भारत-ऑस्ट्रेलिया महिलांची पहिली टी-20 आज

वृत्तसंस्था /नवी मुंबई
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने आपल्या भारताच्या दौऱ्यात एकमेव कसोटी सामना गमावल्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान भारताचा एकतर्फी पराभव केला. आता उभय संघात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला येथे शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. नव्या मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. या आगामी मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघ आपल्या अष्टपैलू कामगिरीत सुधारणा करण्यावर अधिक भर देईल. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाला मुंबईत ऑस्ट्रेलियाकडून वनडे मालिकेत व्हाईट वॉशला सामोरे जावे लागले होते. मात्र भारतीय महिला संघाने अलिकडेच इंग्लंड आणि
ऑस्ट्रेलिया महिला संघांविरुद्ध कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम मात्र केला. ऑस्ट्रेलिया बरोबर झालेल्या वनडे मालिकेत भारताचे क्षेत्ररक्षण निकृष्ट झाले होते. आता टी-20 मालिकेत क्षेत्ररक्षण सुधारण्यासाठी भारतीय संघातील खेळाडुंनी अधिक लक्ष द्यावे लागेल. कर्णधार हरमनप्रित कौर फलंदाजीच सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र वनडे मालिकेत पहावयास मिळाले आहे. तिने तीन वनडे सामन्यात यापूर्वी केवळ 17 धावा जमविल्या होत्या. भारतीय संघातील जेमीमा रॉड्रीग्ज आणि रिचा घोष यांची फलंदाजीतील कामगिरी समाधानकारक झाली आहे. वनडे मालिकेत भारताच्या या दोन खेळाडूंनी आपल्या फलंदाजीत सातत्य राखले आहे. स्मृती मानधनाला वनडे मालिकेत केवळ एक अर्धशतक झळकवता आले होते.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने अलिकडेच वनडे मालिका एकतर्फी जिंकल्याने आता ते टी-20 मालिकेत आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. गोलंदाजी, फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात ऑस्ट्रेलियाची कामगिरी दर्जेदार झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघातील नवोदित लिचफिल्ड हिची फलंदाजी चांगलीच बहरत आहे. वनडे मालिकेत तिने एक शतक आणि दोन अर्धशतके नोंदविली होती. ऑस्ट्रेलियन महिला संघ सध्या टी-20 तसेच वनडे या प्रकारात जगातील सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखला जातो. यापूर्वी आयसीसीच्या तीन टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकल्या आहेत. यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार आहे.
भारत : हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), रॉड्रीग्ज, शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, रिचा घोष, अमनज्योत कौर, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुकासिंग ठाकूर, टी. साधू, पुजा वस्त्रकार, कनिका आहुजा आणि मिन्नू मणी.
ऑस्ट्रेलिया : डार्सी ब्राऊन, ग्रॅहॅम, गार्डनर, गॅरेथ, हॅरिस, अॅलिसा हिली (कर्णधार), जोनासेन, अॅलाना किंग, लिचफिल्ड, ताहिला मॅकग्रा, बेथ मुनी, इलेसि पेरी, मेगान शूट, सुदरलँड, वेरहॅम.
