लक्ष्य सेन बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत, मनू भाकर आज तिसऱ्या पदकासाठी खेळणार

भारताची नेमबाज मनू भाकरला एकाच ऑलिंपिकमध्ये पदकांची हॅटट्रिक साजरी करण्याची संधी आहे. मनू आज पॅरिस ऑलिंपिकमध्ये 25 मीटर पिस्टल प्रकारात फायनलमध्ये खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता हा सामना सुरू होईल. मनूनं यंदा याआधी 10 मीटर एयर पिस्टल …

लक्ष्य सेन बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत, मनू भाकर आज तिसऱ्या पदकासाठी खेळणार

भारताची नेमबाज मनू भाकरला एकाच ऑलिंपिकमध्ये पदकांची हॅटट्रिक साजरी करण्याची संधी आहे.

 

मनू आज पॅरिस ऑलिंपिकमध्ये 25 मीटर पिस्टल प्रकारात फायनलमध्ये खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता हा सामना सुरू होईल.

 

मनूनं यंदा याआधी 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीमध्ये मनूनं वैयक्तिक आणि मिश्र सांघिक अशी दोन पदकं कमावली आहेत. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिलीच खेळाडू आहे.

 

त्याशिवाय आज तिरंदाजीत दीपिका कुमारी आणि भजन कौर महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहेत. त्यांनी आगेकूच केली तर या प्रकारातली फायनलही आजच खेळवली जाईल.

 

भारतीय वेळेनुसार मध्यरात्री बॉक्सर निशांत देवची उपांत्यपूर्व फेरीची बाऊट आहे. आज निशांत जिंकला तर त्याचं किमान कांस्यपदक निश्चित होईल.

 

ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी होती, खाली वाचा.

ऑलिंपिकमध्ये यंदा 32 क्रीडाप्रकारांत 329 सुवर्णपदकांसाठी हजारो अ‍ॅथलीट्स शर्यतीत आहेत. भारतानं या क्रीडा स्पर्धेसाठी 110 जणांचं पथक पाठवलं असून 16 क्रीडाप्रकारांत भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत.

 

मनू भाकर, लक्ष्य सेनची आगेकूच, तिरंदाजीत चौथं स्थान (2 ऑगस्ट)

मनूनं पॅरिस ऑलिंपिकमध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्टल नेमबाजीची फायनल गाठली आहे. पात्रता फेरीत तिनं 590 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं.

 

25 मीटर पिस्टल नेमबाजीत रॅपिड आणि प्रीसिजन असे दोन राऊंड्स असतात. मनूनं दोन्ही प्रकारांत चमकदार कामगिरी बजावत फायनल गाठली.

 

बॅडमिंटनमध्ये भारताच्या लक्ष्य सेननं उपांत्य फेरी गाठत इतिहास रचला. लक्ष्य ऑलिंपिकमध्ये बॅडमिटंन पुरुष एकेरीत सेमी फायनल गाठणारा पहिला भारतीय ठरला.

 

त्यानं उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चोऊ तिएन चेनवर 19-21, 21-15, 21-12 अशी मात केली.

 

भारताच्या हॉकी टीमसाठीही हा दिवस खास होता. भारतानं साखळी फेरीत पूल बीमधल्या आपल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3-2 असा विजय मिळवला.

 

ऑलिंपिकच्या इतिहासात गेल्या 52 वर्षांत पहिल्यांदाच भारतानं पुरुषांच्या हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे.

 

तिरंदाजीच्या मिश्र प्रकारात भारताला कांस्य पदकाच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला आणि चौथ्या स्थानाव समाधान मानावं लागलं.

 

अंकिता भाकत आणि धीरज बोम्मादेवरा या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला हरवलं पण उपांत्य सामन्यात त्यांना बलाढ्य कोरियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मग कांस्य पदकाच्या सामन्यात अमेरिकेनं भारतीय जोडीला हरवलं.

 

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला कांस्य (1 ऑगस्ट)

भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ॲालिंपिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.

 

स्वप्नीलनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवलं.

 

खाशाबा जाधवांनंतर पहिल्यांदाच एखाद्या मराठी खेळाडूनं ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे खाशाबा जाधवांप्रमाणेच स्वप्नीलही कोल्हापूरचा आहे.

 

स्वप्नील राधानगरीच्या कंबळवाडी गावातला आहे. नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून त्यानं नेमबाजीचे प्राथमिक धडे गिरवले होते. नेमबाज दीपाली देशपांडे आणि विश्वजीत शिंदे यांचं मार्गदर्शन त्याला लाभलं आहे.

 

फायनलमध्ये पहिल्या फेरीत Kneel (नील) पोझिशन म्हणजे गुडघ्यावर बसून नेमबाजी करताना स्वप्नीलनं 153.3 गुण कमावले. मग Prone (प्रोन) पोझिशन म्हणजे झोपून नेमबाजी करताना स्वप्नीलनं आणखी चांगली कामगिरी केली. या फेरीअखेर एकूण 310.1 गुणांसह तो पाचव्या स्थानावर होता. अखेर उभ्यानं नेमबाजी करताना 422.1 गुणांची कमाई केली.

 

शेवटी 451.4 गुणांसह त्यानं तिसरं स्थान निश्चित केलं आणि कांस्यपदक मिळवलं. अवघ्या अर्ध्या गुणानं स्वप्नीलची रौप्यपदकाची संधी हुकली. पण त्यानं मिळवलेलं कांस्यपदकही ऐतिहासिक ठरलं आहे.

 

भारतासाठी खेळणारा महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधवला मात्र पराभव स्वीकारावा लागला. चीनच्या काओ वेनचाओनं त्याला 6-0 असं हरवलं.

 

भारताची स्टार बॉक्सर निखत झरीनचं आव्हानही संपुष्टात आलं. निखतला प्राथमिक फेरीत चीनच्या वू यूकडून पराभव स्वीकारावा लागला.

 

हॅाकीमध्येही भारताला बेल्जियमकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. तर पी.व्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली.

 

स्वप्नील कुसाळे फायनलमध्ये (31 जुलै)

भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला. नेमबाजीच्या या प्रकारात फायनल गाठणारा स्वप्नील पहिलाच भारतीय ठरला.

 

या स्पर्धेत ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर मात्र पात्रता फेरीतून बाहेर झाला.

भारताच्या राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंगचं ट्रॅप नेमबाजीतलं आव्हान मात्र संपुष्टात आलं.

 

दरम्यान, बॉक्सर लव्हलिना बोरगोहाईंनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिनं राऊंड ऑफ 16 मध्ये नॉर्वेच्या सुनिव्हा हॉफस्टॅडवर गुणांच्या आधारे मात केली.

 

लव्हलिनाला आता पुढच्या सामन्यात 4 ऑगस्टला चीनच्या ली कियानशी मुकाबला करायचा आहे.

 

बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या खेळाडूंचा पराभव झाला तरी त्यांना कांस्यपदक मिळतं. त्यामुळे पुढचा लव्हलिनानं 4 ऑगस्टची लढत जिंकली तर तिचं पदक निश्चित होईल.

 

सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकण्याची नामी संधी लव्हलिनाकडे आहे. याआधी कुस्तीत सुशीलकुमार आणि बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूनं अशी कामगिरी बजावली होती.

 

तिरंदाजीत दीपिका कुमारीनं नेदरलँड्सच्या रोफिन क्विन्टीला 6-1 असं हरवलं आणि 1/8 एलिमिनेशन राऊंडमध्ये प्रवेश केला आहे.

 

बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेननं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला आहे. लक्ष्य सेननं ऑल इंग्लंड चॅम्पियन जोनाथन ख्रिस्टीवर मात केली.

 

त्याशिवाय बॅडमिंटनमध्ये एच एस प्रणोयनं बाद फेरी गाठली. प्रणोयला आता भारताच्याच लक्ष्य सेनचा मुकाबला करावा लागणार आहे.

 

मनू भाकर, सरबजोतचं ऐतिहासिक पदक (30 जुलै)

भारताच्या मनू भाकरनं एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकण्याची कमाल केली .

 

मनूनं सरबजोत सिंगच्या साथीनं 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात मिश्र सांघिक नेमबाजीत कांस्य पदक मिळवलं. याआधी महिलांच्या वैयक्तिक 10 मीटर एयर पिस्टल स्पर्धेतही मनूनं कांस्यपदक जिंकलं होतं.

 

मनू आणि सरबजोतनं काल झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांसह तिसरं स्थान मिळवलं होतं. आज त्यांनी कांस्य पदकाच्या लढतीत दक्षिण कोरियावर 16-10 अशी मात केली. मिश्र नेमबाजीत भारताचं हे पहिलं ऑलिंपिक पदक आहे.

 

2021 साली बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर सोहळ्यात मनू भाकरला सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं.

 

सरबजोतनं याआधी 2022 मध्ये हांगझूमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सांघिक आणि मिश्र सांघिक प्रकारांत सुवर्णपदकं मिळवली होती.

 

तर 2023 साली भोपाळ आणि बाकूमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धांमध्येही त्यानं सुवर्णपदकांची कमाई केली.

 

सरबजोतनं 2019 साली ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही पदकांची कमाई केली होती.

 

सरबजोत हरियाणाच्या अंबालामधला असून अभिषेक राणा यांच्या हाताखाली तो नेमबाजीचा सराव करतो. त्याचे वडील जतिंदर सिंग शेतकरी असून आई हरदीप कौर गृहिणी आहेत.

 

दरम्यान, भारताच्या हॉकी टीमनं साखळी सामन्यात आयर्लंडवर 2-0 अशी मात केली.

 

बॅडमिंटन पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकिरेड्डी या जोडीनं उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

 

तिरंदाजीत भजन कौरनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे पण अंकिता भाकतचं आव्हान मात्र संपुष्टात आलं.

 

पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीच्या पात्रता फेरीत पृथ्वीराज तोंडाईमानला 21 व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत श्रेयसी सिंग आणि राजेश्वरी खेळत आहेत. तर हॉकीमध्ये भारताची आयर्लंडसोबत लढत सुरू आहे.

 

रोईंगमध्ये भारताच्या बलराज पनवरनं उपांत्यपूर्व फेरीत त्याच्या गटात पाचवं स्थान मिळवल्यानं त्याच्या पदच्या आशा संपुष्टात आल्या.

 

अर्जुन बबुताचं पदक थोडक्यात हुकलं (29 जुलै)

नेमबाजीच्या 10 मीटर एयर रायफल प्रकारात अर्जुन बबुतानं शर्थ केली, पण त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

 

अर्जुन एकेकाळी दुसऱ्या स्थानावर होता. मात्र दुसऱ्या एलिमिनेशन राऊंडमध्ये एका शॉटवर त्यानं 9.9 गुणच मिळवले. मग तिसऱ्या स्थानासाठीच्या एलिमिनेशन राऊंडमध्ये अर्जुननं 9.5 गुणच मिळवले. त्याचा प्रतिस्पर्धी मिरान मारिसिचनं मात्र 10.7 गुणांसह तिसरं स्थान निश्चित केलं.

 

त्यामुळे पदकाच्या अगदी जवळ पोहोचूनही अर्जुनला रिकाम्या हाती माघारी फिरावं लागलं.

 

महिलांच्या 10 मीटर एयर रायफल फायनलमध्ये भारताच्या रमिता जिंदालला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

 

तर भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. तुर्कीनं भारताला 6-2 असं हरवलं.

 

हॉकीमध्ये भारत आणि अर्जेंटिनामधला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.

 

मनू भाकरनं उघडलं पदकांचं खातं (28 जुलै)

22 वर्षीय मनूनं 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीत कांस्य पदक पटकावून पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचं पदकांचं खातं उघडलं.

 

मनू ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिनं कमावलेल्या या कांस्य पदकामुळे भारताची ऑलिंपिक नेमबाजीत पदकांची 12 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली.

 

टोकियो ऑलिंपिकमध्ये मनू भाकरच्या पदरी निराशा पडली होती. ते अपयश मागे सारत तिनं पॅरिसमध्ये कांस्य पदकाची कमाई केली.

 

तिनं फायनलमध्ये 221.7 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं.

 

तसा 28 जुलैचा दिवस भारतीय नेमबाजांसाठी आशादायक ठरला. कारण 10 मीटर एयर रायफल नेमबाजीत रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुटा यांनी फायनल गाठली.

 

महिलांच्या 10 मीटर एयर रायफल महिलांच्या गटात भारताच्या रमिता जिंदालनं 631.5 गुणांसह पाचवं स्थान मिळवलं फायनल गाठली. नेमबाजीच्या या प्रकारात भारताच्या इलानेविल वेलारिवानला मात्र दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर अर्जुन बबुटानं 630.1 गुणांसह सातवं स्थान गाठलं आणि फायनलमधला प्रवेश निश्चित केला. या गटात संदीप सिंगनं बारावं स्थान गाठलं.

 

तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत मात्र भारताच्या महिला टीमचा पराभव झाला. नेदरलँड्सनं भारतावर 6-0 अशी मात केली. टेनिसमध्ये सुमित नागल तर टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल आणि हरमीत देसाई यांचं आव्हान संपुष्टात आलं.

 

बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, बॉक्सिंगमध्ये निखत झरीन तर टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला आणि मनिका बत्रा यांनी आगेकूच केली आहे. तर रोईंगमध्ये बलराज पनवर उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला.

 

मनू भाकरनं गाठली फायनल (27 जुलै)

22 वर्षीय मनूनं 27 जुलैला झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं.

 

मनूनं पात्रता फेरीच्या पहिल्या दोन सीरीजमध्ये प्रत्येकी 97 गुणांची कमाई केली. तिसऱ्या सीरीजमध्ये 98 गुण मिळवत मनूनं तिसरं स्थान गाठलं. पाचव्या सीरीजमध्ये तिनं एका खराब शॉटवर फक्त 8 गुण मिळवले, पण तेवढा एक शॉट वगळता मनूनं उत्तम कामगिरी करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.

 

भारताची आणखी एक पिस्टल नेमबाज ऱ्हिदम सांगवान पात्रता फेरीत पंधरावी आली. तिनं 573 गुणांची कमाई केली.

 

शानदार उद्घाटन सोहळा

तब्बल 100 वर्षांनी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा ऑलिंपिकचं आयोजन केलं जातंय. तसंच तिसऱ्यांदा पॅरिसनं ऑलिंपिकचं आयोजन केलं आहे.

 

ऑलिंपिकची सुरुवात जरी ग्रीसमध्ये झाली असली, तरी आधुनिक ऑलिंपिक पॅरिसमध्येच आकाराला आलं. साहजिकच या पॅरिसचं ऑलिंपिकशी खास नातं आहे. उदघाटन सोहळ्यातही त्याची झलक पाहायला मिळाली.

 

2024 चा उद्घाटन सोहळा न भूतो न भविष्यती असाच होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 205 देशांच्या संघांची परेड यावेळी स्टेडियममध्ये नाही, तर सीन नदीत बोटींवरून निघाली. परेडच्या पूर्ण मार्गावर ठीकठीकाणी कलाविष्कार पाहायला मिळाले.

 

कार्यक्रमाच्या अखेरीस टॉर्च रिलेमध्ये फ्रान्सचा सुपरस्टार फुटबॉलर झिनेदिन झिदान सहभागी झाला. तर टेनिसस्टार राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, अमेली मोरेस्मो तसंच अ‍ॅथलीट कार्ल लुईस आणि जिम्नॅस्ट नादिया कोमानेची यांच्यासह फ्रान्सचे अनेक दिग्गज खेळाडू रिलेच्या अखेरच्या टप्प्यात सहभागी झाले होते.

 

एका महिला आणि पुरुष अ‍ॅथलीटनं एकत्रितपणे ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली आणि विविधतेत एकता आणि समानतेचा संदेश दिला. यंदा पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंचं प्रमाण 50-50% एवढं समान आहे.

 

लेडी गागा आणि सेलिन डियॉन सारख्या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणानं उद्घाटन सोहळ्यात रंगत आणली.

 

लेडी गागानं सुरुवातीला गाणं सादर केलं तर सेलिन डियॉननं आयफेल टॉवरच्या अर्ध्यावरील टेरेसावरून गात कार्यक्रमाची सांगता केली. दोन वर्षांपूर्वी एका दुर्धर आजारामुळे गाण्याचे कार्यक्रम सेलिन डियॉननं बंद केले होते. एक प्रकारे तिचं हे कमबॅक ठरलं.

 

फ्रान्समधल्या कला, संगीत, इतिहास आणि ऑलिंपिक चळवळीची वाटचाल अशा गोष्टींचं प्रतीक त्यात पाहायला मिळालं.

Go to Source