भारत-बांगलादेश आज उपांत्य फेरीची लढत

वृत्तसंस्था /डंबुला 2024 च्या आशिया चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे भारत आणि बांगलादेश तसेच श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार आहे. भारताचा हा सामना दुपारी 2 वाजता तर उपांत्य फेरीचा दुसरा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ या स्पर्धेतील सुरूवातीपासूनच संभाव्य विजेता म्हणून […]

भारत-बांगलादेश आज उपांत्य फेरीची लढत

वृत्तसंस्था /डंबुला
2024 च्या आशिया चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे भारत आणि बांगलादेश तसेच श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार आहे. भारताचा हा सामना दुपारी 2 वाजता तर उपांत्य फेरीचा दुसरा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ या स्पर्धेतील सुरूवातीपासूनच संभाव्य विजेता म्हणून ओळखला जातो. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने प्राथमिक फेरीतील आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. भारतीय संघातील सलामीची फलंदाज शेफाली वर्मा हिची फलंदाजी चांगलीच बहरली असून तिने आतापर्यंत या स्पर्धेत 158 धावा जमविल्या आहेत. निगार सुलतानच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघाविरुद्धच्या शुक्रवारच्या सामन्यात शेफाली वर्मा पुन्हा एकदा आपल्या संघाच्या डावाला दमदार सुरूवात करुन देईल, अशी अपेक्षा आहे. बांगलादेश संघाची भिस्त प्रामुख्याने फिरकी गोलंदाजीवर अधिक असल्याने भारताच्या फलंदाजांना आक्रमक फटकेबाजी करताना अधिक जागरुक रहावे लागेल आहे.
या स्पर्धेत प्राथमिक फेरीतील पहिल्या  सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गड्याने तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातचा 78 धावांनी आणि तिसऱ्या सामन्यात नेपाळचा 82 धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघ बांगलादेशला कमी लेखण्याची चूक करणार नाही. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामीच्या जोडीवर भारताच्या फलंदाजीची प्रामुख्याने भिस्त राहिल. डावाला दमदार सुरूवात होण्याची या सामन्यात गरज आहे. बांगलादेश संघातील फिरकी गोलंदाज नाहीदा अख्तर आणि रबिया खान यांनी आतापर्यंत या स्पर्धेत समाधानकारक कामगिरी केली असून या जोडीने प्रत्येकी पाच गडी बाद केले आहेत. भारतीय फलंदाजीवर दडपण आणण्यात नाहीदाचा प्रयत्न राहिल. जहाँआरा आलम आणि रिटू मोनी या बांगलादेश संघातील वेगवान गोलंदाज आहेत.
शेफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रित कौर, रिचा घोष आणि रॉड्रीग्ज हे भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहेत. दिप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकर हे भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू आहेत. डंबुलाची खेळपट्टी सुरूवातीला फलंदाजीस अनकुल असते पण दुसऱ्या सत्रात ती संथ होते. भारताचा उपांत्यफेरीचा सामना दुपारच्या सत्रात असल्याने या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाकडून अधिक धावा अपेक्षित आहेत. राधा यादव, रेणूका सिंग, दिप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकर हे भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. शुक्रवारच्या सामन्यात भारतीय संघाने 150 धावांचा टप्पा ओलांडल्यास प्रतिस्पर्धी संघाला त्याचा पाठलाग करताना अधिक झगडावे लागेल. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला हा टप्पा पुरेसा ठरु शकेल.
►भारत: हरमनप्रित कौर (कर्णधार), रिचा घोष, उमा छेत्री, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा, पूजा वस्त्रकर, अरुंधती रे•ाr, रॉड्रिग्ज, रेणूकासिंग ठाकुर, डी. हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, सजना सजीवन.
►बांगलादेश: निगार सुलताना (कर्णधार), एस. अख्तर, नाहीदा अख्तर, मुर्शिदा खातुन, शोरीफा खातुन, रिटू मोनी, रुबिया हैदर झेलिक, सुलताना खातून, जहाँआरा आलम, दिलारा अख्तर, इश्मा तांजिम, रबिया खान, रुमाना अहम्मद, मारुफा अख्तर आणि सबीकुन जस्मिन
वेळ : दुपारी 2 वाजता