भारत-इंग्लंड पहिली कसोटी आजपासून

भारताच्या मायदेशातील वर्चस्वाची लागणार कसोटी, ‘बाझबॉल’ वि. ‘स्पिनबॉल’ अशी लढत वृत्तसंस्था~ हैदराबाद भारतानं गेल्या 12 वर्षांत मायदेशातील मैदानावर अखंड वर्चस्व गाजविलेलं असून या वर्चस्वाची आतापर्यंतची सर्वांत अनोखी परीक्षा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून लागणार आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज गुरुवारपासून येथे सुरू होणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ रुढ प्रवाहापासून फारकत घेतलेल्या इंग्लंडचा […]

भारत-इंग्लंड पहिली कसोटी आजपासून

भारताच्या मायदेशातील वर्चस्वाची लागणार कसोटी, ‘बाझबॉल’ वि. ‘स्पिनबॉल’ अशी लढत
वृत्तसंस्था~ हैदराबाद
भारतानं गेल्या 12 वर्षांत मायदेशातील मैदानावर अखंड वर्चस्व गाजविलेलं असून या वर्चस्वाची आतापर्यंतची सर्वांत अनोखी परीक्षा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून लागणार आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज गुरुवारपासून येथे सुरू होणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ रुढ प्रवाहापासून फारकत घेतलेल्या इंग्लंडचा सामना करण्यास सज्ज झाल आहे.
 
2012 मध्ये अॅलिस्टर कूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडविरुद्ध 1-2 अशा फरकाने पराभूत झाल्यापासून मायदेशात भारताइतका कोणताही संघ अजिंक्य राहिलेला नाही. भारतानं सलग 16 मालिका जिंकलेल्या असून त्यापैकी सात मालिका तर त्यांनी ‘क्लीन स्वीप’ केलेल्या आहेत. यादरम्यान भारताने मायदेशात खेळलेल्या 44 पैकी फक्त तीन कसोटी गमावलेल्या आहेत आणि 80 च्या दशकात वर्चस्व गाजविलेल्या वेस्ट इंडिज किंवा नवीन सहस्रकाच्या आरंभी वर्चस्व गाजविलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा ही कामगिरी जास्त प्रभावी आहे.
गेल्या दशकभरातील भारताच्या या अभूतपूर्व कामगिरीला अनेक घटक कारणीभूत आहेत. यात अनुकूल खेळपट्ट्या, त्यांचा कसा फायदा घ्यायचा हे माहीत असलेले गोलंदाज आणि भरभरून धावा जमविणारे फलंदाज यांचा समावेश होतो. पण या विजयांमध्ये दोन खेळाडू बाकीच्यांपेक्षा जास्त उठून दिसतात आणि ते म्हणजे ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा. ही जोडी गुऊवारपासून आरजीआय स्टेडियमवर आपली करामत दाखविण्यास सज्ज झालेली असेल. येथील खेळपट्टीवर सामना जसजसा पुढे सरकेल तसतसा चेंडू वळू लागेल असा अंदाज आहे.
 
यापूर्वीच्य दौऱ्यांचा अनुभवांवरून हे दोन्ही फिरकीपटू काय करू शकतात याची इंग्लंडला कल्पना आहे आणि ते त्यांच्याविषयी, खास करून अश्विनबद्दल चिंतीत असतील. या 37 वर्षीय खेळाडूने 2012 पासून 46 कसोटींमध्ये 19 च्या सरासरीने 283 बळी घेतले आहेत. जडेजाकडे अनेकदा अश्विनला आधार देणारा फिरकी गोलंदाज म्हणून बघितले जात असले, तरी तोही कमी धोकादायक नाही. प्रसंगी तो फलंदाजांना भरपूर गोंधळात टाकू शकतो. जडेजाने 39 कसोटी सामन्यांमध्ये 191 बळी आहेत. या दोघांनी मिळून 21 च्या सरासरीने 500 बळी घेतलेले आहेत.
भारत अक्षर पटेल किंवा कुलदीप यादव यांच्या रूपाने तिसरा फिरकीपटू देखील खेळविण्याची शक्यता आहे. या क्षणी एकंदरित स्थिती पाहता अक्षरला जास्त संधी आहे. अबुधाबीमधील खेळपट्ट्यांवर खेळण्यासह फिरकीचा सामना करण्याच्या दृष्टीने इंग्लंडने भरपूर तयारी केलेली असली, तरी ती पुरेशी होणार नाही याची त्यांना जाणीव असेल. त्यांना आपल्या मनातील फिरकीच्या धास्तीवर नियंत्रण मिळवावे लागेल. मात्र भारताकडे यावेळी फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर विराट कोहली नसेल अन् ही बाब इंग्लंडला बळ देऊन जाऊ शकते. विराटने वैयक्तिक कारणांमुळे सुऊवातीच्या दोन कसोटी सामन्यांतून अंग काढून घेतले आहे.
इंग्लंडविरुद्ध विराटने 28 कसोटी सामन्यांतून 5 शतकांसह 1991 धावा केलेल्या आहेत. परंतु या आकड्यांपेक्षा कठीण प्रसंगांवर वर्चस्व मिळवण्याच्या विराटच्या क्षमतेची उणीव भारताला अधिक जाणवेल. मधल्या फळीतील फलंदाज रजत पाटीदार हा हैदराबाद आणि विशाखापट्टणममधील सामन्यांसाठी कोहलीच्या जागी संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. असे असले, तरी चौथ्या आणि sंsंपाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल फलंदाजीस येतील आणि के. एस. भरत यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळेल.
विराट कोहली नसला, तरी ’बाझबॉल’साठी प्रसिद्ध इंग्लंडच्या दृष्टीने भारत हा अजूनही एक मोठा अडथळा आहे. अर्थात त्यांनी 2022 च्या उत्तरार्धात पाकिस्तानमध्ये 3-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकलेली आहे. परंतु भारतातील आव्हान खूप खडतर आहे. युवा ऑफस्पिनर शोएब बशीरला भारतीय व्हिसा प्रक्रियेतील विलंबामुळे परतावे लागलेले असून या प्रकारामुळे संघ निश्चितच अस्वस्थ झालेला असेल. कर्णधार बेन स्टोक्सने या 20 वर्षीय गोलंदाजाविषयी आपल्याला खूप वाईट वाटले असल्याचे म्हटले आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की, इंग्लंड चमत्कार घडवून आणण्यास पूर्णपणे असमर्थ आहे. स्टोक्स व प्रशिक्षक ब्रेंडन मॅकुलम यांच्या नेतृत्वाखाली ते क्रिकेटचा खरोखरच आकर्षक ब्रँड तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. असे असले, तरी पाहुण्यांना चांगली लढत देण्याच्या दृष्टीने अनुभवी ज्यो रूट आणि स्टोक्सकडून भरपूर धावांची तसेच जेम्स अँडरसन आणि त्यांच्या फिरकीपटूंकडून प्रभावी गोलंदाजीची गरज भासेल.
संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, के. एस. भरत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान.
इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, डॅन लॉरेन्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, ज्यो रूट, मार्क वूड.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा.