भारतीय संविधान भारताचेच नव्हे, जगाचेही रक्षण करते!

सरप्रीतसिंग गील यांचे प्रतिपादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी पणजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर निर्मिलेले भारतीय संविधान हे केवळ भारताचेच नव्हे, तर जगाचे रक्षण करते. त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून भारताची ओळख साऱ्या जगभर पसरवली. म्हणूनच त्यांची जयंती केवळ भारतातच नव्हे, तर जगातील सर्व राष्ट्रांत अभिमानाने साजरी केली जाते. डॉ. आंबेडकर यांनी […]

भारतीय संविधान भारताचेच नव्हे, जगाचेही रक्षण करते!

सरप्रीतसिंग गील यांचे प्रतिपादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
पणजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर निर्मिलेले भारतीय संविधान हे केवळ भारताचेच नव्हे, तर जगाचे रक्षण करते. त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून भारताची ओळख साऱ्या जगभर पसरवली. म्हणूनच त्यांची जयंती केवळ भारतातच नव्हे, तर जगातील सर्व राष्ट्रांत अभिमानाने साजरी केली जाते. डॉ. आंबेडकर यांनी भारत देशासाठी दिलेल्या योगदानाचा विसर पडू न देणे हाच आपला संकल्प असावा, असे उद्गार आदिवासी कल्याण खात्याचे सचिव सरप्रीत सिंग गिल यांनी काढले. पणजीतील डॉ. बाबासाहेब आबंडेकर उद्यानात काल रविवारी त्यांच्या 133 व्या जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती व जमाती गोवा राज्य आयोगाचे आयुक्त दीपक करमळकर, समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर, प्रमुख वक्ते सुधाकर किरा बौद्ध, भारतीय बौद्ध महासभा गोवा शाखेचे अध्यक्ष एस. के. जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गोवाचे अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, गोवाच्या अध्यक्ष वासंती परवार, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे कार्याध्यक्ष कृष्णा कोरगावकर, अध्यक्ष सतीश कोरगावकर, माजी अध्यक्ष अशोक परवार, भारतीय बौद्ध महासभेचे मडगाव गटाचे अध्यक्ष शिवाजी सोनावणे, उपाध्यक्ष प्रफुल्ल तायडे, रामदास सोनवणे, गोवा राज्याचे भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष जनार्दन ताम्हणकर, तिसवाडी गटाचे अध्यक्ष राहुल तायडे व समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला आदिवासी कल्याण खात्याचे सचिव सरप्रीतसिंग गिल यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर समई प्रज्वलित करून व प्रतिमेस पुष्प वाहून जयंती सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली.
संविधानाच्या चौकटीत राहून कार्य करावे
दीपक करमळकर यांनी डॉ. आंबेडकर यांचे कार्य व जीवन याविषयी भाष्य करताना सांगितले की, आज देशात सर्व कायदे व नियम हे केवळ संविधानामुळे मिळालेले आहेत. संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत राहून प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसवले तरीही त्यांनी आपले तन-मन केवळ शिक्षणाकडे एकाग्र करून ते उच्च विद्याविभूषित झाले. समाजबांधवांनीही शिक्षण घेताना विचलित होऊ नये. अनुसूचित जाती व जमाती आयोगामार्फत समाजबांधवांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या योजनांचा फायदा घेऊन आपला व समाजातील प्रत्येक घटकाचा उद्धार साधावा, असे ते म्हणाले.
आंबेडकर भवनचा प्रश्न मार्गी लावा
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष सतीश कोरगावकर यांनी समाजाच्या व्यथा व प्रश्न मांडताना सरकारी पातळीवर अधिकाऱ्यांनीही सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून पर्वरी येथील डॉ. आंबेडकर भवनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने तो निवडणूक आचारसंहितेनंतर तरी मार्गी लागावा, अशी व्यासपीठावरील सरकारी अधिकाऱ्यांकडे मागणी केली. यावेळी समाजबांधवांच्या मुलांनी भीमवंदना गायिली. डॉ. दयानंद राव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आंबेडकर उद्यानात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पर्वरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे सरकारी दरबारी पडून आहे. केवळ बहुजन बांधवांची राज्यात संख्या कमी आहे म्हणून की काय याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न पडतो, असे भारत मुक्ती मोर्चाचे गोवा राज्य अध्यक्ष जनार्दन ताम्हणकर व राहुल तायडे म्हणाले. राज्यात प्रथमच राज्य सोहळा म्हणून डॉ. आंबेडकर जयंतीचे आयोजन समाजकल्याण खात्यामार्फत करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याने कार्यक्रमात लोकप्रतिनिधी उपस्थित राहू शकले नसले तरी राज्यभरातून विविध संघटनांचे प्रतिनिधी व समाजबांधव उपस्थित राहिले होते.
मुख्यमंत्र्यांकडून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
निवडणूक आचारसंहितेमुळे मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उपस्थित राहू शकले नसले तरी संध्याकाळी जयंती सोहळा कार्यक्रम संपण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीचे आरजीचे उमेदवार मनोज परब यांनीही पणजीतील डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले.