जांबोटी प्रभाग क्र.2 मध्ये ग्रा.पं.सदस्य संख्या वाढवा

खानापूर तहसीलदारांना निवेदन : अपुऱ्या संख्येमुळे विकासकामावर परिणाम, पुनर्रसीमांकन करण्याची गरज वार्ताहर/जांबोटी जांबोटी प्रभाग क्रमांक दोन व भाग क्र. 30 मध्ये ज्यादा मतदार असून देखील या ठिकाणी केवळ दोनच ग्राम पंचायत सदस्य असल्याने प्रभाग क्र. दोनच्या विकासकामावर परिणाम होत आहे. या प्रभागाचे सीमांकन करून सदस्य संख्या वाढवावी, अशा मागणीचे निवेदन नुकतेच नागरिकांच्यावतीने खानापूर तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जांबोटी ग्राम […]

जांबोटी प्रभाग क्र.2 मध्ये ग्रा.पं.सदस्य संख्या वाढवा

खानापूर तहसीलदारांना निवेदन : अपुऱ्या संख्येमुळे विकासकामावर परिणाम, पुनर्रसीमांकन करण्याची गरज
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी प्रभाग क्रमांक दोन व भाग क्र. 30 मध्ये ज्यादा मतदार असून देखील या ठिकाणी केवळ दोनच ग्राम पंचायत सदस्य असल्याने प्रभाग क्र. दोनच्या विकासकामावर परिणाम होत आहे. या प्रभागाचे सीमांकन करून सदस्य संख्या वाढवावी, अशा मागणीचे निवेदन नुकतेच नागरिकांच्यावतीने खानापूर तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जांबोटी ग्राम पंचायतच्या प्रभाग क्र. दोनमध्ये रामापूर पेठ या गावाचा समावेश होतो. गावची लोकसंख्या साधारण 2000 च्या घरात आहे. तसेच नोंदणीकृत मतदार संख्या 1053 पेक्षा जास्त आहे. मात्र सीमांकन प्रक्रियेदरम्यान येथील काही मतदारांची नावे आपोआप भाग क्र. 31 मध्ये समाविष्ट झाल्यामुळे आमच्या प्रभागाचे राजकीय आणि प्रशासकीय प्रतिनिधीत्व कमी झाले असून प्रभाग क्रमांक दोनमध्ये केवळ दोनच ग्राम पंचायत सदस्य संख्या असल्यामुळे अपुऱ्या प्रतिनिधित्वामुळे स्वच्छता, पायाभूत सुविधांची देखभाल तसेच तक्रार निवारण यासारख्या प्रमुख नागरी सुविधा सोडविण्यास विलंब होत आहे.
तसेच या प्रभागाचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असल्यामुळे सर्वसमावेशक विकासकामे राबविण्याच्या दृष्टीने सदस्यांची सध्याची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर लोकशाही पद्धतीने सुरळीत प्रशासन चालविण्यासाठी प्रभाग क्रमांक दोनमधील सदस्य संख्या त्वरित वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या कर्नाटक राज्यामध्ये लवकरच ग्राम पंचायत निवडणुका होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आपण आमच्या विनंती अर्जाचा काळजीपूर्वक विचार करून जांबोटी प्रभाग क्रमांक दोन, भाग क्र. 30 मधील सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून सीमांकनामध्ये झालेला गोंधळ त्वरित दुरुस्त करावा. आणि प्रभागाच्या लोकसंख्येच्या आधारे ज्यादा सदस्य वाढवण्यासाठी क्रम घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी ग्रा. पं. सदस्य मंजुनाथ मुतगी, मारुती हळब, मिथुन कुंभार, दर्शन नाईक, दौलत कोलीककर, सचिन कुडतुरकर, मंजुनाथ डांगे, प्रकाश ओऊळकर, इम्तियाज डंबलकर, सचिन पेडणेकर यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.