भारत कसोटी, टी-20 मध्ये ‘ओव्हररेटेड’ संघ : श्रीकांत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सध्याच्या कसोटी संघातील अनेक खेळाडूंना त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी करता आलेली नसल्यामुळे भारत हा कसोटीत ‘ओव्हररेट’ केलेला संघ असल्याची प्रतिक्रिया माजी सलामीवीर कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी व्यक्त केली आहे.  सेंच्युरियन येथील दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा डावाने पराभव झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांची ही टिप्पणी आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेले यश 64 […]

भारत कसोटी, टी-20 मध्ये ‘ओव्हररेटेड’ संघ : श्रीकांत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्याच्या कसोटी संघातील अनेक खेळाडूंना त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी करता आलेली नसल्यामुळे भारत हा कसोटीत ‘ओव्हररेट’ केलेला संघ असल्याची प्रतिक्रिया माजी सलामीवीर कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी व्यक्त केली आहे.  सेंच्युरियन येथील दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा डावाने पराभव झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांची ही टिप्पणी आली आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेले यश 64 वर्षीय श्रीकांतला मान्य आहे. परंतु भूतकाळातील गौरवास्पद कामगिरीच्या आधारे आपण जगू शकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये आमचा अपेक्षेहून जास्त गाजावाजा करण्यात आला आहे, असे श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले आहे. मला वाटते की, तो 2-3 वर्षांचा टप्पा होता जेव्हा विराट कोहली संघाचा कर्णधार होता. तेव्हा आम्ही अप्रतिम कामगिरी केली. आम्ही इंग्लंडमध्ये वर्चस्व गाजवले, दक्षिण आफ्रिकेत आम्ही चिवट झुंज दिली, ऑस्ट्रेलियात आम्ही जिंकलो. आमचा 2-4 वर्षांचा सदर टप्पा चांगला गेला, असे श्रीकांत पुढे म्हणाले.
जागतिक कसोटी स्पर्धेच्या गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. परंतु श्रीकांत यांना वाटते की, आयसीसी क्रमवारी विसरण्याची वेळ आली आहे. आम्ही आयसीसी क्रमवारी विसरली पाहिजे. आम्ही नेहमी पहिल्या वा दुसऱ्या क्रमांकावर असतो. पण हे आवश्यकतेहून जास्त गाजावाजा केलेले क्रिकेटपटू आणि क्षमतेनुसार कामगिरी न करणारे लोक यांचे मिश्रण आहे. तर कुलदीप (यादव) सारख्या काही खेळाडूंना पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत, असे मत श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे. तुम्हाला सर्वोत्कृष्ट संघ बनायचे असेल, तर तुम्ही घरच्या मैदानावर दिग्गज होण्यास सक्षम असले पाहिजे. ऋषभ पंतने धडाका लावला होता तेव्हा आम्ही तेच केले होते, असे ते म्हणाले.
तुम्ही परत परत असे म्हणू शकता की, आम्ही ऑस्ट्रेलियात धावा केल्या, आम्ही इंग्लंडमध्ये धावा केल्या. तुम्ही तोच सूर आळवत राहू शकता. पण आपण भूतकाळातील गौरवांवर आधारून राहिलो, तर पुढे जाणार नाही. गेल्या दोन वर्षांत, गेल्या 18 महिन्यांत हातून कशी कामगिरी झाली आहे ते पाहावे लागेल, याकडे श्रीकांत यांनी लक्ष वेधले. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील भारताच्या कामगिरीबद्दल बोलताना ते म्हणाले की, टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा आवश्यकतेहून जास्त गाजावाजा केला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र आम्ही एक उत्कृष्ट संघ आहोत. एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील उपांत्य फेरीत, अंतिम फेरीत जे काही घडते ते एका सामन्यापुरते असते. यात नशिबाचा घटकही असतो. या सामन्यांमध्ये नशिबावर बरेच काही अवलंबून असते, असेही ते म्हणाले.