण लिलाव करण्यात येणारा तांदूळ 10 वर्षे जुना आहे.
2011 मध्ये थायलंडचे तत्कालीन पंतप्रधान यंग लिक शिनावात्रा यांनी एक वादग्रस्त योजना लागू केली होती, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांकडून बाजार दरापेक्षा जास्त दराने 540 लाख टनांहून अधिक तांदूळ खरेदी करण्यात आला होता. परंतु ही योजना त्यांचे आर्थिक अपयश मानली जाते.या योजनेनंतर, थायलंड सरकारला आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. कारण ते तांदूळ जास्त किंमतीला विकू शकत नव्हते आणि त्यामुळे सरकारकडे तांदळाचा मोठा साठा शिल्लक राहिला होता.
गेल्या महिन्यात थायलंडच्या वाणिज्य मंत्र्यांनी तांदूळ विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.17 जून रोजी, थाई कंपनी ‘व्ही 8 इंटरट्रेडिंग’ ने 28 कोटी 60 लाखांची बोली लावून लिलाव जिंकला.पण 10 वर्ष जुना तांदूळ कितपत खाण्यायोग्य आहे यावर लोक चर्चा करत आहेत.
शिनावात्रा यांची स्कीम
थायलंडची गणना जगातील सर्वात मोठ्या तांदूळ निर्यात करणाऱ्या देशांमध्ये केली जाते. परंतु असं असूनही तो तांदूळ नफ्यात विकता आला नाही.अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या योजनेत सरकारला सुमारे 15 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
2014 मध्ये, अनेक महिन्यांच्या निषेधानंतर लष्करी उठावात पंतप्रधान यंग लिक शिनावात्रा यांचे सरकार उलथून टाकण्यात आले.या नंतर 2017 मध्ये या योजनेमुळे आर्थिक नुकसान झाल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यामध्ये त्यांच्या निष्काळजीपणावर दोष ठेवण्यात आला.
तांदळाचा दर्जा कसा आहे?
मोठमोठ्या गोदामांमध्ये तांदूळ साठवला जातो.गेल्या महिन्यात थायलंडच्या वाणिज्य मंत्र्यांनी त्या साठ्यातून घेतलेला तांदूळ माध्यमांसमोर खाल्ला आणि त्याची गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
वाणिज्य मंत्री फमथम वेचायाचाई म्हणाले की, तांदळाचे दाणे अजूनही खूप सुंदर दिसत होते. त्याचा रंग थोडा जास्त पिवळा असू शकतो. 10 वर्षांचा तांदूळ असाच दिसतो.”त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आव्हान दिलं आणि ते म्हणाले की, तांदळाच्या कोणत्याही पोत्याला छिद्र करून ते तांदळाची गुणवत्ता तपासू शकतात.
थायलंडच्या वाणिज्य मंत्र्यांनी त्या तांदूळाची आरोग्य मंत्रालयाच्या प्रयोगशाळेत चाचणी केली आणि त्याचे परिणाम माध्यम प्रतिनिधींसोबत शेअर केले.तपासादरम्यान तांदळात कोणतेही विषारी रसायन आढळले नसल्याचे त्यांनी सांगितले.प्रयोगशाळेनुसार, त्या जुन्या तांदळाचे पोषणमूल्य सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या तांदळाइतकेच आहे.
चॅनल 3 नावाच्या स्थानिक टीव्ही नेटवर्कने स्वतंत्र प्रयोगशाळेतून तांदळाची दुसरी चाचणी घेतली आणि त्याचा परिणाम असाच आला. थोडक्यात या तांदळाचा भात खाण्यास सुरक्षित आहे.बीबीसीने त्या चाचण्यांच्या निकालांची पुष्टी केलेली नाही किंवा तांदळाची चाचणी केली नाही.
तांदूळ खराब होतात का?
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) मते, तांदूळ कोरड्या आणि थंड ठिकाणी हवाबंद डब्यात ठेवल्यास दीर्घकाळ साठवले जाऊ शकतात.त्याचप्रमाणे, अमेरिकेच्या तांदूळ महासंघाचे म्हणणे आहे की जर तांदूळ योग्यरित्या साठवले गेले तर ते ‘जवळजवळ अनिश्चित काळासाठी’ वापरण्यायोग्य राहते.
पोषण आणि चवीवर परिणाम
बीबीसीने ‘एफएओ’ला विचारले की एक दशकातील कीटकनाशकांच्या वापरामुळे तांदळात विषबाधा होऊ शकते का?’एफएओ’च्या मते, कीटकनाशक वापरताना सर्व खबरदारी घेतल्यास त्याचा तांदळावर काहीही परिणाम होत नाही.
आम्ही विचारले की, तांदूळ 10 वर्ष साठवून ठेवल्याने त्याचे पोषणमूल्य कमी होते का? याला उत्तर देताना ते म्हणाले की, तांदळामध्ये कमी प्रमाणात आढळणाऱ्या काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असू शकते, पण त्यामुळे तांदळाच्या एकूण पौष्टिक मूल्यात फारसा फरक पडत नाही.
एफएओचं म्हणणं आहे की, तांदळाच्या वापरातून सर्वात जास्त पौष्टिक फायदा हा त्यात असलेल्या स्टार्चच्या उच्च गुणवत्तेमुळे होतो. मानवी शरीर त्याचे उर्जेमध्ये रूपांतर करते.
तसेच, तांदूळ कालांतराने त्याची चव गमावतो परंतु तांदूळ कसा साठवला जातो यावरही अवलंबून असते.
थाई टीव्ही अँकर सुरयोत सोथासनचंदा यांनी 10 वर्षांच्या जुन्या स्टॉकमधून चमेली तांदूळ चाखला.ते म्हणाले की, त्याची चव पांढऱ्या तांदळासारखी होती. त्याला चमेलीच्या तांदळासारखा चिकट, मऊ आणि सुगंध नव्हता.
माजी निवडणूक समिती सदस्य सोमचाई सरिसोथाय कोरन यांनीही जुन्या तांदळाची चव चाखली. ते म्हणाले की, त्याचा वास चांगला नाही आणि तो थोडा तुटलेला आहे आणि त्याची जाडी देखील कमी आहे.
या तांदळाचं काय होणार?
थाई राइस एक्सपोर्टर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी थाय तांदळाचे सर्वात मोठे खरेदीदार इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिका होते.
थायलंडमध्ये राईस मिल चालवणाऱ्या पोपट वांगडी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जुना तांदूळ बहुतांश गरीब देशांमध्ये वापरला जातो.
दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त, थायलंड इतर अनेक आफ्रिकन देशांनाही तांदूळ विकतो.
थायलंडचे वाणिज्य मंत्री फमथम वेचायचाई यांचेही म्हणणे आहे की, आफ्रिकन देशांमध्ये थाय तांदळाची मागणी आहे.
थायलंडच्या सरकारने लिलावाची घोषणा केल्यापासून आफ्रिकेतील सोशल मीडिया वापरकर्ते त्या तांदळाबद्दल भीती व्यक्त करत आहेत.
काही सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणं आहे की, नेहमीप्रमाणे आफ्रिकेचा वापर डंपिंग ग्राउंड म्हणून केला जाईल.
दुसरीकडे, केनिया सरकारने जाहीर केले आहे की, जे तांदूळ निकष पूर्ण करतात आणि प्रयोगशाळेत तपासले गेले आहेत तेच तांदूळ आयात करण्यास परवानगी दिली जाईल.
लिलाव विजेती कंपनी व्ही 8 इंटरट्रेडिंगकडे तांदूळ खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी आहे.
Published By- Priya Dixit