दक्षिण आफ्रिकेतील इतिहास बदलण्यास भारतीय संघ सज्ज

पहिला कसोटी सामना आजपासून, चेंडू उसळणाऱ्या खेळपट्टीवर युवा फलंदाजांची लागणार कसोटी वृत्तसंस्था/ सेंच्युरियन भारताची दक्षिण आdफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी आज मंगळवारपासून सुरू होत असून भारतीय कर्णधार रोहित शर्मा विश्वचषकातील अंतिम फेरीतील पराभवाच्या आठवणी पुसून टाकण्यासाठी त्यात सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारताची 31 वर्षांची प्रतीक्षा संपविण्यासही तो […]

दक्षिण आफ्रिकेतील इतिहास बदलण्यास भारतीय संघ सज्ज

पहिला कसोटी सामना आजपासून, चेंडू उसळणाऱ्या खेळपट्टीवर युवा फलंदाजांची लागणार कसोटी
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
भारताची दक्षिण आdफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी आज मंगळवारपासून सुरू होत असून भारतीय कर्णधार रोहित शर्मा विश्वचषकातील अंतिम फेरीतील पराभवाच्या आठवणी पुसून टाकण्यासाठी त्यात सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारताची 31 वर्षांची प्रतीक्षा संपविण्यासही तो उत्सुक असेल.
आज ‘बॉक्सिंग डे’पासून येथे सुरू होणारी दोन सामन्यांची कसोटी मालिका ही 1992 पासूनची दक्षिण आफ्रिकेतील भारताची नववी मालिका आहे आणि या सर करण्यास कठीण राहिलेल्या प्रदेशात विजय नोंदविण्याचे कठीण आव्हान कर्णधार रोहितसमोर आहे. तथापि, सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळ होण्यासाठी पावसाचा व्यत्तय न येणे आवश्यक आहे. पहिल्या दोन दिवसांत येथे अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर चेंडू मिळेल तसा उसळतो आणि ही या प्रदेशातील सर्वांत वेगवान खेळपट्टी आहे. त्यामुळे तुलनेने थंड आणि वाऱ्याच्या वातावरणात फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात एक चांगला संघर्ष पाहायला मिळू शकतो.
विश्वचषकात कर्णधार रोहितसमोर कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनीच्या पावलांवर पाऊल ठेवण्याची संधी चालून आली होती. परंतु जर तो आणि त्याचा संघ या देशात विजय मिळवू शकले, तर अशी कामगिरी करणारा तो पहिला कर्णधार ठरेल. कर्णधार म्हणून मोहम्मद अझऊद्दीन (1992) जसा अपयशी ठरला त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर (1996) आणि सौरव गांगुली (2001) हेही अपयशी ठरले. राहुल द्रविड (2006-07), धोनी (2010-11 आणि 2013-14) तसेच विराट कोहली (2018-19 आणि 2021-22) यांनीही कसोटी सामने जिंकले, परंतु त्यापैकी कोणालाही दक्षिण आफ्रिकेत मालिका विजय  मिळवता आला नाही.
त्यामुळे रोहितकडे एक खडतर आव्हान आहे आणि विश्वचषकाच्या जखमा भरून काढण्यासाठी आवश्यक असलेला लेप येथील मालिका विजय लावू शकतो. भारतीय क्रिकेटपटूंच्या सोनेरी पिढीसाठी ही त्यांची शेवटची आफ्रिकन सफारी आहे आणि मागील आठ दौऱ्यांमध्ये इतर कोणत्याही भारतीय संघाला जी कामगिरी करता आली नाही, ती साध्य करून दाखविण्याची संधी त्यांच्यापुढे चालून आली आहे.
टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेकडे प्रभावी वेगवान मारा असून त्यामुळे काही तऊण भारतीय फलंदाजांचा कस लागेल. कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन आणि जेराल्ड कोएत्झी यांचा समावेश असलेल्या दर्जेदार माऱ्याला सामोरे जाताना यशस्वी जैस्वालची पहिली मोठी कसोटी लागेल. त्याला कॅरिबियन भूमीपेक्षा येथे अधिक उसळणाऱ्या चेंडूंना सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी उपखंडातील खेळपट्ट्यांवर आपली क्षमता सिद्ध केलेली असली, तरी त्यांना अधिक आव्हानात्मक परिस्थितीत आपल्या खेळाचा दर्जा वाढवावा लागेल. खास करून अय्यरला काही तरी खास करावे लागेल. कारण आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना करण्याच्या बाबतीत त्याचा कमकुवतपणा यापूर्वी उघड झालेला आहे.
प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जैस्वाल आणि गिल यांनी त्यांची शैली बदलावी असे वाटत नाही, मात्र त्यांनी परिस्थितीच्या गरजेनुसार खेळावे अशी त्यांची इच्छा आहे. भारताची या कसोटी मालिकेतील कामगिरी कर्णधार रोहित शर्मा त्याचे हूक आणि पूलचे फटके किती चांगल्या प्रकारे चालवतो, विराट कोहली किती वेळ ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू सोडण्याचा निर्णय घेतो आणि मोहम्मद शमीची उणीव संघ किती चांगल्या प्रकारे भरून काढतो, या तीन घटकांवर प्रामुख्याने अवलंबून असेल. मुकेश कुमार हा सरावावेळी अधिक चांगला दिसलेला असला, तरी खेळपट्टीवर उसळू शकणारे चेंडू पाहता प्रसिद्ध कृष्णाला पसंती मिळू शकते.
बवुमा, निवृत्त होणारा डीन एल्गार, शैलीदार एडन मार्करम, टोनी डी झोर्झी आणि कीगन पीटरसन यांचा समावेश असलेली दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ही चांगली असून ती भारतीय गोलंदाजांना कठोर परिश्रम करायला लावू शकते. के. एल. राहुलने यष्टिरक्षण सांभाळल्यास त्याच्यावर यष्टिरक्षक व फलंदाज म्हणून दुहेरी जबाबदारी असेल. खेळपट्टीचे स्वरुप आणि वातावरण पाहता अश्विनला या सामन्यात खेळण्याची संधी मिळणे कठीण वाटते. सुपरस्पोर्ट पार्कमध्ये निकाल मिळविण्यासाठी साधारणपणे साडेतीन ते चार दिवस लागतात आणि जर पहिला दिवस पावसात वाहून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाणेफेक झाली, तर प्रथम फलंदाजी करणे निश्चितच खूप कठीण असेल.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, के. एस. भरत, अभिमन्यू ईश्वरन (दुसरी कसोटी).
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, डीन एल्गार, कीगन पीटरसन, काइल वेरेन, ट्रिस्टन स्टब्स, नांद्रे बर्गर, मार्को जॅनसेन, विआन मुल्डर, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेव्हिड बेडिंगहॅम.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा., थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी