अखेरच्या सामन्यात पाकिस्तान विजयी मालिका मात्र न्यूझीलंडकडे

पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत यजमान किवीज संघाचे 4-1 फरकाने यश : फिल अॅलन मालिकावीर वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात यशस्वीरित्या 135 धावांचा बचाव करत शेवट गोड केला आहे. पाकिस्तानने किवींना विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे 17.2 ओव्हरमध्ये 92 धावांवर पॅकअप झाले. शाहिन शाह […]

अखेरच्या सामन्यात पाकिस्तान विजयी मालिका मात्र न्यूझीलंडकडे

पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत यजमान किवीज संघाचे 4-1 फरकाने यश : फिल अॅलन मालिकावीर
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात यशस्वीरित्या 135 धावांचा बचाव करत शेवट गोड केला आहे. पाकिस्तानने किवींना विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे 17.2 ओव्हरमध्ये 92 धावांवर पॅकअप झाले. शाहिन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात हा पहिला विजय ठरला. तर न्यूझीलंडने ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. मात्र अखेरच्या सामन्यातील पराभवामुळे यजमान किवीज संघाला पाकिस्तानला क्लिन स्वीप देण्याची संधी हुकली. मालिकेत 275 धावा करणाऱ्या फिन अॅलनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर हशीबउल्लाह खानला साऊदीने पहिल्याच षटकात बाद करत पाकला पहिला धक्का दिला. यानंतर बाबर आझमही फार काळ टिकला नाही. अवघ्या 13 धावा काढून तो बाद झाला. मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 4 चौकारासह 38 धावा केल्या तर फखर झमनने 33 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर पाकचे ठराविक अंतराने खेळाडू बाद होत गेले. तळाचा फलंदाज अब्बास अलीने 2 षटकारासह नाबाद 15 धावा केल्या. यामुळे पाकला 20 षटकांत 8 बाद 134 धावापर्यंत मजल मारता आली. किवीज संघाकडून साऊदी, हेन्री, फर्ग्युसन व ईश सोधी यांनी प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
किवीज संघ 92 धावांवर ऑलआऊट
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 135 धावांचा पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडला सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके दिले. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 26 धावा केल्या. फिन एलन याने 22 धावा जोडल्या. विकेटकीपर टीम सेफर्टने 19 आणि विल यंगने 12 धावांचे योगदान दिले. लॉकी फर्ग्यूसनला भोपळाही फोडता आला नाही. इतर किवीज फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यामुळे त्यांचा डाव 17.2 षटकांत 92 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून इफ्तिकार अहमदने सर्वाधिक 3 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान 20 षटकांत 8 बाद 134 (मोहम्मद रिझवान 38, फखर झमन 33, अब्बास अली नाबाद 15, साऊदी, मॅट हेन्री, फर्ग्युसन व ईश सोधी प्रत्येकी दोन बळी)
न्यूझीलंड 17.2 षटकांत सर्वबाद 92 (फिन अॅलन 22, ग्लेन फिलिप्स 26, इफ्तिकार अहमद 3 बळी, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद नवाज प्रत्येकी दोन बळी) .