‘बॅडमिंटन आशिया’ सांघिक स्पर्धेसाठी भारत सज्ज

वृत्तसंस्था/ शाह आलम (मलेशिया) थॉमस चषक विजेता भारत बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेत उतरण्यास आणि आतापर्यंत हुलकावणी दिलेला मुकूट पटकावण्याच्या दृष्टीने मोहीम सुरू करण्यास सज्ज झालेला आहे. थॉमस कपमधील जादुई कामगिरीची पुनरावृत्ती येथे घडविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होईल. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकलेल्या पी. व्ही. सिंधूचे दुखापतीतून पुनरागमन हे सहभागी होणाऱ्या संघाचे एक वैशिष्ट्या आहे. 2022 मध्ये थॉमस […]

‘बॅडमिंटन आशिया’ सांघिक स्पर्धेसाठी भारत सज्ज

वृत्तसंस्था/ शाह आलम (मलेशिया)
थॉमस चषक विजेता भारत बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेत उतरण्यास आणि आतापर्यंत हुलकावणी दिलेला मुकूट पटकावण्याच्या दृष्टीने मोहीम सुरू करण्यास सज्ज झालेला आहे. थॉमस कपमधील जादुई कामगिरीची पुनरावृत्ती येथे घडविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होईल. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकलेल्या पी. व्ही. सिंधूचे दुखापतीतून पुनरागमन हे सहभागी होणाऱ्या संघाचे एक वैशिष्ट्या आहे.
2022 मध्ये थॉमस चषक जिंकलेला आणि गेल्या वर्षीच्या आशियाई क्रीडास्पर्धेत पहिले रौप्यपदक मिळविलेला भारतीय पुऊष संघ या आठवड्यात होणाऱ्या या खंडीय स्पर्धेत पूर्ण जोमाने प्रयत्न करेल. 2016 आणि 2018 च्या स्पर्धांत त्यांनी कांस्यपदक जिंकले होते. मात्र भारतीय पुऊष संघासाठी या स्पर्धेतील वाटचाल सोपी नसेल. कारण ‘अ’ गटातील साखळी सामन्यांमध्ये चीन आणि हाँगकाँगचा सामना त्यांना करावा लागेल.
तथापि, एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात फार्मात असलेली दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रान्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचाही समावेश असून हा संघ अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवून बाद फेरीतील स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल. सिंधूच्या नेतृत्वाखालील महिला संघाची त्यांच्या तुलनेत खूपच चांगली स्थिती आहे. कारण त्यांच्या ‘डब्ल्यू’ गटातील चीन हा अन्य एकमेव संघ आहे आणि त्यामुळे भारताला बाद फेरीत प्रवेश मिळणे निश्चित आहे. असे असले, तरी या स्पर्धेतील आव्हान महिला संघासाठी कमी कठीण नाही. सिंधू आणि दुहेरीतील दोन जोड्यांवर हा संघ अवलंबून असेल. त्यात राष्ट्रकुल खेळातील कांस्यपदक विजेत्या ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद आणि गुवाहाटी मास्टर्स 2023 च्या विजेत्या अश्विनी पोनप्पा-तनिशा क्रास्टो यांचा समावेश आहे.
‘थायलंड ओपन सुपर 300’मध्ये उपांत्य फेरीत पोहोचलेली अश्मिता चालिया, 16 वर्षीय वरिष्ठ राष्ट्रीय विजेती अनमोल खर्ब आणि बॅडमिंटन आशिया कनिष्ठ स्पर्धेतील पदकविजेती तन्वी शर्मा यासारख्या तरुण आणि दुसऱ्या फळीतील भारतीय खेळाडूंवर देखील लक्ष राहणार आहे. या महत्त्वपूर्ण स्पर्धेत हे खेळाडू आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कामगिरी करून दाखविण्यास उत्सुक असतील.
बुधवारी येथील सेतिया सिटी कन्व्हेन्शन सेंटर येथे भारतीय पुरुष संघ हाँगकाँगचा आणि महिला चमू चीनचा सामना करून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. हाँगकाँगकडे जागतिक क्रमवारीत 18 व्या आणि 22 व्या क्रमांकावर असलेले दोन बलवान पुरुष एकेरीतील खेळाडू असले, तरी त्यांच्याकडे दुहेरीत चांगली जोडी नाही आणि भारत निश्चितच याचा फायदा उठवू पाहेल.
पण महिला संघाला तशी अनुकूलता लाभणार नाही. चीनच्या संघात ऑलिम्पिक विजेती चेन यू फीची उपस्थिती नसली, तरी जागतिक क्रमवारीत 8 व्या क्रमांकावर असलेली हान यू, 9 व्या क्रमांकावर असलेली वांग झी यी आणि 15 व्या क्रमांकावर असलेली झांग यी मॅन या खेळाडूंचे आव्हान चालिया आणि खर्ब यांना जड जाऊ शकते. चीन देखील त्यांच्या दुहेरीतील अव्वल जोडीशिवाय उतरणार असला, तरी जागतिक क्रमवारीत 4 व्या क्रमांकावर असलेली लिऊ शेंग शू आणि टॅन निंग ही जोडी कडवी प्रतिस्पर्धी राहील.
पी. व्ही. सिंधू करणार पुनरागमन
सिंधूच्या दृष्टीने या स्पर्धेला अधिक महत्त्व आहे. कारण ती तिची तंदुरुस्ती याद्वारे आजमावून पाहण्याचा प्रयत्न करेल. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून ती खेळलेली नसून या स्पर्धेतील कामगिरी तिला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्यास उपयोगी ठरेल. 28 वर्षीय सिंधूला फ्रेंच ओपनमध्ये गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यातून सावरून परत तंदुरुस्त होण्यास तिला थोडा वेळ लागला. त्यानंतर तिने ‘पीपीबीए’ येथे मार्गदर्शक प्रकाश पदुकोन यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेण्यासाठी बेंगळुरुला आपला मुक्काम हलविला. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याच्या दृष्टीने जी शर्यत चालू झाली आहे त्याचाही विचार करता ही खंडीय स्पर्धा खेळाडूंकरिता महत्त्वपूर्ण आहे. कारण या स्पर्धेतून मौल्यवान पात्रता गुण मिळणार आहे.