कंबोडियात नोकरीच्या नावाने होतेय फसवणूक

भारतीय दूतावासाने केले सतर्क : मोठी फसवणूक होण्याची शक्यता वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अनेक भारतीयांचे विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न असते. पंरतु हे स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात लोक संकटाच्या दलदलीत सापडत असतात. याचमुळे भारत सरकारने नागरिकांसाठी पुन्हा एकदा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नोकरीसाठी कंबोडिया या देशात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना भारतीय दूतावासाने एक सल्ला जारी केला आहे. […]

कंबोडियात नोकरीच्या नावाने होतेय फसवणूक

भारतीय दूतावासाने केले सतर्क : मोठी फसवणूक होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अनेक भारतीयांचे विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न असते. पंरतु हे स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात लोक संकटाच्या दलदलीत सापडत असतात. याचमुळे भारत सरकारने नागरिकांसाठी पुन्हा एकदा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नोकरीसाठी कंबोडिया या देशात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना भारतीय दूतावासाने एक सल्ला जारी केला आहे. भारतीय नागरिकांनी केवळ विदेश मंत्रालयाकडून मान्यताप्राप्त एजंटांच्या माध्यमातूनच रोजगारासाठी अन्य देशात जावे असे दूतावासाने म्हटले आहे.
नोकरीच्या फसव्या ऑफर्समुळे लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कंबोडियात नोकरी इच्छिणाऱ्या लोकांनी नोम पेन्ह (देशाची राजधानी)मध्ये भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. भारतीय नागरिकांना थायलंडमार्गे लाओसमध्ये रोजगाराचे आमिष दाखविले जात आहे. या बनावट नोकऱ्या लाओसमध्ये गोल्डन ट्रायंगल स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये कॉल-सेंटर घोटाळे आणि क्रिप्टो-करेन्सी फसवणुकीत सामील संशयास्पद कंपन्यांकडून ‘डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह्ज’ किंवा ‘कस्टमर सपोर्ट सर्व्हिस’ यासारख्या पदांवर भरती केली जात असल्याचे सांगत फसवणूक केली जात आहे.
कंबोडिया आणि दक्षिणपूर्व आशियाई क्षेत्रात अनेक बनावट एजंट काम करत असून ते भारतातील एजंटांसोबत मिण्tन लोकांची फसवणू करत आहेत. विशेषकरून ते सायबर गुन्ह्यांमध्ये सामील आहेत असे दूतावासाने म्हटले आहे.
संबंधित संशयास्पद कंपन्यांशी निगडित दुबई, बँकॉक, सिंगापूर आणि भारतातील एजंट एक साधारण मुलाखत आणि टायपिंग टेस्ट घेत भारतीय नागरिकांना भरतीचे आमिष दाखवत आहेत. पीडितांना अवैध मार्गाने थायलंडमधून लाओसमध्ये सीमापार नेले जाते, मग कठोर अन् अवघड स्थितीत लाओसमध्ये ‘गोल्डन ट्रायंगल विशेष आर्थिक क्षेत्रा’त काम करण्यासाठी कैद केले जाते. कधीकधी गुन्हेगारी टोळ्यांकडून त्यांना ओलीस ठेवण्यात आले. अवैध कारवाया आणि सातत्याने शारीरिक आणि मानसिक यातना देत या लोकांना काम करण्यासाठी भाग पाडले जात असल्याचे म्हणत कंबोडियातील भारतीय दूतावासाने सतर्क केले आहे.
थायलंड किंवा लाओसमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल रोजगाराची अनुमती नाही. लाओसचे अधिकारी अवैधमार्गाने दाखल झालेल्या भारतीय नागरिकांना वर्क परमिट जारी करत नाही. लाओसमध्ये मानवतस्करी गुन्ह्यांप्रकरणी गुन्हेगारांना 18 वर्षांपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात आली असल्याचे दूतावासाने सांगितले आहे.