इम्रान खान तूर्तास तुरुंगातच राहणार

इम्रान खान तूर्तास तुरुंगातच राहणार

दहशतवादविरोधी न्यायालयात जामिनावर सुनावणी पूर्ण
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद आहेत. याचदरम्यान दहशतवादविरोधी न्यायालयाने 9 मे रोजीच्या घटनांशी निगडित प्रकरणी खान यांच्या अंतरिम जामीन याचिकांवर स्वत:चा निर्णय राखून ठेवला आहे.  पीटीआय संस्थापकाला राजकीय कारणांमुळे लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप सुनावणीदरम्यान इम्रान खान यांचे वकील सलमान सफदर यांनी केला आहे.
स्वत:च्या पूर्ण कारकीर्दीत मी एकाच व्यक्तीविरोधात इतके सारे खटले कधीच पाहिले नव्हते. जे लोक खऱ्या अर्थाने सरकारी संस्थांच्या विरोधात चिथावणी देत होते, त्यांना अटकच करण्यात आली नाही. गुन्ह्यावेळी इम्रान खान हे कोठडी असताना त्यांच्या विरोधात गुन्हे कसे नोंदविले जाऊ शकतात असा प्रश्न त्यांचे वकील सफदर यांनी उपस्थित केला.
विशेष तपास शाखेच्या अहवालानुसार इम्रान यांनी स्वत:ला अटक झाली तर नागरी आणि सैन्य प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात यावे असे समर्थकांना सांगितले होते असा दावा सरकारी वकिलाने केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यावर इम्रान यांच्या अंतरिम जामीन अर्जावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. यामुळे इम्रान यांना तूर्तास तुरुंगातच रहावे लागणार आहे.