इंद्राणी मुखर्जी: शीना बोराची हत्या का केली? एका ड्रायव्हरने दिलेल्या माहितीमुळे कसं उघडकीस आलं प्रकरण? वाचा
नेटफ्लिक्सवरील ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी: बरीड ट्रुथ’ या सीरिजची सध्या चर्चा सुरू आहे. त्यानिमित्तानं शीना बोरा हत्याकांडाविषयीची माहिती देणारी ही बातमी पुन्हा शेयर करत आहोत.
एकेकाळची मीडिया टायकून इंद्राणी मुखर्जीला मुंबई पोलिसांनी शीना बोरा हत्येप्रकरणी 2015 मध्ये अटक केली होती. सीबीआयने तपास पूर्ण करून या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं होतं. इंद्राणी मुखर्जी यांना 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. सुमारे साडेसहा वर्षं त्या तुरुंगात होत्या. जामीन मिळण्याच्या काही दिवसांपूर्वी इंद्राणी मुखर्जींनी एक खळबळजनक दावा केला होता. शीना जीवंत असून तपासयंत्रणांनी तिचा शोध घ्यावा, असं पत्र इंद्राणीनं CBI ला लिहिलं होतं. पण, शीना बोराची हत्या का करण्यात आली? तीन वर्ष गायब असताना कोणी तिला शोधण्याचा प्रयत्न केला? शीनाला गायब करण्यामागे कोणाचा हात होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिस चौकशीत समोर आली होती.
कोण होती शीना बोरा?
मुंबई पोलीस शीना बोरा हत्येच्या मुळापर्यंत कसे पोहोचले? शीनाची हत्या का झाली? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी शीना बोरा कोण होती हे जाणून घेऊया. शीना, टीव्ही इंडस्ट्रीमधील एक नावाजलेला चेहरा असलेल्या इंद्राणी मुखर्जी यांची मुलगी होती. इंद्राणी ‘मीडिया टायकून’ म्हणून ओळख असलेल्या पीटर मुखर्जी यांच्या पत्नी. त्यामुळे शीना बोरा पीटर मुखर्जी यांची सावत्र मुलगी होती. 24 वर्षांची असताना शीनाची हत्या झाली होती.
शीना बोरा हत्येचं गूढ कसं उकललं?
ऑगस्टचा महिना होता. तारीख होती 21 ऑगस्ट 2015. खार पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेश कदम यांच्या टीमने श्याम राय नावाच्या एका व्यक्तीला अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून 7.65 बोरचं पिस्तूल आणि काडतूसं जप्त करण्यात आली. पोलीस चौकशीत श्यामने तो एप्रिल 2012 मध्ये एका मुलीची हत्या करण्यात सहभागी होता असा धक्कादायक खुलासा केला. हत्येच्या या प्रकरणावर तीन वर्षांपासून प्रकाश पडला नव्हता. श्यामने शीना बोराच्या हत्येची माहिती दिली. शीना कोण होती? तिच्यासोबत काय घडलं? याचे सूत्रधार कोण? हे ऐकून पोलिसांच्या तपासाची दिशा पूर्णत: बदलली. कारण इंद्राणी मुखर्जी यांच्या मुलीचा खून झाला होता. शीना बोरा हत्याकांड मुंबईतील सोशल सर्किटमधल्या एका उच्चभ्रू कुटुंबाशी जोडलं गेलं. इंद्राणी मुखर्जी यांचा ड्रायव्हर श्याम राय, शीना बोरा खून प्रकरणातील सर्वात मोठा दुआ मुंबई पोलिसांच्या हाती लागला होता.
शीनाचा खून कोणी आणि कसा केला?
श्याम रायने शीना बोरा हत्याकांडाचं गूढ मुंबई पोलिसांसमोर उलगडण्यास सुरूवात केली. तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनीदेखील याबाबत त्यांचं पुस्तक ‘Let Me Say It Now’ मध्ये माहिती दिली आहे.
श्यामने पोलिसांना सांगितलं, की 24 एप्रिल 2012 मध्ये शीनाचा गाडीत गळा आवळून खून करण्यात आला. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तिची आई इंद्राणी मुखर्जीची मदत केली होती. रायगडमध्ये मृतदेह फेकण्यात आला. यात इंद्राणी मुखर्जीचा पूर्व पती संजीव खन्नाही शामिल होता. शीनाच्या हत्येप्रकरणी इंद्राणीचं नाव समोर आलं होतं. मुखर्जी एक मोठं प्रस्थ असल्याने श्यामचे दावे मुंबई पोलिसांनी पडताळून पाहण्यास सुरूवात केली.
सर्वांत पहिल्यांदा पोलिसांनी श्यामला शीनाचा मृतहेद कुठे टाकण्यात आला त्याठिकाणी घेऊन जाण्यास सांगितलं. शीनाचा मृतदेह रायगडमधील गागोदे गावाजवळ एका निर्मनुष्य ठिकाणी नेला. ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. राकेश मारिया पुस्तकात माहिती देतात, शीनाचा खून झाला त्यादिवशी संजीव खन्ना कोलकात्याहून मुंबईत आला. इंद्राणी आणि शीना मुंबईतील वांद्रेमध्ये भेटल्या. गाडीत इंद्राणी, शिना, ड्रायव्हर श्याम राय आणि संजीव खन्ना होते. ठरल्याप्रमाणे गाडी मुंबईतील आर. डी. नॅशनल कॉलेजच्या गल्लीमध्ये आली. गाडीतच शीनाची गळा आवळून हत्या करण्यात आली. मृतदेह लपवण्यासाठी आणलेल्या सूटकेसमध्ये भरण्यात आला. त्यानंतर गाडी इंद्राणी मुखर्जी यांच्या वरळीतील घराच्या गॅरेजमध्ये ठेवण्यात आली. आणि दुसऱ्या दिवशी रायगडमध्ये जाळून टाकण्यात आली. पोलिसांनी शीना बोराच्या मृतदेहाचे अवशेष रायगडमधून जप्त केले होते. हे अवयव तपासणीसाठी सर. जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आले.
इंद्राणी मुखर्जी हत्येची प्रमुख सूत्रधार?
शीना बोराच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शीनाची आई इंद्राणी मुखर्जीला खूनाप्रकरणी अटक करण्यात आली. संजीव खन्नाला 26 ऑगस्टला पोलिसांनी अटक केली. इंद्राणीला भलेही अटक झाली होती. पण शीनाची हत्या का करण्यात आली? याचं कोडं अजूनही सुटलेलं नव्हतं. कुटुंबातील लोकांचे परस्पर संबंध, पैसा, प्रॉपर्टी सर्व दिशांनी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली. शिलॉंग, दिल्ली, कोलकाता, दिल्ली, बेंगळुरू याठिकाणी पोलिसांनी चौकशी केली. सीबीआयने इंद्राणी मुखर्जीविरोधात कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात, शीना बोरा खून प्रकरणी तिला मुख्य सूत्रधार म्हटलं आहे. राकेश मारिया आपल्या पुस्तकात लिहितात, “शीनाच्या हत्येनंतर इंद्राणीने हे प्रकरणी आपल्यापर्यंत पोहोचू नये. यासाठी खूप काळजी घेतली होती.”
शीनाच्या हत्येमागचा हेतू काय?
राज्य सरकारने 29 सप्टेंबर 2015 ला शीना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग केला होता. इंद्राणी मुखर्जीला मदत केल्याप्रकरणी सीबीआयने पीटर मुखर्जी यांनाही अटक केली. पीटर यांना 2020 मध्ये जामीन मिळालाय. इंद्राणी मुखर्जी यांचा जामीन अर्ज अनेकवेळा फेटाळून लावण्यात आलाय. या प्रकरणी 2017 मध्ये खटला सुरू झाला. सीबीआयने कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटनुसार, “मुख्य सूत्रधार इंद्राणी आणि पीटर मुखर्जी, शीना बोरा आणि राहुल मुखर्जी यांच्या अत्यंत जवळच्या संबंधांविरोधात होते.” शीना, इंद्राणी मुखर्जी यांच्या पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी होती. तर राहुल पीटर मुखर्जी यांचा मुलगा होता. त्यामुळे इंद्राणी मुखर्जीला सावत्र बहीण-भावाचे संबंध पसंत नव्हते.
तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया त्यांच्या पुस्तकात लिहीतात, “इंद्राणी आणि पीटर यांनी राहुल-शीनाला वेगळं करण्याचे प्रयत्न केले. पण ते अजिबात ऐकत नव्हते. शीनाची राहुलसोबतची जवळीक इंद्राणीच्या साम्राज्याला धक्का देऊ शकत होती. त्यामुळे इंद्राणीने शीना आणि मुलगा मिखाईलची हत्या करण्याचं ठरवलं. ” मुंबई पोलिसांचे तत्कालीन तपास अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, “आमच्या चौकशीतही शीनाच्या खूनामागे राहुल-शीनाचे संबंध हेच कारण असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता.” चार्जशीटमध्ये CBI ने, इंद्राणीने शीनाची हत्या करण्यासाठी कोणती जागा निवडलीये याची माहिती पीटर मुखर्जीला दिल्याचं म्हटलंय. शीनाच्या मृत्यूनंतर पीटरने राहुलला मेल केल्याचंही या चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं. सीबीआयच्या खटल्यात ड्रायव्हर श्याम राय माफीचा साक्षीदार बनला.
शीना गायब झाल्यानंतर कोणी शोध घेतला?
एप्रिल 2012 मध्ये अचानक गायब झाल्यानंतर राहुल मुखर्जीने शीनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शीना गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तर, दुसरीकडे पेण पोलिसांना मृतदेहाचे अवशेष मिळाले होते. पण त्यांनी पुढे चौकशी केली नव्हती. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, इंद्राणी मुखर्जीने शीना आपल्या मर्जीने घर सोडून गेल्याचं राहुल आणि मिखाईलला सांगितलं होतं.
राकेश मारियांच्या एन्ट्रीवरून वाद
शीना बोरा तपासात राकेश मारियांची पहिली एन्ट्री झाली 27 ऑगस्ट 2015ला. त्यानंतर तीन वेळा मारिया खार पोलीस स्टेशमध्ये येऊन आरोपींची चौकशी करून गेले. मारिया यांनी स्वत: त्यांच्या पुस्तकात याबाबत माहिती दिली आहे. मारिया सांगतात, “पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मला कळलं की इंद्राणीची चौकशी करण्यात अधिकाऱ्यांना अडचणी येत आहेत. ती खोटं बोलते आणि फार काहीच सांगत नाही, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मी त्यांना काही टीप्स दिल्या होत्या.”
मारिया यांनी श्याम राय, इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांची स्वत: चौकशी केली होती. शीना बोरा प्रकरणी मारिया प्रत्येक घडामोडीवर जातीने लक्ष ठेवत होते. पण पोलीस आयुक्तांचं जातीने लक्ष का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. मारिया यांचे पीटर-इंद्राणी मुखर्जी यांच्यासोबत संबंध असल्याचा आरोपही झाला. मीडियाशी बोलताना राकेश मारियांनी “मी दोघांना पहिल्यांदा खार पोलीस स्टेशनमध्ये भेटलो,” असं म्हणत त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले होते.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “गुन्हेगारांची चौकशी करण्यात मारिया यांचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे ते गेले असतील” अशी प्रतिक्रिया दिली होती.
राकेश मारियांची तडकाफडकी बदली
इंद्राणी मुखर्जींच्या अटकेनंतर 7 सप्टेंबरला राकेश मारिया यांनी पीटर मुखर्जी यांची स्वत: चौकशी केली. पण, दुसऱ्या दिवशी 8 सप्टेंबर 2015 ला सकाळी त्यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. ‘Let Me Say It Now’ या पुस्तकात ले लिहितात, “मी दिवसाची तयारी करत असताना याच्या मुळापर्यंत कसा जाऊ याचा विचार करत होतो. पण, मी आता पोलीस आयुक्त नव्हतो.” राकेश मारिया यांच्या हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे राज्य सरकारने त्यांना पदोन्नती देऊन त्यांना पोलीस महासंचालक बनवलं होतं? मारियांच्या बदलीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधीच उघडपणे बोलले नाहीत.
Published By- Dhanashri Naik