हिंदी महासागरात भारताचा सैनिकी तळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मॉरीशसमध्ये विमान धावपट्टीचे उद्घाटन वृत्तसंस्था /नवी दिल्ली भारताभोवती सैनिकी तळांची साखळी विणण्यात गर्क असलेल्या चीनला प्रत्युत्तर म्हणून भारतही हिंदी महासागरात सैनिकी तळ स्थापन करीत आहे. यामुळे भारताच्या दक्षिणेचा सागरतटाची सुरक्षा वाढणार आहे. याच दृष्टीकोनातून भारत आणि मॉरीशस या देशांनी काही संयुक्त प्रकल्प योजिलेले आहेत. त्यांपैकी एक प्रकल्प विमान धावपट्टीचा आहे. […]

हिंदी महासागरात भारताचा सैनिकी तळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मॉरीशसमध्ये विमान धावपट्टीचे उद्घाटन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताभोवती सैनिकी तळांची साखळी विणण्यात गर्क असलेल्या चीनला प्रत्युत्तर म्हणून भारतही हिंदी महासागरात सैनिकी तळ स्थापन करीत आहे. यामुळे भारताच्या दक्षिणेचा सागरतटाची सुरक्षा वाढणार आहे. याच दृष्टीकोनातून भारत आणि मॉरीशस या देशांनी काही संयुक्त प्रकल्प योजिलेले आहेत. त्यांपैकी एक प्रकल्प विमान धावपट्टीचा आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी संयुक्तरित्या केले आहे. चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही आपली ‘मोतियोंकी माला’ नामक योजना साकारावयास प्रारंभ केला आहे. या योजनेच्या अंतर्गत हिंदी महासागरातील मॉरीशस या मित्रदेशात भारताने एक विमान धावपट्टीचे निर्माणकार्य केले आहे. या धावपट्टीचा उपयोग आवश्यकता भासल्यास युद्ध विमानांच्या उ•ाणांसाठीही केला जाऊ शकेल. ही धावपट्टी अगालेगा बेटावर आहे.
चीनचा आफ्रिकेत तळ
चीनने आफ्रिकेत जिबुती येथे एक मोठा नौकादल तळ स्थापन केला आहे. आता चीनच्या विमानवाहू नौकाही या तळावर येऊ लागल्या आहेत. या तळाचा सर्वाधिक धोका भारतालाच आहे. तो लक्षात घेऊन भारतानेही मेरीशसच्या अगालेगा बेटावर मोठ्या प्रमाणात विकासकार्य चालविले आहे. या बेटावर केवळ विमानाची धावपट्टीच नव्हे, तर एक समुद्री जेटी आणि इतर आस्थापनेही विकसीत करण्यात आली आहेत. मॉरीशसचे भारताला सहकार्य मिळत आहे.
मॉरीशसकडून भारताची प्रशंसा
विमान धावपट्टीचे संयुक्त उद्घाटन केल्यानंतर मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी भारताची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर भारताने मोठ्या प्रमाणात मॉरीशसकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला आहे. मॉरीशसमध्ये भारताचे अनेक विकास प्रकल्प असून त्यांचा लाभ दोन्ही देशांना मिळणार आहे. अनेक बहुउद्देशीय प्रकल्पांचाही त्यांच्यात समावेश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकमेकांना आवश्यकता
दक्षिण गोलार्धात चीनचे आव्हान वाढत असताना भारत आणि मॉरीशस या दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करुन संरक्षण सज्जता ठेवण्याची मोठीच आवश्यकता आहे. ती लक्षात घेऊनच दोन्ही देशांनी त्यांच्यातील परस्पर संबंध वेगळ्या पातळीवर नेले आहेत. भारताकडून मॉरीशसमध्ये साकारले जात असलेले प्रकल्प याच वाढत्या संबंधांचे प्रतीक आहेत, अशी चर्चा आता केली जात आहे.
मैत्रीचे भागिदारीत रुपांतर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांची पाचवेळा भेट घेतली आहे. या दोन्ही देशांमध्ये पूर्वापारपासून जवळीकीचे संबंध आहेत. मॉरीशसमधील बहुतेक लोकसंख्या ब्रिटीशांच्या काळात भारतातून तेथे गेलेल्या लोकांचीच आहे. त्यामुळे या देशाचे भारताशी असणारे बंध हे अतूट आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये हे संबंध भागिदारीत परावर्तीत झाले असून आता दोन्ही देश एकमेकांच्या संरक्षणहितांसाठीही एकत्रितरित्या कार्य करु लागले आहेत. चीनचा हिंदी महासागरातील वाढता प्रभाव मर्यादित करण्यासाठी ही भागीदारी आवश्यकच आहे, असे मत अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांचेही आहे.
भारत-मॉरीशस मैत्रीचा नवा पैलू

भारत आणि मॉरीशस यांचे आता धोरणात्मक क्षेत्रातही सहकार्य
 मॉरीशसमध्ये भारताचे बहुउद्देशीय प्रकल्प, संरक्षणासाठीहा उपयुक्त
भारताच्या मैत्रीची मॉरीशस पंतप्रधान जगन्नाथ यांच्याकडून प्रशंसा