भारतीय नेमबाजांचा निशाणा चुकला

10 मी एअर रायफल मिश्र व 10 मी एअर पिस्तूल प्रकारात अपयश : चीनची दणक्यात सुरुवात वृत्तसंस्था/ पॅरिस पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवसाची सुरुवात भारतीयांसाठी निराशाजनक राहिली. शनिवारी झालेल्या 10 मी एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या दोन्ही जोड्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरु शकल्या नाहीत. अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल ही भारतीय जोडी सहाव्या तर तर […]

भारतीय नेमबाजांचा निशाणा चुकला

10 मी एअर रायफल मिश्र व 10 मी एअर पिस्तूल प्रकारात अपयश : चीनची दणक्यात सुरुवात
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवसाची सुरुवात भारतीयांसाठी निराशाजनक राहिली. शनिवारी झालेल्या 10 मी एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या दोन्ही जोड्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरु शकल्या नाहीत. अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल ही भारतीय जोडी सहाव्या तर तर इलावेनिल आणि संदीपची जोडी बाराव्या स्थानी राहिली. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सरबजोत सिंग आणि अर्जुन सिंग चीमा हे भारतीय नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. सरबजोत 9 व्या तर अर्जुन 18 व्या राहिले. याशिवाय, रोईंगमध्ये भारताच्या बलराज पनवरची थेट पात्रतेची संधी हुकली, आता रेपचेज राऊंडमधून त्याला आगेकूच करण्याची संधी आहे. दुसरीकडे, चीनने मात्र धडाक्यात सुरुवात करताना 10 मी रायफल मिश्र नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पटकावले. कोरियाला रौप्य तर कझाकिस्तानला कांस्यपदक मिळाले.
शुक्रवारी ऑलिम्पिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. अद्भूत, अविस्मरणीय असा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर शनिवारपासून नेमबाजीला सुरुवात झाली. स्पर्धेतील 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत पदक फेरी गाठण्यात भारताला अपयश आले. भारताची टीम 1 जोडी इलावेनिल (312.6) आणि संदीप (313.7) एकूण 626.3 गुणांसह 12 व्या स्थानावर राहिले तर टीम 2 रमिता (314.5) आणि अर्जुन (314.2) एकूण 628.7 गुणांसह सहाव्या स्थानी राहिले.  विशेष म्हणजे, रमिता व अर्जुन यांनी सुरेख खेळ केला पण त्यांना अंतिम चारमध्ये पोहोचता आले नाही. दरम्यान, पात्रता फेरीत चीनने पहिले, कोरियाने दुसरे तर कझाकिस्तानने तिसरे स्थान तर जर्मनीने चौथे स्थान पटकावले. यावेळी चीन व कोरिया यांच्यात सुवर्ण तर कझाक व जर्मनी यांच्यात कांस्यपदकासाठी लढत झाली.
दरम्यान, सुवर्णपदकाच्या लढतीत चीनने कोरियाचा 16-12 असा पराभव करत स्पर्धेतील पहिले सुवर्ण पटकावले. 19 वर्षाचा हुआंग यूटिंग व 17 वर्षाची शेंग लिहाओ यांनी हे हे पदक जिंकण्याची किमया केली. द.कोरियाच्या जिहोम व हाजुन पार्क यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कझाकिस्तानने जर्मनीचा 16-5 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. हा सामना अगर्दी एकतर्फी झाला.
10 मी एअर पिस्तूल प्रकारातही निराशा
भारतीय नेमबाज सरबजोत सिंग आणि अर्जुनसिंग चीमा 10 मीटर पुरुष एअर पिस्तूलच्या पात्रता स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. 6 सेटच्या पात्रता स्पर्धेत सरबजोत 577 गुणांसह 9 व्या स्थानावर राहिला. तो कमी फरकाने अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. अर्जुनसिंग चीमा 574 गुणांसह 18 व्या स्थानी राहिला. या स्पर्धेतील टॉप 8 नेमबाजांनी अंतिम फेरी गाठली आहे.
रोईंगमध्ये बलराज चौथ्या स्थानी, आणखी एक संधी मिळणार
भारताचा रोईंगपटू बलराज पनवरने पुरुष एकल स्कलच्या हिटमध्ये 7 मिनिटे 07.11 सेकंदाची वेळ नोंदवताना चौथे स्थान पटकावले पण त्याला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. आता, त्याला आज होणाऱ्या रेपचेज राऊंडमध्ये आणखी एक संधी मिळेल.