पाचव्या टप्प्यात मतदान टक्का घसरला

पाच वाजेपर्यंत 57 टक्के मतदान : बारामुल्ला-लडाखमध्ये उत्स्फूर्त वातावरण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2024 लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 57.35 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73 टक्के आणि महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले. यापुर्वीच्या टप्प्यांच्या तुलनेत पाचव्या टप्प्यात टक्का घसरला असला तरी जम्मू […]

पाचव्या टप्प्यात मतदान टक्का घसरला

पाच वाजेपर्यंत 57 टक्के मतदान : बारामुल्ला-लडाखमध्ये उत्स्फूर्त वातावरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 57.35 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73 टक्के आणि महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले. यापुर्वीच्या टप्प्यांच्या तुलनेत पाचव्या टप्प्यात टक्का घसरला असला तरी जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला या एका जागेसह लडाखमध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे टक्केवारीवरून दिसून येत आहे. याशिवाय ओडिशा विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील 35 जागांवर 60.70 टक्के मतदान झाले.
लोकसभेच्या 543 जागांपैकी चौथ्या टप्प्यापर्यंत 380 जागांवर मतदान झाले. आजच्या जागांसह एकूण 429 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन टप्प्यात 114 जागांवर मतदान होणे बाकी आहे. पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी 695 उमेदवार रिंगणात असून या सर्वांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, बसपा सुप्रीमो मायावती, सतीशचंद्र मिश्रा यांनी लखनौमध्ये मतदान केले. राहुल गांधींच्या विरोधात लढणारे दिनेश प्रताप सिंह यांनी रायबरेलीत मतदान केले.
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. तर शेजारच्या ओडिशामधील काही बूथवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले. पश्चिम बंगालमधील बराकपूर आणि हुगळी येथे भाजप उमेदवार आणि टीएमसी समर्थकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. आरामबाग मतदारसंघातील खानाकुल परिसरात टीएमसी आणि भाजपच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी याप्रकरणी वेळीच पावले उचलत मतदान प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यास मदत केली. उत्तर प्रदेशातील महोबा येथे कर्तव्यावर असताना एका जवानाचा मृत्यू झाला.
निवडणूक आयोगाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार अंदाजे मतदानाची टक्केवारी 57.38 इतकी होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सर्वात कमी 48.88 टक्के मतदान झाले, तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73 टक्के मतदान झाले. इतर राज्यांपैकी बिहारमध्ये 52.55 टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये 54.21 टक्के, झारखंडमध्ये 63 टक्के, ओडिशामध्ये 60.72 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 57.33 टक्के आणि लडाखमध्ये 67.15 टक्के मतदान झाले आहे. मतदानाची वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असली तरी त्या वेळेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या लोकांना मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती.
बारामुल्लातील मतदारांमध्ये उत्साह
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात 54 टक्क्मयांहून अधिक मतदान झाले असून जवळपास चार दशकांतील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आधीच नोंदवली गेली आहे. यावेळची एकूण मतदानाची 54.21 टक्केवारी ही 1984 मध्ये मतदारसंघातील 58.84 टक्के मतदानानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. बारामुल्लामध्ये मतदानादरम्यान शून्य हिंसाचार झाल्याचा दावा निवडणूक अधिकारी पी. के. पोळ यांनी केला आहे. तसेच 2019 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी चार टक्क्यांनी वाढल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येथून कलम 370 हद्दपार झाल्यानंतर प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.