हायटेक बसस्थानक, माता शिशू दवाखाना, हेस्कॉमच्या कार्यालयाचे 12 रोजी उद्घाटन

आमदार विठ्ठल हलगेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर : शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या हायटेक बसस्थानक तसेच माता शिशू दवाखान्याचे आणि हेस्कॉम कार्यालयाचे उद्घाटन दि. 12 जुलै रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री गुंडुराव, परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी, जिल्हा पालक मंत्री सतिश जारकीहोळी, महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसेच जिल्ह्यातील आमदार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आमदार […]

हायटेक बसस्थानक, माता शिशू दवाखाना, हेस्कॉमच्या कार्यालयाचे 12 रोजी उद्घाटन

आमदार विठ्ठल हलगेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
खानापूर : शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या हायटेक बसस्थानक तसेच माता शिशू दवाखान्याचे आणि हेस्कॉम कार्यालयाचे उद्घाटन दि. 12 जुलै रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री गुंडुराव, परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी, जिल्हा पालक मंत्री सतिश जारकीहोळी, महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसेच जिल्ह्यातील आमदार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बसस्थानक आवारात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. नारायण वड्डीनावर, बसआगार प्रमुख महेश तिरकन्नावर, बस नियंत्रक विठ्ठल कांबळे हे उपस्थित होते.
खानापूर शहरासाठी नव्याने हायटेक बसस्थानक मंजूर झाले होते. या हायटेक बसस्थानकाची उभारणी पूर्ण झाली असून या बस स्थानकासाठी भाजप सरकारने निधी मंजूर केला होता. हे बसस्थानक दोन एकर जागेत उभारण्यात आले आहे. यात बसस्थानक इमारत, बस थांबण्यासाठी जागा यासह दुकान गाळे तर पहिल्या मजल्यावर कार्यालय होणार आहे. या उद्घाटनाप्रसंगी विना अपघात बसचालकांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अंबारी बसचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. तालुक्यासाठी आठ नव्या बसेस उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
100 खाटांचा दवाखाना मंजूर
तालुक्यासाठी सामुदायिक दवाखान्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत खानापूरसाठी शंभर खाटांचा दवाखाना मंजूर केला असून यासाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर पेलेला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मी हार्दिक अभिनंदन करत आहे. लवकरच या नव्या दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सध्या असलेला दवाखाना पूर्णपणे पाडवून नव्याने इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी सध्या अस्तित्वात असलेला दवाखाना माता शिशू हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. या नव्या दवाखान्यात अद्ययावत यंत्रणा असणार आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना उपचाराची योग्य सोय होणार आहे, असे विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले. तसेच नव्याने बांधोल्या हेस्कॉम इमारतीचेही उद्घाटन हेणार आहे. तालुक्यातील रस्त्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. पीएमजेसीवाय योजनेतून तालुक्यातील 35 कि. मी. ग्रामीण भागातील संपर्क रस्ता निर्माण करण्यात येणार आहे. यासाठीही सिद्धरामय्यांनी मंजुरी दिली असल्याचे आमदारानी सांगितले.
दवाखान्यात डायलिसीसची सोय
तालुक्यासाठी उभारण्यात आलेले 60 खाटांचे माता शिशू दवाखान्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या दवाखान्यात 60 खाटांची व्यवस्था असून यात 40 खाट माता शिशूसाठी राखीव असून 20 खाट हे बालकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. अत्याधुनिक सोयीनीयुक्त असून या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाची उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच तालुक्यासाठी डायलिसीस सेंटरही याच दवाखान्यात सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सध्या एक मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.