‘इंडिया’ ही काँग्रेसची कौटुंबिक फायद्याची युती

भाजप प्रवक्ते यतीश नाईक यांची टीका : भाजपविरोधी वक्तव्याबद्दल काँग्रेसचा निषेध पणजी : लोकांनी झिडकारलेल्या आणि बाहेरचा रस्ता दाखविलेल्या अनेक भाजपविरोधी पक्षांची ’इंडिया’ नावाने घडवून आणलेली युती ही काँग्रेसची कौटुंबिक फायद्याची युती आहे. अशा युतीतील काही नेते बेताल, बेजबाबदार आणि अर्थहिन वक्तव्ये, आरोप करून भाजप आणि त्यांच्या नेत्यांबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे दुष्कृत्य करत आहेत, अशा […]

‘इंडिया’ ही काँग्रेसची कौटुंबिक फायद्याची युती

भाजप प्रवक्ते यतीश नाईक यांची टीका : भाजपविरोधी वक्तव्याबद्दल काँग्रेसचा निषेध
पणजी : लोकांनी झिडकारलेल्या आणि बाहेरचा रस्ता दाखविलेल्या अनेक भाजपविरोधी पक्षांची ’इंडिया’ नावाने घडवून आणलेली युती ही काँग्रेसची कौटुंबिक फायद्याची युती आहे. अशा युतीतील काही नेते बेताल, बेजबाबदार आणि अर्थहिन वक्तव्ये, आरोप करून भाजप आणि त्यांच्या नेत्यांबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे दुष्कृत्य करत आहेत, अशा शब्दात भाजप प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी निषेध केला. गुऊवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार संकल्प आमोणकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक यांची त्यावेळी उपस्थिती होती. बुधवारी सायंकाळी गोव्यात झालेल्या बैठकीत हे नेते एकमेकांच्या सुरात सूर मिसळून आणि गळ्यात गळे घालून सौजन्याची, एकतेची भाषा बोलत होते तर त्याच दिवशी सकाळी पंजाबमध्ये झालेल्या बैठकीत एकमेकांचा गळा पकडण्यासारखी त्यांच्यात जोरदार हमरीतुमरी होत होती हे व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल्याचे अॅड. नाईक यांनी सांगितले. आज देशभरात मतदार सुशिक्षित आणि हुशार झालेले आहेत. विरोधी पक्षांची ही नाटके ते पाहात आहेत. बुधवारी युतीच्या नेत्यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांचा नेता कोण तेच स्पष्ट होत नव्हते, त्यांचे ध्येय काय, धोरण काय, कार्यक्रम काय, यासंबंधी कोणताही उल्लेख होत नव्हता. याऊलट तब्बल चार वेळा देशभरातील मतदारांनी नाकारलेल्या पक्षाला पुन्हा सत्तास्थानी आणण्यासाठी चालविलेले केविलवाणे प्रयत्न हेच धोरण असल्याचे मात्र जाणवत होते. अशावेळी भाजपसारख्या पक्षावर आरोप आणि अर्थहिन टीका करण्याचे त्यांचे कृत्य निषेधार्ह आहे. पंजाबात सत्तास्थानी असलेल्या आम आदमी पक्षाला काँग्रेसची सोबत नको आहे, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला काँग्रेस नको आहे, असे नाईक म्हणाले.
अध्यक्षानेच गोव्यात काँग्रेस संपविली : आमोणकर
संकल्प आमोणकर यांनी बोलताना गोव्यातून काँग्रेस पक्ष जवळजवळ संपलेला असून त्यासाठी विद्यमान अध्यक्ष अमित पाटकर हेच जबाबदार असल्याचा दावा केला. विधानसभा निवडणुकीच्या केवळ तीन महिन्यापूर्वी पक्षात आलेल्या या व्यक्तीने नंतरच्या दोन वर्षात काँग्रेसच्या वाढीसाठी न वावरत तो पक्ष नेस्तनाबूत करण्यासाठीच शक्ती वापरली, त्यामुळे जुने, जाणते अनुभवी असे सर्व नेते या पक्षापासून दूर झाले, असे आमोणकर म्हणाले.
… हा तर ’उलटा चोर कोतवाल को डाटे’ असाच प्रकार : सिद्धेश
सिद्धेश नाईक यांनी बोलताना, भाजपने आतापर्यंत तब्बल 195 उमेदवार जाहीर केले आहेत, लवकरच दुसऱ्या टप्प्यातील नावेही जाहीर होणार आहेत. याउलट काँग्रेसमध्ये अद्याप सामसूम आणि आलबेल आहे. तरीही बुधवारी त्यांचे काही नेते, ‘भाजप अद्याप उमेदवार जाहीर करत नाही’, असे वक्तव्य करतात. हा प्रकार म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’, या उक्तीसारखा आहे, अशी टीका केली.