मातृभाषेतून शिक्षणासाठी मराठी शाळांचा पुढाकार

ग्रामीण भागात भित्तीपत्रकांच्या आधारे जनजागृती : मातृभाषेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी कुठेच कमी नाही बेळगाव : विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, यासाठी खासगी शाळा महिनाभर आधीपासूनच आपल्या शाळांचे ठिकठिकाणी प्रमोशन करीत असतात. पत्रकांचे वाटप करतात. यामध्ये आता ग्रामीण भागातील मराठी शाळाही मागे नाहीत. शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी मराठी शाळांमधील शिक्षक सरकारी शाळांचे महत्त्व, मातृभाषेतील शिक्षण, मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या यांची […]

मातृभाषेतून शिक्षणासाठी मराठी शाळांचा पुढाकार

ग्रामीण भागात भित्तीपत्रकांच्या आधारे जनजागृती : मातृभाषेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी कुठेच कमी नाही
बेळगाव : विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, यासाठी खासगी शाळा महिनाभर आधीपासूनच आपल्या शाळांचे ठिकठिकाणी प्रमोशन करीत असतात. पत्रकांचे वाटप करतात. यामध्ये आता ग्रामीण भागातील मराठी शाळाही मागे नाहीत. शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी मराठी शाळांमधील शिक्षक सरकारी शाळांचे महत्त्व, मातृभाषेतील शिक्षण, मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या यांची माहिती विद्यार्थी व पालकांना घरोघरी जाऊन देत आहेत. दर्जेदार शिक्षण दिले जात नसल्याने मध्यंतरीच्या काळात सरकारी शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी झाली. गावागावात शहरातील खासगी शाळांच्या बस येऊ लागल्याने विद्यार्थ्यांचा ओढा शहरातील खासगी शाळांकडे वाढू लागला. यामुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळा ओस पडू लागल्या. इंग्रजीचे वाढते अतिक्रमण तसेच प्रतिष्ठेपायी पालकांनी आपली मुले इंग्रजी शाळेत पाठविण्यास सुरुवात केली. परंतु, मातृभाषेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी कुठेच कमी पडत नाही, हे दिसून आल्यानंतर ग्रामीण भागात पुन्हा एकदा सरकारी शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे.
प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर जाहिरातीचे फलक
पटसंख्या वाढीसाठी काही शिक्षक झपाट्याने कामाला लागले आहेत. प्रवेशास पात्र असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना मातृभाषेतील शिक्षण तसेच सरकारी शाळांमध्ये मिळणारी शिष्यवृत्ती या संबंधीची माहिती दिली जात आहे. तसेच प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर शाळेच्या जाहिराती करणारे फलक लावले जात आहेत. यापूर्वी खासगी शाळांकडून केले जाणारे प्रमोशन आता सरकारी शाळाही करू लागल्या आहेत वयाची 5 वर्षे 6 महिने पूर्ण केलेल्या गावातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना भेटी देण्याचा उपक्रम कुद्रेमनी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेने सुरू केला आहे. मराठी भाषेतून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी कुठेही कमी पडत नाहीत, हे पालकांना पटवून दिले जात आहे. असाच उपक्रम इतर मराठी शाळांनी राबविल्यास मराठी शाळांमधील पटसंख्या वाढण्यास मदत होईल.
मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास सुविधा
गावातील प्रवेशास पात्र असणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मराठीतून शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगण्यात येत आहे. सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मोफत प्रवेश, मोफत गणवेश, मोफत पाठ्यापुस्तके, मोफत मध्यान्ह आहार, शिष्यवृत्ती यासह इतर सुविधा मिळत असल्याचे त्यांना सांगितले जात आहे. यामुळे नवीन प्रवेश होण्यास मदत होणार आहे.
के. एल. गुंजीकर (मुख्याध्यापक, उच्च प्राथमिक शाळा, कुद्रेमनी)