भारताचा पाकमध्ये खेळण्यास नकार?

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामने अन्यत्र ठेवण्याची भारताची मागणी वृत्तसंस्था /नवी दिल्ली पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले असून भारताचे सामने दुबई किंवा लंकेमध्ये आयोजित करण्याची विनंती त्यांनी आयसीसीकडे केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकमध्ये होणार आहे. दोन्ही देशांचे संबंध […]

भारताचा पाकमध्ये खेळण्यास नकार?

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामने अन्यत्र ठेवण्याची भारताची मागणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले असून भारताचे सामने दुबई किंवा लंकेमध्ये आयोजित करण्याची विनंती त्यांनी आयसीसीकडे केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकमध्ये होणार आहे. दोन्ही देशांचे संबंध तणावग्रस्त झाले असल्याने 2008 मधील आशिया चषक स्पर्धेनंतर भारताने आजवर पाकमधील एकाही स्पर्धेत भाग घेतलेला नाही. डिसेंबर 2012 व जानेवारी 2013 मध्ये या दोन शेवटची द्विदेशीय मालिका झाली होती. त्यानंतर आजपर्यंत दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या व आशिया चषक स्पर्धांत एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. तणावग्रस्त संबंधांमुळे आगामी स्पर्धेत भारताच्या सहभागाविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
‘भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये निश्चितच जाणार नाही. त्यातील भारताचे सामने दुबई किंवा लंकेत आयोजित करण्याबाबत आयसीसीला विनंती बीसीसीआय करणार आहे,’ असे या सूत्राने सांगितले. केंद्र सरकारने परवानगी दिली तरच भारतीय संघ पाकमध्ये खेळेल, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गेल्या मेमध्ये म्हटले होते. केंद्र सरकार सांगेल त्याप्रमाणे आम्ही करणार असून त्यांनी होकार दिल्यानंतरच आम्ही आमचा संघ पाकमध्ये पाठवू, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेवेळीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्याचे यजमानपद पाकला मिळाले होते. पण भारताच्या कडक भूमिकेमुळे पीसीबीला नमते घ्यावे लागले आणि त्यांनी हायब्रिड मसुदा मान्य केला. यानुसार भारताचे सर्व सामने लंकेमध्ये खेळविले गेले व उर्वरित सामने पाकमध्ये घेण्यात आले होते. त्या स्पर्धेचा अंतिम सामना कोलंबोत खेळविला गेला आणि भारताने त्यात जेतेपद पटकावले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकनेही गेल्या वर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमधील सामने अन्यत्र खेळविण्याचा पवित्रा घेतला होता, पण भारताने त्याला फारशी किंमत दिली नाही. पाकिस्तान हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विद्यमान विजेता आहे.