भाजप सरकारच्या अपयशाची माहिती जनतेला द्या

मंत्री सतीश जारकीहोळी : हुक्केरी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा बेळगाव : देशामध्ये गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या अपयशाची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचविली पाहिजे, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील नेसरी गार्डन येथे हुक्केरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन करून […]

भाजप सरकारच्या अपयशाची माहिती जनतेला द्या

मंत्री सतीश जारकीहोळी : हुक्केरी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा
बेळगाव : देशामध्ये गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या अपयशाची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचविली पाहिजे, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील नेसरी गार्डन येथे हुक्केरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन करून ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यासाठी मतदारांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र, दहा वर्षांचा कालावधी लोटला तरी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. 2 कोटी तरुणांना रोजगार मिळालेला नाही. काळा पैसा परत आणला गेला नाही, अशी अनेक आश्वासने केंद्रातील भाजप सरकारने दिली होती. या अपयशाची माहिती कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
राज्यामध्ये भाजपची हवा आहे, असे सांगितले जात आहे. कर्नाटकामध्ये काही झाले तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचीच हवा आहे. काँग्रेस पक्षाचीच हवा आहे. आपणाला कोठेही मोदींची हवा दिसून येत नाही, असा व्यंगात्मक टोलाही त्यांनी मारला. खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या अपयशाची माहिती जनतेला दिली पाहिजे. चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदारसंघात खासदार जोल्लेविरोधात मतदारांमध्ये असमाधान आहे. यासाठीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला अधिक मतदान देऊन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी मतदारांना आवाहन करत सेवा करण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली. यावेळी माजी मंत्री शशिकांत नाईक, एम. एस. हंजी, दिलीप होसमनी, शानूर ताशिलदार, काडाप्पा कट्टी, प्रशांत कोळी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.