भारताची अण्वस्त्रे पाकिस्तानहून अधिक

एसआयपीआरआयचा अहवाल प्रसिद्ध : चीन जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अण्वस्त्रांच्या संख्येत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. ही माहिती स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआयपीआरआय) या संस्थेच्या नव्या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालानुसार भारताकडे आजमितीस 172 अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रे आहेत. 2023 ते 2024 या एक वर्षाच्या कालावधीत भारताने […]

भारताची अण्वस्त्रे पाकिस्तानहून अधिक

एसआयपीआरआयचा अहवाल प्रसिद्ध : चीन जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अण्वस्त्रांच्या संख्येत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. ही माहिती स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआयपीआरआय) या संस्थेच्या नव्या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालानुसार भारताकडे आजमितीस 172 अण्वस्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रे आहेत. 2023 ते 2024 या एक वर्षाच्या कालावधीत भारताने आपल्या अण्वस्त्रांमध्ये आठ अण्वस्त्रांची वाढ केली आहे. गेल्या वर्षापर्यंत पाकिस्ताची संख्या भारतापेक्षा जास्त होती.
2023 च्या जानेवारीपर्यंत भारताकडे 164 अण्वस्त्रे होती. तर पाकिस्तानकडे त्यांची संख्या 170 इतकी होती. एक वर्षात, अर्थात जानेवारी 2024 पर्यंत भारताने आठ अण्वस्त्रांची वाढ करुन पाकिस्तानला मागे टाकले. पाकिस्तानने या एक वर्षात अण्वस्त्रांची संख्या वाढविल्याचे दिसून येत नाही. चीनकडे सध्या 500 अण्वस्त्रांचा साठा असून त्यांच्यापैकी 24 अण्वस्त्रे त्या देशाने डागण्यासाठी सज्ज ठेवली आहेत. भारत आणि पाकिस्ताकडे डागण्यासाठी सज्ज स्थितीत असलेली अण्वस्त्रे नाहीत, अशीही माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
भारताकडून किंचित वाढ
गेल्या एक वर्षाच्या कालावधीत भारताने आपल्या अण्वस्त्र साठ्यात किंचित वाढ केली आहे. भारताचा साठा आठने वाढला आहे. तर याच कालावधीत चीनचा साठा 90 ने वाढल्याचे दिसून येते. गेल्यावर्षीपर्यंत चीनकडे 410 अण्वस्त्रs होती. सध्या जगात डागण्याच्या स्थितीत असलेल्या अण्वस्त्रांची संख्या 2,100 इतकी असून त्यांच्यापैकी बहुतेक रशिया आणि अमेरिकेची आहेत. मात्र, गेल्या काही कालावधीत चीननेही त्याची काही अण्वस्त्रे डागण्याच्या स्थितीत आणून ठेवली आहेत. आज जगात अण्वस्त्रे असलेल्या ज्ञात देशांची संख्या 9 इतकी आहे.
अन्य काही देशांसंबंधी संशय
इराणसह अन्य दोन देशांकडे अण्वस्त्रे असण्याची किंवा ती बनविण्याची साधनसामग्री असण्याची शक्यता आहे. या देशांनी अधिकृतरित्या तशी घोषणा केलेली नाही. मात्र, त्यांच्या गेल्या काही वर्षांमधील हालचालींवरुन तसा संशय घेण्यास जागा आहे, असे मत अनेक जागतिक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
डागण्यासाठी सज्ज म्हणजे काय
जी अण्वस्त्रे कोणत्याही क्षणी सोडली जाऊ शकतात, त्यांना डागण्यासाठी सज्ज किंवा डिप्लॉईट अण्वस्त्रे असे म्हणतात. ही अण्वस्त्रे त्यांना घेऊन जाणाऱ्या क्षेपणास्त्रांवर स्थापित करण्यात आलेली असतात. त्यांचे नियंत्रण पूर्णत: त्यांच्या देशांच्या प्रमुखाकडे असते. ही अण्वस्त्रे आज्ञा मिळाल्यानंतर त्वरित सोडली जातील अशा स्थितीत असतात. इतर अण्वस्त्रे ही सैन्याजवळच्या साठ्यात असतात. ती चोवीस तासांच्या आत डागण्याच्या स्थितीत आणली जाऊ शकतात.
क्षेपणास्त्रे कोणाकडे जास्त
अण्वस्त्रे ही क्षेपणास्त्रांवर स्वार करुन डागली जातात. तसेच ती अण्वस्त्रवाहू युद्ध विमानांमधून, युद्धनौकांवरुन किंवा पाणबुड्यांमधून डागली जाऊ शकतात. अण्वस्त्रे डागण्यासाठी योग्य साधनांची किंवा वाहकांची संख्या अमेरिका आणि रशियाकडे सर्वात जात आहे. तथापि, चीनही आता या स्पर्धेत आला असून अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची संख्या झपाट्याने वाढविण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असे मानले जाते.
तीन देश सक्षम
आपल्या साठ्यातील अण्वस्त्रांना डागण्याच्या स्थितीत आणण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि क्षमता विकसीत करण्याचा प्रयत्न भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या तीन देशांकडून केला जात आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या पाच देशांनी ही क्षमता यापूर्वीच विकसीत केलेली आहे. इस्रायलची स्थिती काय आहे, याची नेमकी माहिती मिळत नाही, असे मानण्यात येते.
दोन देशांकडे 90 टक्के अण्वस्त्रे
जगातील एकंदर अण्वस्त्रांपैकी 90 टक्क्यांहून अधिक अण्वस्त्रे केवळ अमेरिका आणि रशिया या दोन देशांकडे आहेत. रशियाकडे एकंदर अण्वस्त्रांची संख्या अमेरिकेपेक्षा अधिक आहे. मात्र, अमेरिकेकडे डागण्याच्या स्थितीतील अण्वस्त्रांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अमेरिका हा देश या संदर्भात अधिक सज्ज आहे.
अण्वस्त्रसज्ज राष्ट्रे आणि संख्या
राष्ट्र                  साठ्यातील संख्या         डागण्यासाठी सज्ज
अमेरिका         5,044                1,770
रशिया              5,580                1,710
ब्रिटन                225           120
फ्रान्स               290           280
चीन                   500           24
भारत                172           –
पाकिस्तान     170           –