खानापूर तालुक्यात शुक्रवारीही पावसाची रिपरिप सुरूच

नदीला पूर आल्याने हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पूल वाहतुकीसाठी बंद : असोग्यावरून खानापूरशी संपर्क खानापूर : तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी, नाले धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. शुक्रवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. पश्चिम भागात होत असलेल्या जोरदार पावसामुळे हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पुलावर पाणी आल्याने पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक दिवसभरासाठी बंद केली होती. त्यामुळे या भागातील लोक असोग्यावरुन खानापूरशी संपर्क साधत होते. तालुक्यातील शाळांना […]

खानापूर तालुक्यात शुक्रवारीही पावसाची रिपरिप सुरूच

नदीला पूर आल्याने हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पूल वाहतुकीसाठी बंद : असोग्यावरून खानापूरशी संपर्क
खानापूर : तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी, नाले धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. शुक्रवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. पश्चिम भागात होत असलेल्या जोरदार पावसामुळे हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पुलावर पाणी आल्याने पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक दिवसभरासाठी बंद केली होती. त्यामुळे या भागातील लोक असोग्यावरुन खानापूरशी संपर्क साधत होते. तालुक्यातील शाळांना दोन दिवस सुटी दिल्याने पालक आणि विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत होते.
तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सर्वच नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क गुरुवारी दुपारपर्यंत तुटलेला होता. गुरुवारी सायंकाळनंतर पावसाने पुन्हा जोर केल्याने शुक्रवारी सकाळी अनेक पुलावर पाणी आल्याने काहीकाळ संपर्क तुटलेला होता. तर हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पोलिसांनी रुमेवाडी नाका येथे बॅरिकेड्स लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे मणतुर्गा, हारुरी या भागातील लोकांनी असोग्यावरुन खानापूरशी संपर्क साधला आहे. शुक्रवारी दिवसभ पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यामुळे शुक्रवारीही तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले होते.
जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून अनेक गावांचे संपर्क रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून डबक्यांचे स्वरुप निर्माण झाले आहे. तालुक्यातील सर्वच खेड्यातील रस्ते जोरदार पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या रस्त्यावरुन वाहतूक करताना खबरदारी घ्यावी लागत आहे. तसेच  जोरदार वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे काहीकाळ ग्रामीण भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद होत आहेत.
पावसामुळे झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यावर पडून ग्रामीण भागातील वीजपुरवठाही वारंवार खंडित होत आहे. पावसामुळे तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले असून याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवरही झालेला आहे. गेल्या महिन्याभरापासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. महिन्याभरापासून सूर्यदर्शन झालेले नाही. वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. तसेच तालुक्यात साथीच्या आजाराने डोके वर काढले असून डेंग्यू, सर्दी, ताप, पडशाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे तालुक्यात साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे.
नेरसा येथे जनावरांच्या गोठ्याची पडझड : जनावरे सुरक्षित बाहेर काढण्यात यश
नेरसा येथे होत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमोद देसाई यांच्या गुरांचा गोठा कोसळला. प्रमोद देसाई आणि शेजाऱ्यांनी खबरदारी घेतल्याने गुरांना बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. नेरसा येथील शेतकरी प्रमोद देसाई यांचा गुरांचा गोठा शुक्रवारी पहाटे एका बाजूने कोसळण्यास सुरुवात झाली. कोसळण्याचा आवाज येताच प्रमोद देसाई आणि शेजाऱ्यांनी गोठ्यातील गुरांना तातडीने बाहेर काढले. त्यामुळे सर्व गुरे सुरक्षित बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. गुरे बाहेर काढल्यानंतर थोड्याच वेळाने संपूर्ण गोठा कोसळला आहे. त्यामुळे प्रमोद देसाई यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून प्रमोद देसाई यांच्या शेतात हत्तीने ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे प्रमोद देसाई यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.