भारताची नेदरलँड्सवर 4-2 ने मात
गोलरक्षक पीआर श्रीजेश ठरला तारणहार
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी येथे एफआयएच प्रो लीगमध्ये शूट-आऊटद्वारे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नेदरलँड्सचा 4-2 असा पराभव केला. यात अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश तारणहार ठरला. श्रीजेशने शूट-आऊटमध्ये तीन फटके अप्रतिमरीत्या अडवून भारताला दोन बोनस गुण मिळवून दिले. त्यापूर्वी 60 मिनिटे दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत राहिले. या सामन्यातून नेदरलँड्सला एक गुण मिळाला.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताकडून शूटआऊटमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग, सुखजित सिंग, ललितकुमार उपाध्याय आणि समशेर सिंग यांनी गोल केले. नियमित वेळेत हार्दिक सिंग (13 वे मिनिट) आणि हरमनप्रीत (58 वे मिनिट) यांनी भारताकडून गोल केले, तर डच संघासाठी जिप जॅन्सेन (30 वे मिनिट) आणि कोएन बिजेन यांनी गोल केले. नेदरलँड्सने सामन्याच्या सुरुवातीच्या आठ मिनिटांतच भारताच्या बचावाला दडपणाखाली आणले आणि मुख्यत: भारतीय क्षेत्रात खेळ केला. पण सुरुवातीच्या या वादळाचा सामना भारतीय बचावाने समर्थपणे करत दमदार कामगिरी केली.
सुरुवातीला चेंडूवर ताबा राखण्यात भारतीयांना अपयश आले असले, तरी जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतसा त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. 12 व्या मिनिटाला भारताला एकामागोमाग एक पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु आपल्या 200 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणाऱ्या हरमनप्रीतला डच बचाव भेदता आला नाही. नेदरलँड्सच्या सुऊवातीच्या वर्चस्वानंतर भारताला आघाडी मिळवून देण्यात हार्दिकच्या उत्कृष्ट प्रयत्नांचा मोठा वाटा राहिला. त्याने सुखजित सिंगला सोबत घेऊन त्याचा 10 वा आंतरराष्ट्रीय गोल केला.
मध्यांतरानंतर अवघ्या 12 सेकंदांत नेदरलँड्सने पेनल्टी कॉर्नरवर बरोबरी साधली आणि जॅन्सेनने आपल्या कारकिर्दीतील 52 वा गोल एका दमदार फ्लिकसह केला. त्यानंतर भारतीय बचाव फळीवर त्यांनी भरपूर दबाव घातला आणि आघाडी घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना तिसरे सत्र सुरू झाल्यानंतर नऊ मिनिटांनी पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून यश आले. यावेळी जॅस्पर ब्रिंकमनचा फ्लिक भारतीय गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकने अडविल्यानंतर कोएन बिजेनने परत आलेला चेंडू फटकावून गोल केला. एका गोलने पिछाडीवर पडलेल्या भारतीय खेळाडूंनी शेवटच्या 10 मिनिटांत जोरदार दबाव आणला आणि सामना संपण्यास अवघी दोन मिनिटे असताना ‘व्हिडीओ रेफरल’द्वारे मिळविलेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलात रुपांतर करून हरमनप्रीतने बरोबरी साधून दिली. भारताचा पुढील सामना 15 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
Home महत्वाची बातमी भारताची नेदरलँड्सवर 4-2 ने मात
भारताची नेदरलँड्सवर 4-2 ने मात
गोलरक्षक पीआर श्रीजेश ठरला तारणहार वृत्तसंस्था/ भुवनेश्वर भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी येथे एफआयएच प्रो लीगमध्ये शूट-आऊटद्वारे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नेदरलँड्सचा 4-2 असा पराभव केला. यात अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश तारणहार ठरला. श्रीजेशने शूट-आऊटमध्ये तीन फटके अप्रतिमरीत्या अडवून भारताला दोन बोनस गुण मिळवून दिले. त्यापूर्वी 60 मिनिटे दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत […]